चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ ऑगस्ट २०२१

Updated On : Aug 09, 2021 | Category : Current Affairs


संयुक्त पूर्वपरीक्षार्थीमध्ये अभ्यासक्रमाबाबत संभ्रम :
 • राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा ४ सप्टेंबरला होणार आहे. परीक्षा तब्बल चार वेळा स्थगित करून अडीच वर्षांनी होणार असल्याने ‘चालू घडामोडी’ या विषयाच्या अभ्याक्रमाचा कालावधी नेमका कुठला असेल याविषयी परीक्षार्थीमध्ये संभ्रम आहे. मात्र, इतक्या कालावधीनंतरही परीक्षा होत असतानाही आयोगाकडून यासंदर्भात कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.

 • राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा अवांतर असला तरी आयोग विविध विषयांचा अभ्यासक्रम निश्चित करून देतो. यातील बहुतांश विषयांमध्ये फारसा बदल होत नसला तरी ‘चालू घडामोडी’ हा दैनंदिन विषय असल्याने त्यात बदल अपेक्षित असतो. त्यामुळे आयोग ‘चालू घडामोडीं’साठी परीक्षेच्या तारखेनुसार एक निश्चित कालमर्यादा ठरवून देत असते. त्यामुळे विद्यार्थी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यासही परीक्षेच्या तारखेचा अंदाज घेऊन करीत असतात.

 • मात्र, मार्च २०२०मध्ये लागलेली टाळेबंदी व अन्य कारणांनी आयोगाने संयुक्त पूर्व परीक्षा तब्बल चारदा स्थगित केली. पहिल्यांदा ही परीक्षा एप्रिल २०२० ला होणार होती. त्यानंतर करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर ११ ऑक्टोबर २०२० परीक्षा होणार होती. मात्र, ११ ऑक्टोबर २०२०ची परीक्षा अगदी तोंडावर आली आली असताना मुख्यमंत्र्यांनी ९ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाचा धसका घेत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

 • त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये परीक्षेची तारीख जाहीर केली होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर आता आयोगाने ४ सप्टेंबरला परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. परीक्षेची मूळ तारीख आणि आताच्या कालावधीत तब्बल दोन वर्षे चार महिन्यांचा कालावधी लोटून गेल्याने परीक्षेमध्ये विशेषत: ‘चालू घडामोडी’ विषयाच्या अभ्यासक्रमात बदल होणार की जुन्याच तारखेच्या आधारावर अभ्यासक्रम राहणार?असा सवाल परीक्षार्थीसमोर आहे.

अमेरिकेतील ‘या’ शहरात परिस्थिती गंभीर; फक्त सहा ICU बेड उपलब्ध :
 • अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दररोज १ लाखाच्या घरात रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. अमेरिकेत आढळत असलेल्या बहुतांशी रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे. डेल्टा व्हेरिएंट हा करोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा खूप वेगाने पसरतो. दरम्यान, अमेरिकेत ५० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय तरी करोनाचा धोका वाढतोय. टेक्सास राज्याची राजधानी ऑस्टिन मध्ये परिस्थिती चिंताजनक असून इथं केवळ ६ आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. इथली करोनाची परिस्थिती भयानक झाली आहे. ऑस्टिनची लोकसंख्या जवळजवळ २४ लाख असून याठिकाणी केवळ ६ आयसीयू आणि ३१३ व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहे.

 • सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय संचालक देसमार वॉल्क्स यांनी शनिवारी एका निवेदनात म्हटले की, “परिस्थिती गंभीर असून याबाबत इथल्या रहिवाशांना आम्ही मेसेज, ईमेल आणि फोन करून सूचना पाठवत आहोत. सध्या आमच्या रुग्णालयांवर आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण असून आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नाही. गेल्या महिन्यात  रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सात दिवसांची सरासरी ६००% पेक्षा जास्त वाढल्यानंतर धोका वाढला. तर अतिदक्षता विभागातील रुग्णांमध्य तब्बल ५७०% वाढ नोंदवली गेली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या ४ जुलै रोजी ८ इतकी होती ती आता १०२ झाली आहे. “हॉस्पिटलच्या बेडची उपलब्धता आणि क्रिटिकल केअर सेंटरची संख्या अत्यंत मर्यादित आहे.”

