चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ जून २०२१

Date : 9 June, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
द. अफ्रिका जागवणार ‘त्या’ सत्याग्रहाची आठवण :
  • दक्षिण आफ्रिकेच्या पीटरमारिट्जबर्ग येथे महात्मा गांधींना धक्का देऊन ट्रेनमधून खाली उतरवले होते. या घटनेला १२८ वर्ष पुर्ण झाले आहेत. या निमित्ताने जगातील विविध विद्वानांनी राष्ट्रपिताच्या संदेशांबद्दल चर्चा केली जे आजही जगासाठी उपयुक्त आहेत. महात्मा गांधींना सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देणारी घटना ७ जून १८९३ ला घडली होती. ज्यामध्ये त्यांना वांशिक भेदाचा सामना करावा लागला होता.

  • पीटरमारिट्जबर्ग गांधी स्मारकाचे अध्यक्ष डेविड गेनगान म्हणाले, समितीने काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता की, ७ जून, १८९३ ची घटना आणि त्याचा तरुण गांधींवर झालेला परिणाम यावर दरवर्षी चर्चा सत्र घेतले जाईल. डेविड म्हणाले की, गांधी चळवळीचे मुख्य शस्त्र सत्याग्रहाचे बीज ७ जून १८९३ च्या रात्री पिटरमारिट्जबर्ग येथे पेरण्यात आले होते.

  • महात्मा गांधी सुमारे २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहिले. यावेळी त्यांच्या तात्विक कल्पना विकसित केल्या. अहिंसा व सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. दरवर्षी ही घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी ही चर्चा आयोजित केली जाते. परंतु करोना साथीच्या आजारामुळे चर्चा ऑनलाईन माध्यमातून आयोजित केली जात आहे.

‘ही’ परीक्षा घरूनच द्या… आता लर्निंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही :
  • करोनामुळे कार्यालये बंद असल्याने आणि निर्बंध असल्यामुळे प्रवास करण्यावर मर्यादा येत असल्याने अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या या समस्येवर पर्याय शोध महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसे आदेश राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी नागरिकांना आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

  • महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेबद्दलची माहिती दिली. लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओकडून परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लर्निंग लायसन्स दिलं जातं. ही परीक्षा आरटीओ कार्यालयातच घेतली जात होती. त्यामुळे नागरिकांकडे कार्यालयात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. करोना लॉकडाउनमुळे या परीक्षेबद्दल राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.

  • राज्यात आता लर्निंग लायसन्ससाठी द्यावी लागणारी परीक्षा घरातूनच देता येणार आहे. यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे. “परिवहन विभागाने राज्यातील ५० आरटीओ कार्यालयाना मंगळवारी तसे आदेश दिले आहेत. या सुविधेमुळे आर्थिक आणि सामाजिक लाभ होणार आहे. कार्यालयात होणार गर्दी कमी होणार असून, दलाली संपेल आणि भ्रष्टाचारही कमी होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरील कामांचा भार कमी होणार असून नागरिकांच्या वेळेत व खर्चात बसत होईल,” असं ढाकणे म्हणाले. ही सुविधा पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्र सरकारने करोना लसीच्या डोसची किंमत केली निश्चित! खासगी रुग्णालयात ‘हे’ असतील दर :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे देशातील १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील आता मोफत लसींचा पुरवठा केला जाणार असून त्यासाठी केंद्र सरकारच लसीचे डोस खरेदी करणार आहे.

  • यासाठी देशातील लस उत्पादकांकडून ७५ टक्के लसीचे डोस केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यासोबतच उर्वरीत २५ टक्के लसी खासगी क्षेत्रात उलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • आता खासगी क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये देखील करोनाच्या लसींच्या कमाल किंमती किती असतील, हे केंद्र सरकारने निश्चित करून दिलं आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना देखील सरकारने ठरवून दिलेल्या दरांनाच लसीची विक्री करता येणार आहे.

बारावीचा निकालही मूल्यांकनाच्या फेऱ्यात :
  • दहावीच्या तीस गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनाचा पेच शाळांच्या मुख्याध्यापकांना अजूनही पुरता सोडवता आलेला नसताना आता बारावीच्या मूल्यमापनाबाबत नवा गोंधळ  सुरू झाला आहे. बारावीचे मूल्यमापनही दहावीच्या सूत्राप्रमाणे करण्याचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.

  • राज्यमंडळाच्या दहावी परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर मूल्यमापनावरून निर्माण झालेला संभ्रम दूर झालेला नाही. नववीचे पन्नास टक्के गुण आणि दहावीच्या वर्षांतील कामगिरीवर आधारित पन्नास टक्के गुण असे निकालसूत्र दहावीसाठी निश्चित करण्यात आले.

  • दहावीच्या गुणांतील पन्नास टक्क्य़ांचे मूल्यमापन कसे करावे असा शाळांसमोरील प्रश्न अद्यापही कायम आहे. आता या निकालगोंधळात बारावीच्या मूल्यमापनाचीही भर पडली आहे. 

  • बारावीचे मूल्यांकनही अकरावीचे आणि बारावीच्या वर्षांतील परीक्षांचे गुण मिळून करण्यात येणार आहे. अकरावीच्या गुणांसाठी पन्नास टक्के भारांश आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरीसाठी पन्नास टक्के भारांश ग्राह्य़ धरण्याचे सूत्र अवलंबिण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात २२२२ नव्या पदांसाठी भरती! दर्जेदार आरोग्य सेवेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! :
  • राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

  • या आरोग्य संस्थांसाठी ८१२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ११८४ कुशल मनुष्यबळ सेवा, २२६ अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण २२२२ पदे उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत होईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

  • ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाले आहे, तसेच काम पूर्ण झालेल्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.

  • रुग्णसेवा पुरवण्यासाठी या रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्यास मान्यता मिळाली असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.

ठरलं तर..! ‘ऐतिहासिक’ सामन्यासाठी ICCनं केली पंचांची निवड :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील मॅच रेफरी आणि पंचांची नावे जाहीर केली आहेत. या सामन्यासाठी ख्रिस ब्रॉड मॅच रेफरी असतील. तर आयसीसी एलिट पॅनेलमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गफ मैदानावरील पंच असतील.

  • रिचर्ड केटलबरो हे टीव्ही पंच असतील, तर अ‍ॅलेक्स व्हार्फ हे चौथे पंच असतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्प्टन येथे अंतिम सामना होणार आहे.

  • आयसीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (पंच व रेफरी) अ‍ॅड्रियन ग्रिफिथ म्हणाले, “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पंच आणि इतर सदस्यांची अनुभवी टीम जाहीर करण्यात आम्हाला आनंद झाला. या महामारीत हे सोपे काम नव्हते. अनेक वर्षांपासून ही मंडळी सातत्याने उत्कृष्ट काम करीत आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.”

०९ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.