चालू घडामोडी आणि दिनविशेष - 09 मार्च 2023

Date : 9 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस, ‘या’ राज्यापासून होणार सुरुवात

  • बीएसएनएल ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. बीएसएनएल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र आता बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सर्व्हिस लॉन्च करणार आहे.
  • भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच भारतात 4G सर्व्हिस लॉन्च करणार आहे. बीएसएनएलने पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये कमर्शिअल ४ जी सेवा सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून काही उपकरणे खरेदी करत आहे. मागील महिन्यामध्ये कंपनीने TCS कन्सोर्टियमकडून उपकरणांसाठी तब्बल २४,५०० कोटींचा कर्ररला मंजुरी दिली आहे.
  • माध्यमांच्या माहितीनुसार BSNL कंपनी २०० साईट्ससाठी उपकरणे प्री-ऑर्डर करत आहे. ज्याचा सध्या सुरुवातीला वापर हा पंजाब राज्यामध्ये केला जाणार आहे. सुरुवातीला पंजाबच्या फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोट या तीन जिल्ह्यांमध्ये ४ जी सेवा लॉन्च केली जाणार आहे. ४ जी सेवा लॉन्च करण्यासाठी BSNL च्या पायलट प्रोजेक्टचा हा एक भाग आहे. अजून टीसीएसच्या अंतिम निविदेला सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. टीसीएसला १ लाख ४ साईट्ससाठी मार्च महिन्याच्या शेवट्पर्यंत सरकारची मान्यता मिळू शकते. कंपनी पंजाबमधून या सेवांसाठी टेस्टिंग सुरू करणार आहे.
  • TCS च्या मालकीच्या Tejas Networks ने आधीच सुमारे ५० साईटसाठी उपकरणे पुरविली आहेत. ज्यासाठी C-DOT (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स) सॉफ्टवेअर पॅच अपग्रेड तैनात केले जाऊ शकते. सरकारी अधिकाऱ्यांच्या मतानुसार, मार्चच्या मध्यापर्यंत ४जी लॉन्च होण्यासाठी सुमारे १०० साईट्स तयार असण्याची अपेक्षा आहे. जर का सर्व गोष्टी प्लॅननुसार झाल्या तर, BSNL आपली ४ जी सेवा एप्रिल महिन्यात लॉन्च करू शकते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २० संसदीय समित्यांवर वैयक्तिक कर्मचारी नेमले

  • उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांच्या वैयक्तिक आठ कर्मचाऱ्यांची संसदेच्या १२ स्थायी समित्या आणि स्थायी समित्यांशी निगडित विविध आठ विभागात नेमणूक केली आहे. ही माहिती बाहेर आल्यानंतर यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. उपराष्ट्रपती यांचे ओएसडी असलेले राजेश नाईक, खासगी सचिव सुजीत कुमार, अतिरिक्त खासगी सचिव संजय वर्मा आणि ओएसडी अभ्युदय सिंह शेखावत यांची वेगवेगळ्या समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्यसभा सभापतींच्या कार्यालयात ओएसडी अखिल चौधरी, दिनेश डी., कौस्तुभ सुधाकर भालेकर आणि खासगी सचिव अदिती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मंगळवारी यासंबंधीचे निवेदन जाहीर करण्यात आले. राज्यसभेच्या सचिवांनी सांगितले की, विविध समित्यांवर उपरोक्त अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती केली जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते या पदांवर असतील. इंडियन एक्सप्रेसला नाव न सांगण्याच्या अटीवर राज्यसभेतील एका ज्येष्ठ खासदाराने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या नेमणुका करून राज्यसभेच्या इतिहासातील अभूतपूर्व असा आदेश देण्यात आला आहे.
  • काँग्रेसचे लोकसभेतील खासदार मनीष तिवारी यांनी ट्वीट करत म्हटले, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती आहेत. ते उपसभापतींसारखे राज्यसभेचे सदस्य नाहीत. ते संसदीय समित्यांवर त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांना कसे काय नेमू शकतात? हे एक प्रकारे संस्थात्मक रचनेचे अपहरण नाही का?

