चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ ऑक्टोबर २०२०

Date : 9 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राजकीय फायद्यासाठीच एच१-बी व्हिसावर निर्बंध :
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनमत न अजमावता एच१-बी व्हिसावर नवे निर्बंध घातले असल्याची टीका डेमोक्रॅटिक पक्षाने केली आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून त्यापूर्वी राजकीय लाभ उठविण्याचा ट्रम्प यांनी केलेला हा प्रयत्न आहे, असेही डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटले आहे.

  • एच१बी व्हिसावर घालण्यात आलेल्या नव्या निर्बंधांचा फटका माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो भारतीयांना बसणार आहे. मात्र अमेरिकन कामगारांच्या रक्षणासाठी हे निर्बंध घालण्यात आले असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.

  • करोना आणि चीनबाबत चर्चा - अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एकमेव वादविवादात करोना, चीन आणि वातावरणातील बदल, सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आलेले न्यायाधीश, जात आदी प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. उपाध्यक्ष माइक पेन्स आणि सिनेट सदस्या कमला हॅरिस यांनी उपरोक्त मुद्दय़ांवर आपले म्हणणे मांडले.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन :
  • केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले, ते ७४ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन पासवान यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून आपले वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना प्रकट केली आहे.

  • बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं. अशी उज्ज्वल राजकीय कारकिर्द असलेले रामविलास पासवान हे कदाचित देशातील एकमेव नेते असतील.

  • राजकारणाची नस पकडलेले रामविलास पासवान पहिल्यांदा १९६९मध्ये आरक्षित मतदारसंघातून संयुक्त सोशलिस्ट पार्टीकडून बिहारच्या विधानसभेत पोहोचले होते. १९७४मध्ये राज नारायण आणि जयप्रकाश नारायण यांचे खंदे अनुयायी म्हणून ते लोकदलाचे सरचिटणीस बनले. राज नारायण, कर्पूरी ठाकूर आणि सत्येंद्र नारायण सिन्हा सारख्या आणीबाणीतील प्रमुख नेत्यांचे ते जवळचे सहकारी होते.

फोर्ब्सची सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर; मुकेश अंबानी सलग १३व्या वर्षी अव्वलस्थानी :
  • फोर्ब्सने सन २०२०ची १०० सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं पहिल्यांदाच समाविष्ट झाले आहेत. तर केवळ तीन महिलांनी स्थान पटकावले आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग १३व्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

  • फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी हे सलग १३ वर्षे भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. मुकेश अंबानींकडे ८८.७ अब्ज डॉलर संपत्ती आहे.

  • नुकतेच लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे मंदीची स्थिती असताना रिलायन्स समुहाच्या जियो आणि रिलायन्स रिटेलमध्ये जगातील अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली. यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्यातला नोबेल जाहीर :
  • अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना २०२० चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. लुईस यांना त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करुन देते असं नोबेल समितीनं त्यांचा गौरव करताना म्हटलं आहे.

  • कवयित्री लुईस ग्लक यांनी १९६८ मध्ये ‘फर्स्टबोर्न’ सोबत आपल्या कविता लेकनाला सुरुवात केली होती. त्यानंतर अल्पावधितच त्यांचा अमेरिकेतील समकालीन साहित्यविश्वात प्रमुख कवींमध्ये समावेश झाला. त्यांनी बारा कवितांचा संग्रह आणि काही निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या सर्वात नावाजलेल्या काव्यसंग्रहांपैकी ‘द वाइल्ड आयरिस’ हा काव्यसंग्रह सन १९९२ मध्ये प्रकाशित झाला होता. या काव्यसंग्रहातील ‘स्नोड्रॉप्स’ या एका कवितेत त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील चमत्काराचं वर्णन केलं आहे.

  • सन २०१९ मध्ये ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडका यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. उत्कृष्ट लेखन आणि भाषेतील नवीन प्रयोगांबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

फ्रान्सचा युक्रेनवर ७-१ने विजय :
  • आघाडीवीर ऑलिव्हियर गिरौडने आपल्या १००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल झळकावल्यामुळे फ्रान्सने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत युक्रेनसारख्या बलाढय़ संघाचा ७-१ असा धुव्वा उडवला.

  • युवा खेळाडू एडवाडरे कॅमाविंगा याने नवव्या मिनिटालाच फ्रान्सचे खाते खोलल्यानंतर गिरौडने २४व्या आणि ३३व्या मिनिटाला गोल लगावत फ्रान्सला ३-० असे आघाडीवर आणले होते. विताली मायकोलेंको याच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सने पहिल्या सत्रात ४-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. खेळाडूंना झालेली करोनाची लागण तसेच दुखापती यामुळे युक्रेनला आपला अव्वल संघ मैदानात उतरवता आला नाही.

  • फ्रान्सचे प्रशिक्षक दिदियर देसचॅम्प्स यांनी दुसऱ्या सत्रात किलियन एम्बाप्पे आणि विक्टर सायगानकोव्ह यांना संधी दिली. त्यानंतर कोरेन्टिन टोलिस्सो, एम्बाप्पे आणि अँटोनी ग्रिएझमान यांनी गोल करत फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

०९ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.