चालू घडामोडी आणि दिनविशेष - 01 ऑगस्ट 2023

Date : 1 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
IPL 2024 चा हंगाम विदेशात होणार? जाणून घ्या काय आहे कारण
  • क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलबाबत एक मोठी बातमी आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ लवकरच आयोजित केली जाऊ शकते. एका अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच आयपीएल २०२४ चे आयोजन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हा हंगाम परदेशातही होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
  • बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहिती नुसार, बीसीसीआय लवकरच आयपीएल २०२४ चे आयोजन करू शकते. त्यासाठी लवकरच खिडकीचा शोध घेतला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. आयपीएल २०२४ मार्चमध्ये आयोजित केले जाऊ शकते. त्याचा अंतिम सामना मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. पण सध्या संपूर्ण लक्ष २०२३ च्या विश्वचषकावर आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जाईल.
  • बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “होय, आम्हाला पुढील आयपीएलमध्ये येणाऱ्या अडचणींची जाणीव आहे. आमच्याकडे जूनमध्ये इंग्लंडची मालिका आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका तसेच विश्वचषक आहे. पण आता काहीही नियोजन करणे खूप घाईचे आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनाकडे आपल्या सर्वांचे लक्ष आहे. डिसेंबर-जानेवारीमध्येच कोणताही निर्णय घेतला जाईल.”
  • ते पुढे म्हणाले, “आयपीएल आणि निवडणुकांच्या तारखा एकमेकांत भिडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१४ मध्ये आम्ही पूर्णपणे आयपीएलचे भारतात आयोजन केले होते. त्यामुळे ते बाहेर आयोजित करण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. पण तसे झाले तर वेळ आल्यावर विचार करू. आता असे करणे खूप घाईचे आहे. आम्ही ही स्पर्धा भारतातच ठेवण्याचा प्रयत्न करू आणि टी-२० विश्वचषकापूर्वी खेळाडूंना विश्रांतीची संधी देऊ.”
पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर थोड्याच वेळात पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर उतरणार
  • ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी राज्यात मोठा अपघात झाला आहे. शहापूर येथे समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना क्रेन कोसळल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बचावकार्य सुरू झाले आहे. तर, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
  • लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने अवघ्या राज्याचं लक्ष आज पुण्याकडे लागलेलं आहे. हा कार्यक्रम अराजकीय असला तरीही अेनक राजकीय नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय.
  • दरम्यान, शहापूर येथे मोठा अपघात झाल्याने मोदी आज तिथे भेट देतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ISROच्या प्रक्षेपकाचे अवशेष ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर?
  • काही महिन्यांपूर्वी चीनने उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचे अवशेष जमिनीवर पडल्याने चीनचे उपग्रह प्रक्षेपण वादात सापडले होते. असं गेल्या काही वर्षात किमान तीन वेळा घडून आलं आहे. २०२२ मध्ये एप्रिल महिन्या विदर्भातील काही भागात रात्री आकाशातून काही वस्तू जळत जमिनीवर पडल्याचं हजारो नागरीकांनी पाहिलं होतं, काही दिवसानंतर ते चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचं स्पष्ट झालं होतं.
  • असं असतांना आता यावेळी चर्चेत रहाण्याची वेळ भारतावर- इस्रोवर आलेली आहे. इस्रोने काल रविवारी म्हणजेच ३० जुलैला PSLV या प्रक्षेपकाद्वारे सिंगापूरचे उपग्रह प्रक्षेपित केले होते. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील श्रीहरीकोटवरुन आग्नेय दिशेला हे प्रक्षेपण झाले होते. इस्रोच्या प्रक्षेपकाचे – रॉकेटचे विविध टप्पे हे ज्वलन प्रक्रिया झाल्यावर वेगळे होतात आणि अवकाशातून जमिनीच्या दिशेने येतांना वातावरणात जळून नष्ट होतात. मात्र यापैकी एक वस्तू ही ऑस्ट्रेलियातील Jurien Bay या किनाऱ्यावर आढळून आली आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या अवकाश एजन्सीच्या @AusSpaceAgency या ट्विटर वरुन याबाबत दुजोरा देण्यात आला आहे. एक वस्तू किनाऱ्यावर आढळून आली असून ती PSLV रॉकेटच्या तिसऱ्या टप्पातील भाग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत आणखी माहिती घेण्यासाठी इस्रोशी संपर्कात असल्याचं म्हंटलं आहे.
एप्रिल-मेमध्ये १४,००० कोटींचा वस्तू व सेवा कर चुकविला!
  • चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये जीएसटी चुकवल्याची २ हजार ७८४ प्रकरणे उघड झाली असून त्यामध्ये १४ हजार ३०२ कोटींची करचुकवेगिरी झाली, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी संसदेला दिली. या गुन्ह्यासाठी २८ जणांना अटक करण्यात आली असून ५ हजार ७१६ कोटींचा चुकवलेला जीएसटी वसूल करण्यात आला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले.
  • प्रश्नोत्तराच्या तासामध्ये एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये सीतारामन यांनी जीएसटी, आयकर चुकवेगिरीचे तपशील तसेच सीमाशुल्क विभागाकडून पकडण्यात आलेल्या तस्करीसंबंधी माहिती दिली. सरकारकडील आकडेवारीनुसार, २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीमध्ये जीएसटी चुकवल्याची ४३ हजार ५१६ प्रकरणे उघड झाली असून या कालावधीत २ लाख ६८ हजार कोटींपेक्षा जास्त जीएसटी चुकवेगिरी लक्षात आली आहे. यादरम्यान १ हजार २० लोकांना अटक करण्यात आली असून ७६ हजार ३३३ कोटी चुकवलेला जीएसटी वसूल करण्यात आला.
  • सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये आयकर विभागाने राबवलेल्या शोध आणि जप्ती कारवायांमध्ये ३ हजार ९४६ समूहांवर शोध कारवाई करण्यात आली आणि ६ हजार ६६२ कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. गेल्या म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ७४१ समूहांवर शोध कारवाई करून १ हजार ७६५ कोटी ५६ लाख मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. तर गेल्या चार वर्षांमध्ये सीमाशुल्क विभागाकडून सुमारे ४६ हजार कोटी मूल्यांची ४२ हजार ७५४ तस्करीची प्रकरणे उघड करण्यात आली.
Chandrayaan 3 च्या निर्णायक प्रवासाला सुरुवात, चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार?
  • चांद्रयान ३ हे १४ जुलैला प्रक्षेपित करण्यात आले होते. गेले काही दिवस यान हे पृथ्वीच्या भोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते, प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळी पृथ्वीपासूनचे अंतर वाढवत होते. आज मध्यरात्री २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ यानाचे इंजिन प्रज्वलीत करण्यात आले. यामुळे यानाचा वेग वाढत तो सुमारे १० किलोमीटर प्रति सेंकद एवढा झाला आणि यान पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदण्यात यशस्वी झाल्याचं इस्रोने जाहिर केलं आहे.
  • चांद्रयान ३ मोहिमेच्या महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस चांद्रयान ३ चा प्रवास चंद्राचा दिशेने सुरु राहील. पाच ऑगस्टच्या सुमारास पुन्हा एकदा यानावरील इंजिन प्रज्वलीत केले जाईल आणि यानाला चंद्राच्या कक्षेत आणले जाईल.
  • त्यानंतर पुढील काही दिवस यानाची चंद्राभोवती लंबवुर्तळाकार कक्षा कमी करत यानाला १०० किलोमीटच्या कक्षेत आणलं जाईल. त्यानंतर चंद्रावरील उतरण्याची जागा निश्चित केल्यावर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात चंद्रावर अलगद उतरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘टीईटी’ गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरतीत अपात्र करण्याची मागणी
  • राज्यात २०१९ आणि २०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेत अपात्र करण्याची व पवित्र संकेतस्थळावर नोंदणी करण्यास प्रतिबंध करण्याची मागणी डीटीएड, बी.एड. स्टुडंट असोसिएशनने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
  • गेल्यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षेचा गैरप्रकार उघडकीस आला. त्यात सुमारे सात हजार ८८० उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानुसार गैरप्रकार केलेल्या  उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांना पुढील पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याचे परिपत्रक राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केले आहे. मात्र, गैरप्रकार केलेल्या उमेदवारांनी प्रस्तावित शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेली अभियोग्यता परीक्षा व बुद्धिमापन चाचणी परीक्षा दिली आहे. अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा देऊन अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दिली आहे.
  • मात्र, संबंधित उमेदवार शिक्षक होण्यास नैतिकदृष्टय़ा पात्र नाहीत. त्यामुळे आधार पडताळणीद्वारे त्यांना प्रतिबंधित करावे, जेणेकरून त्यांचा निवडयादीत विचार होणार नाही. अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीत संबंधित उमेदवारांना अपात्र करून पवित्र संकेतस्थळावर नोंदणी करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष संतोष मगर यांनी केली.

