चालू घडामोडी आणि दिनविशेष - 01 डिसेंबर 2023

Date : 1 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरकारी नोकर भरती होते कशी? या प्रक्रियेत राज्यात दिरंगाई का होत आहे?
  • सरकारी नोकर भरतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका महत्त्वाची असते. नव्याने २२ हजार जागांची भरती करण्याकरिता राज्य सरकारने लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र नोंदविले आहे. यानुसार आता आयोगाकडून भरतीची प्रक्रिया सुरू होईल. सरकारमधील ३२ विभागांनी रिक्त जागांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावे लागते. त्यानंतर जागांचे आरक्षण आणि मागणीपत्रातील जागा याचे प्रमाण याचा समतोल साधत सर्व बाबी पूर्ण करून राज्य लोकसेवा आयोगाकडे सामान्य प्रशासन विभागाकडून प्रस्ताव सादर केला जातो. आयोगाने वेळेत जाहिरात काढून परीक्षांचे वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी करीत वेळेत निकाल लावणे गरजेचे आहे. यासाठी पदभरतीचा एक कालबद्ध कार्यक्रम असणे गरजेचे आहे.

रिक्त जागा भरण्यासाठी सर्वप्रथम कोणती कार्यवाही?

  • शासनाचे ३२ विभाग आहेत. यात वर्ग ‘अ‘, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या चार श्रेणीच्या जागा भरल्या जातात. यासाठी शासनाच्या ३२ विभागांना हव्या असलेल्या जागा अथवा रिक्त पदाचा आकडा संबंधित विभाग मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागास (साप्रवि) कळवतात. प्रत्येक विभागाने मागणी केलेल्या जागा विचारात घेऊन आरक्षण, समांतर आरक्षण याचे प्रमाण विचारात घेऊन प्रत्येक प्रवर्गाच्या वाट्याला येणाऱ्या जागा निश्चित केल्या जातात.याचा तक्ता तयार करून सर्व तपशिलासह राज्य लोकसेवा आयोगाकडे पाठविला जातो. आयोग प्रवर्गनिहाय जागांच्या संख्येसह इतर नियमासह तपशीलवार पदांची जाहिरात देतो. तसेच सरळसेवा भरतीसाठी क्षेत्रीय आस्थापनेला पाठवतो.

लोकसेवा आयोगाचे कर्तव्य काय असते?

  • शासनात सुमारे ३२ संवर्ग म्हणजे तेवढ्या प्रकारचे अधिकारी-कर्मचारी सेवा देत असतात. वर्ग अ, वर्ग ब आणि क वर्गातील अराजपत्रित अधिकारी आणि लिपिक संवर्गातील काही जागा भरण्याचे काम आयोगाकडू पार पाडले जाते. या ३२ संवर्गापैकी काही विशेष सेवा आहेत. अभियांत्रिकी, वनसेवा, अन्न सुरक्षा इत्यादी. यासाठी आयोग पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा टप्प्यांवर परीक्षा घेते. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, वित्तसेवा अधिकारी, पोलिस उपअधीक्षक आदी पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षा चाळणी परीक्षा असते. याचे गुण अंतिम यादीसाठी धरले जात नाहीत. साधारण एक परीक्षा पूर्ण करण्यासाठी आयोगाला सध्या दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागतो. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे टप्पे पूर्ण झाल्यानंतर शारीरिक अर्हता आवश्यक असलेल्या पदासाठी ती तपासली जाते आणि अंतिम निकाल लावला जातो. सरळसेवा भरतीसाठी अलीकडे सरकारने नोकरभरती करणाऱ्या संस्था नेमल्या आहेत. यापू्र्वी विभागनिहाय दुय्यम सेवा निवड मंडळे होती. सरळसेवा भरतीसाठी क्षेत्रीय स्तरावरील आस्थापनेला परीक्षा घेणाऱ्या संस्था निवडण्यासाठी परवानगी दिली जाते.

अंतिम निवड झाल्यानंतर पुढे काय?

