चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ जानेवारी २०२१

Date : 9 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डोनाल्ड ट्रम्प यांची ‘टिवटिव’ कायमची बंद; हिंसाचारानंतर ट्विटरचा मोठा निर्णय :
  • अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत ट्रम्प समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या भयंकर हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे.

  • दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. ट्रम्प समर्थकांनी संसदेत शिरत प्रचंड हिंसाचार घडवून आणला.

  • या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचे काही ट्विट्स डिलीट केले होते. त्याचबरोबर अकाऊंटही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही कालावधीत केलेले ट्विट आणि त्यांच्या संदर्भाची समीक्षा केल्यानंतर त्यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसा आणखी भडकावण्याची शक्यता असून, ही कारवाई करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. देशात लवकरच लसीकरणास सुरुवात होणार असून नरेंद्र मोदी याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदींनी ही बैठक बोलावली आहे.

  • ‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही करोना लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी ३ जानेवारीला परवानगी दिली. त्यामुळे आता लसीकरण मोहीम केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा आहे. लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही, असं औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी स्पष्ट केलं होतं. कोव्हिशिल्ड ७०.४२ टक्के परिणामकारक, तर कोव्हॅक्सिन सुरक्षित असून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करते, अशी पुष्टीही सोमानी यांनी जोडली होती.

  • दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लवकरात लवकर पुढील काही दिवसांत लस उपलब्ध होईल असं सांगितलं आहे. लसीकरणाबद्दल प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहाचावी यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी देशभरात ड्राय रनचा दुसरा टप्पा पार पडला. याचा आढावा त्यांनी घेतला.

९४ वे साहित्य संमेलन नाशिकलाच; ठाले पाटलांची औरंगाबादेत घोषणा :
  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

  • ९४व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारत ९४व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली.

  • दरम्यान, गेल्या वर्षीचं ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडलं होतं. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतलं जावं अशी मागणी होत होती. ९३ व्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी झाली होती. मात्र, यामध्ये उस्मानाबादचे पारडे जड ठरले होते.

टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य :
  • जपानसह काही देशांमध्ये करोनाची साथ पुन्हा तीव्र झाल्यामुळे येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यांत लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अवघड आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

  • टोक्योसहित काही राज्यांमध्ये जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी गुरुवारी आणीबाणी जाहीर केली आहे. यासंदर्भात कॅनडाचे ‘आयओसी’ सदस्य रिचर्ड पौंड यांनी ‘बीसीसी’ वृत्तवाहिनीवर म्हटले की, ‘‘सध्या करोना संसर्गाची रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे ऑलिम्पिकबाबत अनिश्चितता पसरली आहे.’’

  • जपानमध्ये गुरुवारी २,४४७ नव्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे लागू करण्यात आलेली आणीबाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत असेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या परिस्थितीतही ऑलिम्पिक होईल, अशी संयोजकांना आशा आहे. परंतु याकरिता कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, असे पौंड यांनी सांगितले. खेळाडूंना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन पौंड यांनी केले आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात ऑलिम्पिक आयोजित केले जाणार आहे.

कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या :
  • पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक कोंढवी किल्लय़ावर भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार समयी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील १५ मुर्त्यां सापडल्या आहेत.

  • तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी येथे मंदिराचे काम करतेवेळी पाण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील पंधरा मुर्त्यां सापडल्या या मूर्तीमध्ये भैरी ,जोगेश्व्री ,वाघजाई, वीर मूर्ती, तसेच गणेश मूर्ती इत्यादी मूर्तिंचा समावेश आहे. मोठय़ा प्रमाणात मुर्ति सापडल्यामुळे पोलादपूर तालुक्यासह कोकणातील भाविकांची या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे

  • तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी सह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजू पाण्याची साठवण टाकी साठी खोदकाम करीत असताना या मुर्त्यां आढळून आले आहेत.

  • या मुर्त्यां मध्ययुगीन व शिवकाळातील असून सदर मुत्यांमध्ये श्री गणेश, भैरी जोगेश्वरी वाघजाई वीर मुर्त्यां इत्यादींचा समावेश आहे कोकण इतिहास परिषदेचे प्रा.अंजय धनावडे तसेच इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी या मूर्त्यां संदर्भात या मुर्त्यां चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत असल्याचे नमूद केले आहे सदर मुर्ती या अगोदर सुद्धा येथे शिव लिंगाखालील पीठ,दिवा,तसेच मध्ययुगीन भांडय़ांचे अवशेष सापडले आहेत.

०९ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.