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टिंग : जेरेमीला सुवर्ण; विक्रमी कामगिरीसह राष्ट्रकुलमध्ये पहिल्यांदा पदकावर मोहोर :
  • युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिननुंगाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दोन विक्रम मोडीत काढत भारतासाठी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २०१८च्या युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमीने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले. सामोआचा वैपाव्हा नेव्हो इओआने याने २९३ किलो (१२७ किलो आणि १६६ किलो) वजनासह रौप्यपदक पटकावले. तर नायजेरियाचा एडिडिओंग जोसेफ उमोआफिआने २९० किलोसह (१३० किलो आणि १६० किलो) कांस्यपदक मिळवले.

  • १९ वर्षीय जेरेमीने स्नॅच (१४० किलो) आणि एकूण वजन (३०० किलो) या विभागांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचा विक्रम रचला. क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये वजन उचलताना त्याला दोन वेळा त्रास झाला; पण त्यातून सावरत त्याने सोनेरी यश मिळवले. जेरेमीने स्नॅचमध्ये १४० किलो वजन उचलत सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी एडिडिओंगविरुद्ध आघाडी घेतली. यानंतर अखेरच्या प्रयत्नात त्याने १४३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. २०२१च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या जेरेमीने क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १५४ किलो वजनासह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने १६० किलो वजन उचलले. मग १६५ किलोचा त्याचा तिसरा प्रयत्न सदोष होता.

  • मीराबाई चानू (सुवर्ण), संकेत सरगर (रौप्यपदक), बिंद्याराणी देवी (रौप्यपदक) आणि गुरुराजा पुजारी (कांस्यपदक) यानंतर भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे पाचवे पदक आहे.

  • अखेरच्या प्रयत्नात वजन उचलण्यात अपयश आल्यामुळे मला अश्रू अनावर झाले. मी इतरांची कामगिरी पाहिली नाही. अखेर मी प्रशिक्षकांना विचारले, तेव्हा त्यांनी मला सुवर्णपदक जिंकल्याचे सांगितले. माझ्या प्रशिक्षकांनी वजनाची विभागणी चांगल्या पद्धतीने केली होती. त्यामुळे मला पदकापासून वंचित राहावे लागले नाही. युवा ऑलिम्पिकनंतर वरिष्ठ स्तरावरील माझी ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे. यात सुवर्ण कामगिरी केल्याचा आनंद आहे.

आपल्या भागातील ऐतिहासिक रेल्वे स्थानकांना भेट द्यावी!; पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित नागरिकांना आवाहन :
  • देशातील अनेक रेल्वे स्थानके स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडित आहेत. अशा जवळच्या रेल्वे स्थानकाला भेट देऊन स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागरिकांना केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात त्यांनी हे आवाहन केले.