महिला सबलीकरणासाठी सरकार कटिबद्ध- मोदी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताच्या प्रगतीमध्ये महिलांनी बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले, की आपले सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी अविरत काम करत राहील.
  • या संदर्भात मोदींनी ‘ट्वीट’ केले, की आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमच्या महिलाशक्तीच्या कामगिरीबद्दल सलाम! देशविकासात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. आमचे सरकार महिला सबलीकरण प्रक्रिया अविरत चालण्यासाठी काम करत राहील. यावेळी मोदींनी विविध क्षेत्रांत यशोशिखर गाठणाऱ्या महिलांची संकलित माहिती ‘ट्विटर’वर प्रसृत केली. या महिलांच्या कामगिरीविषयी त्यांनी यापूर्वी आपल्या ‘मन की बात’ संवादसत्रात माहिती दिली होती.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘नारी शक्ती’ने विविध क्षेत्रांत दिलेल्या गौरवशाली योगदानाचे स्मरण केले. त्यांनी ‘ट्वीट’ केले, की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील हे सरकार विविध प्रभावी योजना व उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे. लष्करात सियाचीनमध्ये तैनात होण्यापासून ते युद्धनौकांवर सेवेपर्यंत भारतीय महिला सशस्त्र दलांतील प्रत्येक आव्हानांवर सक्षमतेने मात करत आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना स्वावलंबी भारताच्या विकासगाथेत महिला शक्तीच्या योगदानाची प्रशंसा केली.

कृषी आणि सेवा क्षेत्रांत राज्याला फटका, दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर

  • कृषी आणि सेवा क्षेत्राने करोना काळातही राज्याला आधार दिला होता. करोनातून राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येत असली तरी गतवर्षाच्या तुलनेत कृषी आणि सेवा या दोन महत्त्वांच्या क्षेत्रांमध्ये राज्याची पिछेहाट झाली आहे. याशिवाय दरडोई उत्पन्नात महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य पाचव्या क्रमांकावर मागे पडले आहे.
  • देशाचा विकासाचा दर सात टक्के असताना २०२२-२३ या वर्षात राज्याचा विकास दर हा ६.८ टक्के असेल. राष्ट्रीय विकास दराच्या तुलनेत महाराष्ट्राचा विकास दर कमी आहे. कृषी क्षेत्रात १०.२ टक्के, उद्योग क्षेत्र ६.१ टक्के, तर सेवा क्षेत्राचा विकास दर हा ६.१ टक्के अपेक्षित धरण्यात आला आहे. राज्याची निम्मी लोकसंख्या ही कृषी किंवा कृषीवर आधारित उद्योगांवर अवलंबून असते. २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर ११.४ टक्के होता. या तुलनेत चांगला पाऊस होऊनही विकास दर घटला आहे.
  • सेवा क्षेत्राने राज्याला गेली काही वर्षे चांगला हात दिला. आधीच्या वर्षी सेवा क्षेत्राचा विकास दर १०.६ टक्के होता. पण चालू आर्थिक वर्षात हा दर ६.४ टक्क्यांपर्यंत घटणार आहे. सेवा क्षेत्रातील घट ही आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी राज्यासाठी चिंतेची बाब आहे.
  • दरडोई उत्पन्नात कर्नाटक, तेलंगणा, हरयाणा आणि तमिळनाडू या चार राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले आहे. दरडोई उत्पन्नात २०२१-२२ या वर्षात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर होते. कर्नाटक (२,७८,७८६), तेलंगणा (२,७५,४४३), हरयाणा (२,७४,६३५), तमिळनाडू (२,४१,१३१), तर महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे २ लाख १५ हजार २२३ होते.

माध्यमिक शाळांमधील मुलींच्या पटसंख्येत १६ टक्क्यांनी घट

  • राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींची पटसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १६ टक्क्यांनी घसरली आहे. करोनानंतरच्या काळात मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर घसरणे चिंताजनक आहे. त्या तुलनेत प्राथमिक शाळांमधील पटसंख्येची मुलींची पटसंख्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत ४७.१ टक्क्यांवरुन ४७.३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
  • करोनाकाळात सर्वानाच मोठा आर्थिक फटका बसला. आर्थिक दुरवस्थेमुळे मुलींना माध्यमिक शाळांमधून काढून शेतमजुरी, नोकरी, व्यवसायाला लावणे किंवा त्यांचे विवाह लावून देण्याचे प्रमाण वाढले असावे, असा अंदाज आहे. प्राथमिक शाळांमध्ये सुमारे एक कोटी ५४ लाख विद्यार्थी शिकत असून त्यापैकी ४७.३ टक्के मुली आहेत. माध्यमिक शाळांच्या तुलनेत प्राथमिक शाळांमधील मुलींचे प्रमाण बरेच घटले असल्याने राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांना ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
  • अनेक प्राथमिक शाळांना राज्य सरकारने अनुदान सुरू केल्याने स्वयंअर्थसहाय्यित शाळांची एकूण शाळांशी असलेली टक्केवारी २१.६ टक्क्यांवरुन १६.३ टक्क्यांवर घसरली आहे. मात्र शाळांमधील शिक्षकांची संख्या १० हजाराने कमी होऊन पाच लाख इतकी झाली आहे.
  • राज्यात सहा विद्यापीठांची भर : राज्यातील विद्यापीठांची संख्या ६५ वरून ७१ झाली असून महाविद्यालयांची संख्या ४४९४ वरून ४५३२ इतकी झाली आहे. उच्चशिक्षण संस्थांमधील महिलांची टक्केवारी ४५.१९ टक्के इतकी झाली आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २०२१-२२ या वर्षांत उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी आदी विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात आला आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल: चेल्सीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

