चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 09, 2021 | Category : Current Affairs


पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या शेजारी देशांची बैठक आयोजित :
 • अफगाणिस्तानची सत्ता पंधरा ऑगस्ट रोजी तालिबानने हस्तगत केल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या शेजारी देशांची बैठक आयोजित केली आहे.

 • परराष्ट्र मंत्री शहा महंमद कुरेशी हे या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार असून चीन, इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान या देशांना निमंत्रित करण्यात आले आहे. तालिबानने तेथील सत्ता हस्तगत केली असून आता सरकारचे काही मंत्रीही जाहीर करण्यात आले असून अफगाणिस्तानच्या शेजारी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आगामी कृती योजना ठरवण्यासाठी पाकिस्तानने नियोजित केली आहे.

 • अफगाणिस्तानातील परिस्थिती व नवी आव्हाने तसेच संधी या गोष्टींचा विचार यात केला जाणार आहे. अफगाणिस्तानच्या शेजारी देशांनी या प्रश्नावर एकत्र येऊन काम करावे व त्या देशात शांतता तसेच स्थिरता नांदण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करावेत याबाबत पाकिस्तान मार्गदर्शन करणार आहे.

 • अफगाणिस्तानशी असलेले आर्थिक संबंध सुधारण्याचा विचारही यात केला जाणार आहे. विशेष प्रतिनिधी पातळीवरची ही बैठक १५ सप्टेंबरला होणार असल्याचे सांगण्यात आले. अफगाणिस्तानच्या शेजारी देशांचा त्या देशात शांतता व स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्याचा इतर देशांनाही व्यापाराच्या माध्यमातून फायदा होईल. त्या देशाचीही आर्थिक घडी बसण्यास मदत होईल असे सांगण्यात आले.

महिलांना ‘एनडीए’त सामावून घेण्याचा सशस्त्र दलांचा निर्णय :
 • महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) सामावून घेण्याचा निर्णय सशस्त्र दलांनी घेतला असल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

 • महिलांना एनडीएच्या मार्गाने संरक्षण दलांमध्ये कायमस्वरूपी कमिशन दिले जाईल असा निर्णय सशस्त्र दलांमध्ये, तसेच सरकारमध्ये सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला आहे, असे केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भारती यांनी न्या. एस.के. कौल व न्या. एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाला सांगितले.

 • याबाबतचे तपशील शपथपत्राद्वारे रेकॉर्डवर सादर करण्याची परवानगी भारती यांनी न्यायालयाला मागितली, तसेच यासाठी प्रक्रियात्मक आणि सुविधांविषयक बदल आवश्यक असल्यामुळे या वर्षीच्या परीक्षांबाबत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी, अशी विनंती केली.

 • न्यायालयाने संरक्षण दलांना लिंग समानतेबाबत सक्रिय दृष्टिकोन बाळगण्याचे निर्देश देण्याऐवजी त्यांनी स्वत:च तसे केलेले आम्हाला आवडेल, असे न्यायालयाने सांगितले.

भारतीय वायू दलाला मिळणार नवी मालवाहू विमाने :
 • भारतीय वायू दलाला आवश्यक असलेली मालवाहू विमाने मिळण्याचा मार्ग आज अखेर मोकळा झाला आहे. ४ ते १० टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण ५६ C – २९५ मालवाहू विमाने घेण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या भारतीय वायू दलात असलेल्या, जुन्या तंत्रज्ञानाच्या HS ७४८ Avro या मालवाहू विमानांची जागा C -२९५ ही मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे.

 • एअरबस कंपनीची ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ आणि टाटाची ‘ टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड’ हे संयुक्तरित्या भारतात C – २९५ या मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत. यासाठी दोन्ही कंपन्या आणि भारतीय वायू दल असा तिघांमध्ये करार होणार आहे. हा एकूण करार सुमारे अडीच अब्ज डॉलर्स एवढा असणार आहे. करार झाल्यानंतर ४८ महिन्यांत एअरबस पहिली १६ विमाने थेट भारतीय वायू दलाकडे हस्तांतरित करणार आहे. तर उर्वरित ४० विमाने ही भारतात एअरबस आणि टाटा हे संयुक्तरित्या बनवणार आहेत.

 • १९६० दशकांतील तंत्रज्ञान असलेली HS ७४८ Avro मालवाहू विमाने एकेकाळी भारतीय वायू दलाचा कणा होती. मात्र जुने झालेले तंत्रज्ञान, वारंवार होणारे अपघात, देखभालीसाठी होणार खर्च लक्षात घेता ही Avro विमाने सेवेतून बाद करण्याचा निर्णय २०१० च्या सुमारास घेण्यात आला. या विमानांची जागा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र विविध कारणांनी या प्रक्रियेला उशीर होत आज अखेर नव्या मालवाहू विमानाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महानिर्मितीच्या जागांवर ५७७ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प :
 • महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. उस्मानाबाद, लातूरसह महानिर्मितीच्या विविध औष्णिक वीजप्रकल्पांच्या रिकाम्या जागेवर एकू ण१८७ मेगावॉट क्षमतेचे तर विदर्भातील विविध ठिकाणी एकू ण ३९० मेगावॉट क्षमतेचे असे एकू ण ५७७ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