  • अंतिम निवड झाल्यानंतर सर्व कागदपत्रे तपासली जातात. शैक्षणिक, अनुभव, आरक्षणाच्या प्रवर्गातील कागदपत्रे तपासून रुजू करून घेतले जाते. त्यानंतर प्रशिक्षण सुरू होते. ते पूर्ण केल्यानंतर त्या-त्या विभागात रुजू केले जाते. तेथे परिवीक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनरी आफिसर) म्हणून ठराविक काळ पूर्ण केल्यानंतर त्या विभागात सेवेत कायम केले जाते.
‘एनडीए’च्या दीक्षान्त संचलनात महिला बटालियन
  • देशाच्या संरक्षणासाठी समर्थ अधिकारी घडविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए ) ७५ वर्षांच्या इतिहासात दीक्षान्त संचलनात (मार्चिग) महिलांच्या बटालियनने गुरुवारी प्रथमच पदसंचलन केले. ही ऐतिहासिक घटना असल्याचे नमूद करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांच्या संचलनातील सहभागाची प्रशंसा केली.
  •  देशसेवेचे स्वप्न घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण, भविष्यातील आव्हानांना सक्षमपणे पेलण्याचा आत्मविश्वास बाळगत लष्करी बँड पथकाच्या ‘कदम कदम बढाये जा’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीतांच्या तालावर शिस्तबद्धरीत्या चालणारी पावले या वैशिष्टय़ांसह राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या  १४५ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन गुरुवारी दिमाखात पार पडले. राष्ट्रपती मुर्मू यांनी मानवंदना स्वीकारली. राज्यपाल रमेश बैस, सरसेनाध्यक्ष (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह, प्रबोधिनीचे कमांडंट व्हाइस अ‍ॅडमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल मनोज डोग्रा या वेळी उपस्थित होते.
  • छात्रांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, की आजच्या काळातही महिलांना आवडीचे करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये दीक्षान्त संचलनात महिलांचा सहभाग कौतुकास पात्र आहे.   तरुणांसाठी तुम्ही एक ‘रोल मॉडेल’ आहात. ‘सेवा परमो धर्म’ हे  ब्रीद कायम स्मरणात ठेवा.
  • प्रथम सिंग हा राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. जतिन कुमार रौप्यपदकाचा, तर हर्षवर्धन भोसले कांस्यपदकाचा मानकरी ठरला. ‘ज्युलियट स्क्वॉड्रन’ने ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ पटकाविला. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
  • क्षणचित्रे :  प्रबोधिनीतील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम’ पाऊल ओलांडताच जल्लोष केला.
अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा शिल्पकार कालवश; जगभरातून श्रद्धांजली
  • अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर रिपब्लिकन पक्षाच्या रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर आपली छाप सोडली, ती त्यांच्या निवृत्तीनंतरही अनेक वर्षे टिकून राहिली. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण किसिंजर यांच्या हातात असताना आणि नंतरही ते एकाच वेळी प्रशंसा आणि बदनामीचे धनी झाले होते.
  • रिचर्ड निक्सन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात किसिंजर हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख शिल्पकार मानले गेले. वॉटरगेट प्रकरणात निक्सन यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांनी गेराल्ड फोर्ड यांच्याबरोबरही परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले. निवृत्तीनंतरच्या आयुष्यातही ते कठोर आणि ठाम मते मांडत राहिले. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि व्यापक अनुभव यामुळे किसिंजर यांची प्रशंसा होत असतानाच, इतर देशांमध्ये विशेषत: लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये कम्युनिस्टविरोधी हुकुमशहांना दिलेल्या पािठब्यासाठी त्यांना युद्ध गुन्हेगार मानणाराही एक वर्ग आहे. व्हिएतनाम युद्धातील अमेरिकेने माघार घेण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना १९७३मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्तरीत्या देण्यात आला. मात्र, तो पुरस्कार सर्वात वादग्रस्त पुरस्कारांपैकी एक ठरला आणि नोबेल पुरस्कार समितीच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला. शांतता चर्चेत सहभागी असलेले उत्तर व्हिएतनामचे मुत्सद्दी ले डुक थाओ यांनाही पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी तो नाकारला.
  • गेराल्ड फोर्ड यांनी किसिंजर यांचे वर्णन ‘सुपर परराष्ट्रमंत्री’ असे केले होते, त्यांच्या स्वभावातील काटेरीपणा आणि स्वत:विषयी खात्री यांचाही उल्लेख केला होता. किसिंजर यांच्या टीकाकारांनी त्याच स्वभाववैशिष्टय़ांचे वर्णन विभ्रमित करणारी भीती (पॅरानॉय) आणि अहंकार असे केले. ‘आपण कधीही चूक करत नाही’, असेच हेन्री यांना वाटते, असे वक्तव्य फोर्ड यांनी २००६मध्ये दिलेल्या मुलाखतीत केले होते.
भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य! ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा ट्वेन्टी-२० सामना आज
  • भारतीय संघ शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मैदानात उतरेल, तेव्हा संघाचे लक्ष्य मालिका विजयाचे असणार आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल खेळणार नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत युवा गोलंदाजांकडून अखेरच्या षटकांमध्ये कामगिरी उंचवण्याचे लक्ष्य असेल.
  • गोलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष
  • तिसऱ्या सामन्यात भारताचे गोलंदाज अखेरच्या दोन षटकांत ४३ धावा करण्यापासून ऑस्ट्रेलियाला रोखू शकले नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना जिंकला. प्रसिध कृष्णाने चार षटकांत ६८ आणि अखेरच्या षटकात २१ धावा दिल्या. दीपक चाहरचे पुनरागमन झाले असून तो नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. तसेच, मुकेश कुमारही संघात दाखल झाला आहे. प्रसिध व आवेश खान यांच्या गोलंदाजीत फारशी विविधता पाहायला मिळाली नाही. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी घेतला. तसेच, दोन्ही गोलंदाजांना प्रभावी ‘यॉर्कर’ टाकता आला नाही. श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाल्याने तिलक वर्माला बाहेर बसावे लागू शकते. यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, कर्णधार सूर्यकुमार यादव व रिंकू सिंह यांची निवड जवळपास निश्चित आहे.