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून, रेल्वेने १८ ते २३ जुलै दरम्यान ‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानक’ सप्ताह साजरा केला. यात देशातील २४ राज्यांतील २७ रेल्वेगाडय़ा आणि ७५ रेल्वे स्थानकांचा समावेश होता. स्वातंत्र्यलढय़ात भारतीय रेल्वेच्या भूमिकेची लोकांना जाणीव करून देणे, हा या प्रयत्नांमागील उद्देश असल्याचे मोदींनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘देशात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत, जी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडित आहेत. या स्थानकांबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • या स्थानकांपैकी मोदींनी झारखंडमधील नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो, लखनौजवळील काकोरी रेल्वे स्टेशन, तामिळनाडूच्या तूत्तुक्कुडि जिल्ह्यातील वान्ची मणियाच्ची जंक्शनचा उल्लेख करून, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. ही यादी खूप मोठी असल्याचे सांगून ते म्हणाले, की २४ राज्यांत स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासाशी संबंधित ७५ रेल्वे स्थानके या अमृतमहोत्सवानिमित्त निवडण्यात आली आहेत.

न्यूयॉर्कमध्ये मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित :
  • मंकीपॉक्सीचे रुग्ण वाढत असल्याने न्यूयॉर्कमध्ये ही साथ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हे शहर आजाराच्या उद्रेकाचे कारण ठरून दीड लाख शहरवासीयांना संसर्ग होण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली.

  • न्यूयॉर्कचे महापौर एरीक अ‍ॅडम आणि न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाचे आयुक्त अश्वीन वासन यांनी शनिवारी मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे सार्वजिनक आरोग्य आणीबाणी घोषित केली.

  • गेल्या काही आठवडय़ांपासून आम्ही नागरिकांना लस आणि चांगले उपचार देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील दीड लाख नागरिकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

“हर घर तिरंगा अभियानात सहभाग घ्या”; ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या ९१ व्या भागातून हर घर तिरंगा अभियाना सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. ‘मन की बात’चा आजचा भाग विशेष आहे. कारण यंदा आपण भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. हे महान भाग्य देवाने आपल्याला दिले असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली.

  • शहीद उद्यम सिंह यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले, “आजच्या दिवशी आपण सर्व देशवासी, शहीद उद्यम सिंह यांच्या हौतात्म्याला नमन करतो. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

  • अमृत ​​महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरुप - स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरुप मिळाल्याचे बघून मला आनंद होत आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि समाजातील प्रत्येक घटकातील लोक या महोत्सवाशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. स्वातंत्र्याच्या संघर्षात भारतीय रेल्वेचे योगदान सगळ्यांना कळावे यासाठी आझादीची रेल्वे आणि रेल्वे स्टेशन नावाच उपक्रम केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. झारखंडचे गोमो जंक्शनचे आता नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो मध्ये नामांतरण करण्यात आले आहे. या स्थानकावर कालका मेलमध्ये चढून ब्रिटिश अधिकाऱ्यांना चकमा देण्यात नेताजी सुभाष यशस्वी झाले होते. देशभरातील २४ राज्यांमध्ये अशा ७५ रेल्वे स्थानकांची ओळख पटली आहे. या ७५ स्थानकांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली असून यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.

पंतप्रधान मोदींचा काव्यसंग्रह पुढील महिन्यात इंग्रजीत :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजराती भाषेतील काव्यसंग्रह ऑगस्ट महिन्यात इंग्रजीतही उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून लिहिलेले आणि ‘आंख आ धन्या छे’ या शीर्षकाचा हा गुजराती काव्यसंग्रह २००७ मध्ये प्रथम प्रकाशित झाला होता.

  • त्याचा इंग्रजी अनुवाद चित्रपट क्षेत्रातील पत्रकार आणि इतिहासकार भावना सौम्या यांनी केला आहे.