  • रहीम स्टर्लिग आणि काय हावेट्झ या आक्रमकपटूंनी केलेल्या गोलच्या बळावर चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात बुरुसिया डॉर्टमंडवर २-० असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. चेल्सीचा संघ पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतर ०-१ असा पिछाडीवर होता. मात्र, दोन सामन्यांनंतर चेल्सीने २-१ अशा एकूण फरकासह आगेकूच केली.
  • सामन्याच्या सुरुवातीला डॉर्टमंडच्या बचावफळीने चेल्सीवर दडपण निर्माण केले. ४२व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र, ४३व्या मिनिटाला स्टर्लिगने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
  • मध्यंतरापर्यंत चेल्सीकडे ही आघाडी कायम होती. दुसऱ्या सत्रात ५३व्या मिनिटाला चेल्सीला पेनल्टी मिळाली. यावर हावेट्झला गोल करण्यात अपयश आले. मात्र, त्याने पेनल्टी मारण्यापूर्वीच दोन्ही संघांच्या काही खेळाडूंनी गोलकक्षात प्रवेश केल्याचे पंचांच्या निदर्शनास आल्याने हावेट्झला पुन्हा पेनल्टी मारण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने कोणतीही चूक न करता चेल्सीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. चेल्सीने मग भक्कम बचाव करताना विजय मिळवला आणि पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 09 मार्च 2022

 

जर्मन खुली बॅडिमटन स्पर्धा - सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी :
  • दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या भारतीय खेळाडूंनी जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) विजयी सलामी दिली.

  • सातव्या मानांकित सिंधूने मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानला २१-८, २१-७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या बुसाननवरील सिंधूचा हा १५वा विजय ठरला. तिचा पुढील फेरीत स्पेनची बिएट्रीझ कोरालेस आणि चीनच्या झांग यी मान यांच्यातील विजेतीशी सामना होईल.

  • पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आठव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेर्डेझवर २१-१०, १३-२१, २१-७ अशी मात केली. श्रीकांतचा हा लेव्हेर्डेझवरील सलग चौथा विजय ठरला. दुसऱ्या फेरीत श्रीकांत चीनच्या लू गुआंग झू याच्याविरुद्ध खेळेल.

साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले :
  • साताऱ्यातील सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी मागील ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले झाले आहेत. सैनिक स्कूलमध्ये ६११ विद्यार्थिनींमधून पहिल्यांदाच दहा मुली प्रवेश प्रक्रिया पार पाडून दाखल झाल्या आहेत. देशातील पहिल्या  सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरू झाले आहे.

  • जागतिक महिला दिनानिमित्त सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या १० मुलींशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने २३ जून १९६१ रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात सुरू झाली. या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण दिले जाते. ६४० विद्यार्थी येथे शिकतात. पैकी १० मुलींना यावर्षी प्रथमच प्रवेश मिळाला आहे. निवासी शाळेत शिकणारी ही मुलींची पहिलीच बॅच आहे.

  • सैनिक स्कूलचे उपप्राचार्य िवग कमांडर बी लक्ष्मीकांत यांनी  सांगितले की आत्तापर्यंत या शाळेत केवळ मुलांना प्रवेश दिला जात होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय मागील वर्षी शासनाने घेतला. त्यामुळे  सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी गेल्या ६१ वर्षांत  खुले झाले. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांसाठी १० मुलींना निवासी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. यात दोन पश्चिम बंगालच्या, एक बिहारची तर उर्वरित सात विद्यार्थिनी महाराष्ट्रातील आहेत. भविष्यात मुलींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.