ऑस्ट्रेलियाची मदार फलंदाजांवर

  • स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅडम झ्ॉम्पा मायदेशी परतले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी कार्यभार व्यवस्थापन व तंदुरुस्ती लक्षात घेता अनेक आघाडीच्या खेळाडूंना संघात स्थान दिले नाही. आता भारतीय गोलंदाजांसमोर टिम डेव्हिड, जॉश फिलीप आणि बेन मॅकडरमॉट यांचे आव्हान असेल.

’ वेळ : सायं. ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.


 

अंचता शरथ कमल ‘खेलरत्न’ने सन्मानित; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण संपन्न :
  • टेबल टेनिसमधील भारताचा आघाडीचा खेळाडू अंचता शरथ कमलला बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये बुधवारी सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले.

  • राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळय़ात स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे, बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, बॅडिमटनपटू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांच्यासह २५ क्रीडापटूंना ‘अर्जुन’ क्रीडा पुरस्कार बहाल करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडादिनी होणारा हा कार्यक्रम सलग दुसऱ्या वर्षी निवड प्रक्रिया लांबल्यामुळे पुढे ढकलावा लागला होता.

  • टेबल टेनिसमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या शरथला वयाच्या ४०व्या वर्षी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा कमलचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळय़ा वाजवल्या. कमलने कारकीर्दीत राष्ट्रकुल स्पर्धेत १३ पदके, आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळविली असून, पॅरिस ऑलिम्पिकसाठी तो पात्रता सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • ‘अर्जुन’ पुरस्कार विजेत्यांना अर्जुनाचा कांस्यधातूचा पुतळा, मानपत्र आणि रोख १५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सोहळय़ात प्रथम खेलरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यानंतर द्रोणाचार्य आणि अखेरीस अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार सोहळय़ास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते.

विकासगती मंदावली ; सकल राष्ट्रीय उत्पन्न १३.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांवर :
  • अर्थव्यवस्थेने सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये ६.३ टक्क्यांचा वृद्धिदर नोंदविल्याचे बुधवारी सायंकाळी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) अर्थव्यवस्था १३.५ टक्क्यांनी विस्तारली होती. गतवर्षी दुसऱ्या तिमाहीचा वृद्धिदर ८.४ टक्के राहिला होता. प्रामुख्याने निर्मिती आणि खाण क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे विकासदराला खीळ बसली आहे.

  • जागतिक पातळीसह देशांतर्गत पातळीवर उसळलेली महागाई आणि ती कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून सुरू असलेल्या व्याज दरवाढीचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याने सरलेल्या तिमाहीत विकासदर खालावल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. पहिल्या तिमाहीपेक्षा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये वाढीचा दर निम्मा राहील, असा अंदाज विश्लेषकांनी आधीपासूनच वर्तविला होता.

  • केंद्र सरकारने रस्ते, रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांवर खर्च वाढवल्यामुळे सरकारी भांडवली खर्चात सुमारे ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. तरीही निर्मिती क्षेत्राच्या सकल मूल्यवर्धनातील योगदान उणे ४.३ टक्क्यांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ५.६ टक्के राहिले होते. कृषी क्षेत्रात आश्चर्यकारक वाढ निदर्शनास आली आहे. सरलेल्या तिमाहीत कृषी क्षेत्राचे ४.६ टक्क्यांचे योगदान राहिले आहे. जे त्याआधीच्या म्हणजेच एप्रिल ते जून तिमाहीत ४.५ टक्के तर गेल्या वर्षी याच तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२१) ३.२ टक्के नोंदवले गेले होते. बांधकाम क्षेत्राचे ६.६ टक्के, तर व्यापार, हॉटेल आणि वाहतूक क्षेत्राचे तब्बल १४.७ टक्के वाढीचे योगदान राहिले. मात्र निर्मिती क्षेत्राबरोबरच खाणकाम क्षेत्राची कामगिरी सुमार राहिली असून ते उणे २.८ टक्के राहिल्यामुळे विकासदराला खीळ बसली.