  • भावना सौम्या यांनी सांगितले, की या कविता प्रगती, निराशा, परीक्षा, धीरोदात्तता आणि करुणेचे दर्शन घडवतात. मोदींच्या काव्यात सहजता आणि गूढतेचे प्रतिबिंब आहे. त्यांची कविता संदिग्धतेचा उल्लेख करत त्याची उकल करण्याचा प्रयत्न करते. त्यांची हीच लेखनशैली आपले वेगळेपण सिद्ध करते. त्यांच्याकडे भावनाशीलता, विचारमंथन, ऊर्जा आणि आशावाद आहे.  अभिव्यक्ती स्वच्छंद असल्याने ती प्रभावी ठरते.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा - भारतीय संघांची विजयाची हॅट्ट्रिक : 
  • भारताच्या सहाही संघांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवताना रविवारी विजयाची हॅट्ट्रिक साकारली. खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने ग्रीसवर ३-१ अशी मात केली. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाने दिमित्रियस मास्ट्रोवासिलिसचा पराभव केला. तसेच युवा अर्जुन इरिगेसीने अथानासिओस मास्ट्रोवासिलिसला ५१ चालींमध्ये नमवले. विदित गुजराथी आणि के. शशिकिरण यांना मात्र बरोबरीवर समाधान मानावे लागले.

  • भारताच्या ‘ब’ संघाने सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्याला ४-० अशा फरकाने नमवण्याची कामगिरी केली. त्यांनी स्वित्र्झलडचा धुव्वा उडवला. त्यांच्याकडून डी. गुकेश, निहाल सरिन, आर. प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी या युवकांनी आपापले सामने जिंकले. यापैकी सरिनने सेबॅस्टियन बोग्नरला केवळ २७ चालींमध्येच पराभूत केले. भारताच्या ‘क’ संघाने आइसलँडवर ३-१ अशी मात केली. एस. पी. सेतुरामन आणि अभिजित गुप्ता यांना विजय मिळवण्यात यश आले. मात्र, सूर्यशेखर गांगुली आणि अभिमन्यू पुराणिक यांना संघर्षांनंतरही बरोबरीवर समाधान मानावे लागले.

  • महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाने इंग्लंडचा ३-१ असा पराभव केला. द्रोणावल्ली हरिकाला योव्हांका हौस्काने बरोबरीत रोखले. मात्र, आर. वैशाली आणि अनुभवी भक्ती कुलकर्णीने मिळवलेले विजय निर्णायक ठरले. तानिया सचदेवची लढत बरोबरीत सुटली. भारताच्या ‘ब’ संघाने इंडोनेशियाला, तर ‘क’ संघाने ऑस्ट्रियाला नमवले. ‘ब’ संघातील वंतिका अगरवाल आणि सौम्या स्वामीनाथन यांना विजय मिळवण्यात यश आले. ‘क’ संघातील पी. व्ही. नंधिधा आणि प्रत्युशा बोड्डा यांनी आपापले सामने जिंकले.

‘ईडी’च्या कारवाईत आतापर्यंत राज्यातील तीन नेत्यांना तुरुंगवास :

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस बजाविली होती. तेव्हा पवार यांनी स्वत:च ईडीच्या कार्यालयात जाऊन जबाब देण्याची तयारी दर्शविली. पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचे जाहीर करताच राज्यात सर्वत्र केंद्र सरकार व भाजप सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले होते.

तत्कालीन फडणवीस सरकार पार बिचकून गेले. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून ईडी कार्यालयात जाऊ नका, अशी विनंती केली होती. तेव्हापासून आजतागायत पवारांचा ईडीने कधी जबाबही घेतला नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली; पण पुढे काहीच प्रक्रिया झालेली नाही.

२०१४ मध्ये केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून आतापर्यंत राज्यातील चार विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केली आहे.

  • माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ : दोन वर्षे तुरुंगवास, सध्या जामिनावर
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख : नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात
  • माजी मंत्री नवाब मलिक : फेब्रुवारीपासून तुरुंगात
  • संजय राऊत : ताब्यात घेतले.

०१ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.