 • डेल्टा व्हेरिएंटमुळे रिस्क लेव्हल ५ व्या टप्प्यावर पोहोचल्याची घोषणा आरोग्य विभागाने केली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात परिस्थिती गंभीर झाल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑस्टिनमधील रहिवाशांना लसीकरण करण्यास, घरीच राहण्यास सांगण्यात आलंय. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनी देखील मास्क घालावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ ऑस्टिनच नाही तर अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. इथे दिवसाला १ लाखांपर्यंत रुग्ण आढळत आहेत. ही रुग्णसंख्या सहा महिन्यांपूर्वी हिवाळ्यात होती. दरम्यान रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर त्यातून करोनाची जीवघेणी रुपं म्युटंट होतील, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सूत्रे भारताच्या हाती; नरेंद्र मोदी ठरणार चर्चेच्या अध्यक्षपदी असणारे पहिले भारतीय पंतप्रधान : 
 • १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारले आहे. त्यानुसार सोमवारी सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन महत्त्वाच्या विषयांवरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या सागरी सुरक्षेवर डिजिटल माध्यमाद्वारे चर्चा करणार आहेत.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सागरी सुरक्षेवर डिजिटल माध्यमाद्वारे चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेच्या अध्यक्षपदी असणार आहेत. चर्चेचा विषय ‘समुद्री सुरक्षेला प्रोत्साहन देणे: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ असा असणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यालया माहितीनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेचे अध्यक्ष असलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. सागरी गुन्हेगारी आणि असुरक्षिततेसोबत प्रभावीपणे लढण्यासाठी आणि सागरी क्षेत्रात समन्वय मजबूत करण्यासाठी या चर्चेवर लक्ष केंद्रित केले जाईल.

 • “या बैठकीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देशांचे राज्य आणि सरकार प्रमुख आणि संयुक्त राष्ट्र यंत्रणेतील उच्च स्तरीय तज्ञ आणि प्रमुख प्रादेशिक संघटना उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सागरी सुरक्षा आणि सागरी गुन्हेगारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली आहे आणि अनेक ठराव पारित केले आहेत. सागरी सुरक्षेवर उच्चस्तरीय खुल्या चर्चेत एक विशेष अजेंडा म्हणून एकत्रपणे चर्चा केली जाईल अशी पहिलीच वेळ आहे,” असे पंतप्रधान कार्यालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले.

संपूर्ण भारतीय बनावटीच्या INS Vikrant ची यशस्वी चाचणी; लवकरच भारतीय नौदलात होणार दाखल : 
 • संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ ही नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. खोल समुद्रातील चाचण्यांकरता गेल्या आठवड्यात ‘विक्रांत’ कोची बंदरातून रवाना झाली होती. या चाचण्या यशस्वी करत ४० हजार टन वजनाची ‘आयएनएस विक्रांत’ रविवारी कोची बंदरात परतली आहे. त्यामुळे आता लवकरच आता ती नौदलात दाखल होणार आहे.

 • खोल समुद्रातील चाचण्यांचा पहिला टप्पा यशस्वी करत विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत ही रविवारी कोची बंदरात परतली आहे. युद्धनौकेची बांधणी, युद्धनौकेचे मुख्य इंजिन, युद्धनौकेची वीज निर्मिती यंत्रणा, सहाय्यक पूरक यंत्रणा या सर्वांची चाचणी ही समाधानकारक झाल्याचं नौदलाने स्पष्ट केलं आहे.

 • यापुढेही आणखी विविध चाचण्या विमानवाहू युद्धनौकेच्या या समुद्रात होणार आहेत. करोनाचे संकट असताना पूर्ण काळजी घेत या चाचण्या सुरू असून २०२२ मध्ये विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास नौदलाने व्यक्त केला आहे.