  • रिझव्‍‌र्ह बँकेने आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ६.१ ते ६.३ राहण्याचा अदांज वर्तविला होता. पतमानांकन संस्था इक्रानेदेखील दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर ६.५ टक्के, तर स्टेट बँकेने त्यांच्या अहवालात विकास दर ५.८ टक्के वृद्धिदराचे भाकीत केले होते.

२०व्या शतकात गांधीजी, पटेल; २१व्या शतकात मोदी ; गुजरातमध्ये राजनाथ सिंहांचे विधान :
  • ‘‘विसाव्या शतकात महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरातच्या अस्मिता-अभिमानाचे प्रतीक होते. आता एकविसाव्या शतकात गुजरातचा सन्मान व अस्मितेचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयास आले आहेत,’’ असे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे बुधवारी काढले. १ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  • सिंह म्हणाले, की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केलेले ‘रावण’ संबोधन ही अवघ्या काँग्रेस नेतृत्वाची मानसिकता दर्शवते. मोदी हे गुजरातचा सन्मान-अभिमान आहेत. मात्र त्यांच्यासाठी काँग्रेसकडून अशी वाईट भाषा वापरली जात आहे. पंतप्रधानांसाठी असे अपमानास्पद (पान ४ वर) (पान १ वरून) शब्द वापरणाऱ्यांना गुजरातची जनता चोख प्रत्युत्तर देईल.

  • पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना ‘मौनीबाबा’ हा शब्द भाजप नेते वापरतात, याबद्दल विचारले असता राजनाथ म्हणाले, की हा अपशब्द नाही. मात्र पंतप्रधानांसाठी ‘रावण’ आणि ‘नीच’ असे आक्षेपार्ह अपशब्द विरोधकांनी वापरले आहेत.

रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती :
  • रशियामधील एका संशोधनादरम्यान फ्रेंच वैज्ञानिकांना ४८ हजार वर्षांपूर्वीचा एक विषाणू सापडला आहे. रशियामधील एका गोठलेल्या तळ्यामध्ये हा विषाणू सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार या विषाणूला ‘झोम्बी व्हायरस’ असं म्हटलं आहे. या विषाणूमुळे पुन्हा एकदा करोनापेक्षाही अधिक भयंकर आणि मोठी साथ पसरण्याची भीतीही या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

  • अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामधून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राने ज्या अभ्यासाचा आधारे ही बातमी दिली आहे त्या अभ्यासासंदर्भातील सविस्तर संशोधन अद्याप प्रकाशित झालेलं नाही. प्रकाशनापूर्वीचं काम सुरु असून लवकरच हे संशोधन सार्वजनिक केलं जाणार आहे.

  • “हा पुरातन विषाणू सापडल्याने भविष्यात वनस्पती, प्राणी आणि मानवासाठी परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते,” असं या ‘व्हायरल’ माहितीमध्ये म्हटलं आहे. प्रथामिक अहवालांनुसार वातावरण बदलांमुळे बर्फाच्या खाली असलेली उत्तर गोलार्धामधील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच मानवाला संशोधनानिमित्त पोहोचता आलं आहे.

  • पहिल्यांदाच या गोठलेल्या अवस्थेत असलेल्या विषाणूंशी मानवाशी संबंध आला आहे. मात्र वातावरण बदलांमुळे ‘मागील हजारो वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेल्या या विषाणूंच्या माध्यमातून काही जैविक पदार्थांचं उत्सर्जन होण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये प्राणघातक विषाणूंचाही समावेश असू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा डेन्मार्कला धक्का; विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक :
  • उत्तरार्धात मध्यरक्षक मॅथ्यू लेकीने केलेल्या गोलच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ड-गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात डेन्मार्कला १-० असा पराभवाचा धक्का दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने केवळ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.

  • स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा होता. त्यामुळे दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर दिला. डेन्मार्कला

  • चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण मिळवण्यात यश आले. तसेच त्यांनी गोलच्या दिशेने १३ फटकेही मारले. मात्र, त्यांना एकही गोल करता आला नाही. याऊलट ऑस्ट्रेलियाचा भक्कम बचाव करतानाच चेंडू मिळताच प्रतिआक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अखेर त्यांना ६०व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. लेकीने अप्रतिम वैयक्तिक गोल करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. अखेर ही आघाडी निर्णायक ठरली.

  • ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच्या सामन्यात टय़ुनिशियाचा पराभव केला होता. विश्वचषकात सलग दोन सामने जिंकण्याची ही त्यांची दुसरीच वेळ ठरली. या कामगिरीमुळे त्यांना १६ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकाची बाद फेरी गाठण्यात यश आले.

01 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.