चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 09, 2021 | Category : Current Affairs


निर्भिड, निष्पक्ष पत्रकारांना शांततेचे नोबेल :
 • फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा  शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.

 • नॉर्वेच्या नोबेल समितीचे बेरिट रेस अँडरसन यांनी शुक्रवारी या मानकऱ्यांची घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे, ‘‘की मुक्त, स्वतंत्र, तथ्याधिष्ठित पत्रकारितेच्या रक्षणासाठी या दोघांनी सत्तेचा गैरवापर, खोटारडेपणा, युद्धखोरीजन्य प्रचार याविरोधात लढा दिला. अभिव्यक्ती आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य, देशांमधील बंधुभाव, नि:शस्त्रीकरण याशिवाय चांगल्या जगाची निर्मिती होऊ शकत नाही.’’

 •  रेसा यांनी २०१२ मध्ये रॅपलर हे वृत्तसंकेतस्थळ स्थापन केले असून अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात, अमली पदार्थांच्या घातक वापराविरोधात मोठा लढा दिला आहे. समाजमाध्यमे कशा खोट्या बातम्या पसरवतात, विरोधकांचा छळ  कसा होतो, सार्वजनिक पातळीवरील चर्चेला भलतीच दिशा दिली जाते यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

एअर इंडिया टाटांकडे :
 • सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेली ‘एअर इंडिया’ ही हवाई वाहतूक कंपनी अखेर ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांना खरेदी केली. विविध कारणांमुळे कर्जजर्जर झालेली ही कंपनी खरीदण्यासाठी देशातून आणि परदेशातूनही फारशा कंपन्या उत्सुक नव्हत्या.

 • ‘एअर इंडिया’ कंपनी टाटांनीच सुरू केली होती. त्यांनी ती सरकारला विकली होती, पण आता ६८ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण होऊन कंपनी पुन्हा ‘टाटा सन्स’कडे आली आहे. ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावल्याचे शुक्रवारी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने जाहीर केले.

 •  ‘एअर इंडिया’च्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली. उर्वरित २,७०० कोटी रुपये टाटा सरकारला रोख स्वरूपात देणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांड्ये यांनी दिली. ‘टाटा सन्स’ व्यतिरिक्त ‘स्पाइस जेट’चे अध्यक्ष अजय सिंह यांची दुसरी व्यक्तिगत बोली होती.

चीन आणि भारत यांच्यात तवांगमध्ये चकमक :
 • भारत आणि चीन यांच्यात तवांग क्षेत्रात यांगत्से येथे गेल्या आठवड्यात चकमक झाली. हा प्रकार अरुणाचल प्रदेशात घडला असून स्थानिक कमांडर पातळीवर वाद मिटवण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.  

 • चीनचे गस्ती पथक भारतीय प्रदेशात घुसले असता त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना माघारी पिटाळण्यात आले. पूर्व ल़डाख प्रश्नावर दोन्ही देशात कोअर कमांडर पातळीवर पुढील तीन चार दिवसात चर्चा होण्याची शक्यता आहे.

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा : रिदम-विजयवीरकडून ‘सुवर्णदशकपूर्ती’ :
 • रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू या भारतीय जोडीने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या खात्यावरील २३व्या पदकाची नोंद केली.

 • रिदम-विजयवीर जोडीने अंतिम सामन्यात थायलंडच्या कॅनयाकॉर्न हिरूनफोइम आणि श्वॅकोन ट्रिनीफॅक्रोन जोडीवर ९-१ असा दिमाखदार विजय मिळवून भारताला १०वे सुवर्णपदक जिंकून दिले. याच प्रकारात तेजस्वनी आणि अनिश भानवाला जोडीने थायलंडच्या शॅविसा पॅडुका आणि रॅम खाम्हाइंग जोडीला १०-८ असे नमवून कांस्यपदक मिळवले.

 • महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात प्रसिद्धी महत, निश्चल आणि आयुशी पॉडर या त्रिकुटाने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम लढतीत अमेरिकेच्या एलिझाबेझ मॅक्घिन, लॉरेन झॉन आणि कॅरोलिन टकर या त्रिकुटाने भारताला ४७-४३ अशा फरकाने हरवले.

०९ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)