आज गुगल डूडलवर झळकणारी भारतीय महिला आहे तरी कोण : 
 • आजचे गुगल डुडल अगदी खास आहे. भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली सगळी बंधन झुगारून देऊन अक्षरशः अवकाशात भरारी घेऊन भारतीय महिलांसाठी आदर्श ठरलेल्या सरला ठकराल यांची आज (८ ऑगस्ट) १०७ वी जयंती आहे.

 • सरला ठकराल यांनी तब्बल ८५ वर्षांपूर्वी जिप्सी मॉथ नावाच्या विमानाचे उड्डाण करून देशाची पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता. गुगलकडून ठकराल यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.

 • गुगलने आपल्या या डुडलबद्दल सांगताना म्हटले आहे, “आम्ही खरंतर गेल्या वर्षीच भारतात सरला ठकराल यांच्या सन्मानार्थ हे डूडल बनविण्याची योजना आखली होती. परंतु, केरळमध्ये झालेल्या दुःखद विमान दुर्घटनेनंतर आणि त्यासाठी सुरु असलेल्या मदतकार्यानंतर आम्ही हे डूडल थांबवलं.

 • आम्ही सहसा एकापेक्षा जास्त वेळा डूडल करत नाही. परंतु, ठकराल यांनी विमान उड्डाणाचं स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी कायमस्वरूपी ठेवलेला हा वारसा इतका प्रेरणादायी आहे कि, यंदा आम्ही ठकराल यांच्या सन्मानार्थ त्यांच्या १०७ व्या वाढदिवसानिमित्त हे डूडल बनविण्याचा निर्णय घेतला.”

१६ ऑगस्टपासून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार : 
 • करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य मंडळातर्फे सीईटी घेतली जाणार आहे.

 • या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. ११ प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 • १६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.  राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अमरावती, नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेळ केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतील. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

९४ व्या साहित्य संमेलनाआधीच ९५ व्याची लगबग : 
 • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यावर गेल्या आठवडय़ात शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ९५वे संमेलन घेण्यासाठी स्थळ ठरवण्यावर पदाधिकाऱ्यांमध्ये मंथन सुरू आहे.

 • पुढील वर्षांच्या मार्चअखेपर्यंत जमा-खर्चाचा ताळेबंद मांडण्यासाठी महामंडळाला सहा महिन्यांत दोन संमेलने घेणे सोयीस्कर व्हावे, या दृष्टीने ९५वे संमेलन घेण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पुढील वर्षी शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाने ९५ वे संमेलन घेण्याविषयीचा प्रस्ताव मागे घेतल्याने महामंडळाची अडचण झाली आहे. विदर्भ साहित्य संघाचा २०२३ मध्ये संमेलन घेण्याचा विचार आहे.

 • औरंगाबादमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत नाशिकमधील संमेलनाचे नियोजन, त्यासंदर्भाने पत्रव्यवहार करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, ९५ वे संमेलनस्थळ निवडण्यासह मार्गदर्शन समिती नियुक्त करण्याचाही विषय बैठकीच्या विषयपत्रिकेत होता. नाशिकचे संमेलन नोव्हेंबरमध्ये घेण्याची चर्चाही महामंडळाच्या बैठकीत झाली.

 • नोव्हेंबरमध्ये ९४ वे संमेलन घेण्यात आले तर पुढीलवर्षी मार्चच्या आत ९५ वे संमेलन घेण्यासाठी महामंडळाची घाई सुरू आहे. त्या अनुषंगाने संमेलनस्थळ निवडण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा विषय बैठकीत होता. मात्र, औरंगाबादबाहेरून आलेल्या महामंडळाच्या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आधी नाशिकचे नियोजित संमेलन करोना साथीच्या काळात निर्विघ्न पार पडू द्या, मग ९५ व्या संमेलनाबाबत ठरवू, अशी भूमिका मांडली.

०९ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)