“इस्लामिक नियमांनुसार महिलांना…”; तालिबानने दिलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छा चर्चेत :
  • मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. पूर्ण दिवस महिला दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. अनेक ठिकाणी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार आणि राजकारण्यांनी देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तालिबानने तिथल्या महिलांसाठी एक संदेशही दिलाय.

  • “आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी सांगू इच्छितो की, इस्लामिक नियमांनुसार महिलांना त्यांचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. ते याचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्या न्याय्य गरजा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरक्षित वातावरण देण्यासाठी IEA वचनबद्ध आहे,” असे ट्वीट यूएनमध्ये अफगाणिस्तानचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेले आणि तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी केले.

  • तालिबाननं दिलेल्या शुभेच्छांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे दोन महिन्यांपूर्वी काम आणि शिक्षणाच्या हक्कांची मागणी करत काबूलमध्ये आंदोलन करणाऱ्या महिलांच्या गटाला पांगवण्यासाठी तालिबान सैन्याने मिरपूड स्प्रेचा वापर केला होता. त्याशिवायही अनेकदा अफगाणिस्तानमध्ये महिलांवर तालिबानने बंधने लादली आहेत.

आंतरराष्ट्रीय विमान सेवेला आकाश मोकळे ; २७ मार्चपासून सेवा पूर्ववत :
  • करोनाकाळातील दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला आकाश मोकळे झाले आह़े  २७ मार्चपासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केल़े करोना प्रादुर्भावामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा २३ मार्च २०२० रोजी स्थगित केली होती़  मात्र, जुलै २०२० पासून ३७ देशांशी कराराद्वारे भारताने विशेष विमानसेवा सुरू ठेवली होती़  

  • आता करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, असे हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितल़े  या निर्णयामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला़ जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण वाढले आह़े  या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला़.

  • या सेवेसाठी आरोग्य मंत्रालयाने  प्रसृत केलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे हवाई वाहतूक मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केल़े हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील स्थगिती २६ मार्चपर्यंत राहील़  त्यानंतर  २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल.

सुमीमधून ६९४ भारतीय विद्यार्थ्यांची सुटका :
  • सुमी शहरातून अडकलेल्या नागरिकांना स्थलांतरीत करण्याचा पहिला टप्पा सुरू झाल्याची माहिती युक्रेन सरकारने मंगळवारी दिली. यात ६९४ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

  • युक्रेनच्या माहिती आणि प्रसारण विभागाने या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे, की सुमी शहरातून सुरक्षित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) देण्यात आला असून, येथून स्थलांतराचा पहिला टप्पा सुरू झाला.  केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांना सांगितले की, सुमीमध्ये ६९४  भारतीय विद्यार्थी अडकले होते. ते मंगळवारी बसने पोल्टावाला सुरक्षित स्थळी रवाना झाले.

  • रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना वारंवार आग्रह करूनही सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार झाला नसल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत याआधी भारताने चिंता व्यक्त केली होती. मात्र, मंगळवारी येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग दिसू लागल्याने सर्वानीच नि:श्वास सोडला. त्यांना लवकरच पोल्टावा येथे आणण्यात येईल. त्याबाबत प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली. 

महिला दिन विशेष - त्या दोघींनी घेतला पोलीस अधिक्षक पदाचा अनुभव :
  • जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दोन मुलींनी रायगड पोलीस अधिक्षक पदाचा अनुभव घेतला. पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सिमरन घातानी आणि देवश्री निगडे या दोन मुलींनी पोलीस अधिक्षकांच्या खुर्चीत बसून या पदाची अनुभूती घेतली.

  •  देवश्री निगडे हिला दुर्धर आजाराने ग्रासली होती. तर सिमरन घातानी ही अपघातातून थोडक्यात बचावली होती. या दोन्ही मुलींचे मनोबल उंचावण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस अधिक्षकांच्या गाडीतून दोघींनाही सन्मानाने कार्यालयात आणण्यात आले. यावेळी त्यांना सशस्त्र पोलीसांनी सलामी दिली.

  • पोलीस अधिक्षक दुधे यांनी दोघींचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दोघींनाही पोलीस अधिक्षकांच्या दालनात नेण्यात आले. त्यांच्या खुर्चीत बसून दोघींनीही पोलीस अधिक्षकांच्या पदाचा अनुभव घेतला. पोलीस कन्ट्रोल रुमशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तर वायरलेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील पोलीसांना संदेशही पाठविला.

०९ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.