दिवसागणित देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात महाराष्ट्रासह देशातील १० राज्यात करोनाचा विळखा आधिक वाढला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दहा राज्यात घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाची वाढती लोकसंख्या पाहून हा निर्णय घेतला आहे. दहा राज्यातील ३८ जिल्ह्यात तातडीची चाचणी आणि आवश्यक ती निगराणी ठेवली जाणार असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यामुळे संसर्ग आणि मृत्यू दर रोखण्यास मदत होईल, असा विश्वास मोदी सरकारला आहे.
आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध ४५ महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत प्रीती सुदान यांनी सांगितले की, ‘लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह १० राज्यांनी येत्या काही महिन्यात जिल्हानिहाय नियोजन करावं.
कंटेन्मेंट झोनमध्ये केसेसचं व्यवस्थापन आणि बफर झोनमध्ये काटेकोर निगराणी यावर लक्ष देण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.’ महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या १० राज्यातील ३८ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जी-७ विस्ताराच्या योजनेचा भाग बनत असतानाच अमेरिकेसोबत काम करून भारताला आनंदच होईल,” असं मत भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू यांनी व्यक्त केलं. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनद्वारे चर्चा झाली. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी जी-७ चा विस्तार करण्याचं तसंच त्यामध्ये भारत आणि अन्य देशांना सामिल करून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच त्यांच्या या प्रस्तावावर भारताकडूनही सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. यावरून येत्या काळात भारत जी-७ चा भाग बनू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे सतत एकमेकांच्या संपर्कात आहेत. याव्यतिरिक्त दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारीही सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात. २ जून रोजी पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या अन्य मुद्द्यांसह जी-७ शी निगडीत काही मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांची जी-७ चा विस्तार करण्याची इच्छा आहे. तर भारतालाही अमेरिकेसोबत काम करण्यास आनंद होईल,” असं संधू म्हणाले. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलं.
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळे भाविकांसाठी उघडण्याक आली आहेत. यात अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर, दिल्लीतील प्रसिद्ध छतरपूर मंदिर आणि उत्तराखंडमधील अनेक मंदिरांचा समावेश आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमीमंदिर दररोज सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायं. ६ या वेळेत खुले राहणार आहे. टाळेबंदीच्या सध्याच्या टप्प्यात अधिकाऱ्यांनी भाविकांची संख्या एका वेळी पाचपुरती मर्यादित केल्याने पहिल्या दिवशी फार कमी भाविक दर्शनासाठी आले होते.
दिल्लीतील प्रसिद्ध छतरपूर मंदिर परिसर सकाळी पावणेनऊच्या सुमारास उघडण्यात आले. पहिल्या तासाभरात सुमारे ३०० भाविकांनी दर्शन घेतले.
करोनाच्या पाश्र्वभूमीवर पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असलेल्या संचारबंदीमुळे जामा मशीद पहिल्या नमाजासाठी उघडण्यात आली नाही, असे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी सांगितले.
करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीचा फटका विविध आवास योजनांनाही बसला असून प्रधानमंत्री आवास योजनेतील केवळ ३० टक्के घरकुले पूर्ण झाली आहेत. हीच स्थिती रमाई, शबरी आवास योजनांची आहे. अनेक ठिकाणी घरकुलांची कामे अर्धवट स्थितीत अडकून पडल्याने लाभार्थी हतबल झाले आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाळ जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येतात.
सद्य:स्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेत २०१९-२० या वर्षांसाठी २४ हजार १२५ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या पैकी १६ हजार ९५६ लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणाली द्वारे मंजुरी देण्यात आली. पहिला हप्ता १५ हजार १५२ लाभार्थ्यांना, दुसरा हफ्ता ११ हजार ३२०, तर तिसरा हफ्ता ८ हजार ६१० लाभार्थ्यांना देण्यात आला.
५ हजार २८६ घरकुले पूर्ण झाली आहेत. इतर घरकुलांची कामे अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. रमाई आवास योजनेत ३ हजार लक्षांक प्राप्त होता. यापैकी २ हजार ३२२ लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे मंजुरी देण्यात आली होती. शबरी आवास योजनेत २ हजारांचे उद्दिष्ट होते, त्यापैकी १ हजार ५०६ लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे मंजुरी देण्यात आली. पहिला हप्ता ६७९ तर दुसरा हफ्ता ४७९ व तिसरा हफ्ता ३१० लाभार्थ्यांंना देण्यात आला. केवळ १०८ घरकुले पूर्ण झाली आहेत. पंडित दीनदयाळ जागा खरेदी अर्थसहाय योजना अंतर्गत अद्यापपर्यंत २४८ लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्याकरिता निधीचे अर्थसहाय करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत ७५ लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत लाभ देण्यात आला आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.