 • महानिर्मितीच्या औष्णिक वीजप्रकल्पांत बरीच रिकामी जागा असते. या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याबाबत चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला होता. त्यानुसार उस्मानाबादमधील मौजे कौडगाव येथे ५० मेगावॉट क्षमतेचा, लातूरमधील मौजे सिंदाला (लोहारा) येथे ६० मेगावॉटचा, तसेच औष्णिक विद्युत केंद्रामधील वापरात नसलेल्या जागेवर भुसावळ येथे २० मेगावॉट, परळी येथे १२ मेगावॉट, कोराडी येथे १२ मेगावॉट व नाशिक ८ मेगावॉट असे एकूण ५२ मेगावॉट क्षमतेचे आणि धुळे जिल्ह्य़ातील साक्री येथील मौजे शिवाजीनगर येथे २५ मेगावॉट क्षमतेचे असे एकूण १८७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

 • या १८७ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी मेसर्स. केएफडब्लू-बँक जर्मनी यांनी साक्री १५० मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी केलेला प्रकल्प अर्थसहाय्य करार वाढवून २०११ मधील शिल्लक प्रकल्प निधीमधून (अंदाजे ७२.८१ दशलक्ष  युरो) या प्रकल्पांना ५८८ कोटी २१ लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम केएफडब्लू – बँक जर्मनीकडून घेण्यासही मान्यता देण्यात आली.

गडचिरोली पोलिसांकडून दोन हजार युवकांना रोजगार :
 • देशातील बेरोजगारी आणि रोजगार गमविण्याचे प्रमाण वाढत असताना  नक्षलवादग्रस्त अतिदुर्गम गडचिरोली जिल्हय़ात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यातून मात्र २ हजार १०५ बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी ही किमया घडवून आणताना तरुणाईच्या रिकाम्या हाताना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 • गडचिरोलीत बेरोजगारांची संख्या अधिक आहे. या जिल्हय़ात उद्योग नसल्याने आणि सर्वत्र जंगल असल्याने तसेही रोजगाराची संधी कमी आहे. नक्षलवादाचा प्रभाव असल्याने येथे तरुण-तरुणी नक्षलवादी संघटनेच्या आमिषाला बळी पडून चळवळीत सहभागी होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दलाने जानेवारीपासून जिल्हय़ातील शिक्षित बेरोजगार तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन सुरू केले. 

 • पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून आतापर्यंत नऊ स्वयंरोजगार मेळाव्यातून २ हजार १०५ बेरोजगार तरुणाईला रोजगार उपलब्ध करून दिला. कुक्कुटपालन व शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील बेरोजगार युवक-युवतींकरिता स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे करण्यात आले होते.

राज्यात आज ४ हजार १७४ रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९७.०९ टक्के :
 • देशातील करोनारुपी संकट कमी होण्याचं नाव घेत नाही. करोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत किंचित वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. यासाठी राज्य सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. राज्यात करोना लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.

 • शहरी भागासोबत ग्रामीण भागातही लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात गणेशोत्सव सुरु होणार आहे. मात्र करोनाचं संकट पाहता निर्बंधात कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर राज्यातील मंदिर उघडण्याचा निर्णयही लांबणीवर गेल्याचं दिसत आहे.

 • आज राज्यात ४ हजार १७४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात करोना रुग्णांचा आकडा ४ हजारांच्या आसपास असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासात ४ हजार १५५ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

 • राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८ हजार ४९१ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९७.०९ टक्के इतकं आहे. राज्यात सध्या ४७ हजार ८८० रुग्ण सक्रिय आहेत. राज्यात आज ६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे.

उत्तेजकांप्रकरणी दोषी क्रीडापटू राष्ट्रीय पुरस्कारास पात्र :
 • उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे भंग केल्याबद्दल झालेला शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर क्रीडापटू आणि प्रशिक्षक राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतो, असा नियमबदल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केला आहे. बॉक्सिंगपटू अमित पांघल यांच्याप्रमाणे अनेक क्रीडापटूंना या नव्या नियमाचा फायदा होऊ शकेल.

 • उत्तेजकांचे सेवन प्रकरणी शिक्षा पूर्ण केल्यावर क्रीडापटू पुरस्कारासाठी अर्ज करू शकतो, असे क्रीडा मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. मात्र चौकशी सुरू असतानाही त्याच्या योगदानाचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही.

 • देवेंद्र, प्रसाद, सरिता पुरस्कार समितीवर नवी दिल्ली : तीन पॅरालिम्पिक पुरस्कार विजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया, माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि माजी विश्वविजेती बॉक्सिंगपटू एल. सरिता देवी यांना यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीवर स्थान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मुकुंदकुम शर्मा यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. माजी नेमबाज अंजली भागवत, माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांचीसुद्धा समितीवर निवड करण्यात आली आहे.

टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा :

टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी २० विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे.

भारतीय संघ

 • फलंदाज- विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव
 • गोलंदाज- जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
 • अष्टपैलू खेळाडू- हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा
 • फिरकीपटू- राहुल चाहर, अक्षर पटेल, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती
 • यष्टीरक्षक- केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन
 • राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

०९ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)