चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ एप्रिल २०२१

Date : 9 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव :
  • करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

  • महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिलला आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. त्यानिमित्त लसीकरण महोत्सवाची घोषणा पंतप्रधानांनी केली.

  • करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशाजवळ पूर्वीपेक्षा अधिक संसाधने असून, आता ‘मायक्रो- कंटेनमेंट झोन्स’वर लक्ष केंद्रित करायला हवे यावर त्यांनी भर दिला. करोना महासाथीला आळा घालण्यासाठी ‘चाचणी करा, शोध घ्या, उपचार करा’ या पद्धतीवर मोदी यांनी भर दिला.

  • जनतेच्या सहभागासह आपले कठोर परिश्रम करणारे डॉक्टर्र्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळण्यात फार मोठा हातभार लावला असून अजूनही लावत आहेत, असे ते म्हणाले. ‘अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, करोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारतातील गरिबांची संख्या गेल्या वर्षभरात दुपटीहून अधिक :
  • गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील गरिबांच्या संख्येत, ४५ वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक भर पडली आहे.

  • गेल्या दशकभराच्या काळात सर्वात कमी आर्थिक वाढीची नोंद झाली असतानाच भारताला करोना महासाथीचा फटका बसला. ज्या ठिकाणी देशातील बहुतांश ग्राहक व गरीब लोक राहतात, त्या ग्रामीण भागावर मंदावणाऱ्या अर्थव्यवस्थेचा विपरीत परिणाम झाला आहे.

  • या संदर्भात कुठलीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी ग्रामीण भागातील दारिद्र्यातील वाढ कुणाच्याही लक्षात येऊ शकते. या भागात बेकारीचे प्रमाण मोठे होते; ग्राहकांचा खर्च (कंझ्युमर एक्सपेंडिचर) सतत कमी होत होता आणि विकासावरील खर्च अवरुद्ध झाला होता. हे तीन घटक एखाद्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य ठरवतात.

  • प्रामुख्याने असंघटित कामगार आणि गरीब यांचा समावेश असलेल्या ग्रामीण भारतीयांनी २०२१ साली एक वर्षभराहून अधिक काळ अनियमित रोजगारासह दिवस काढले आहेत. लोकांनी अन्नधान्यावरचा खर्च कमी केला आहे आणि धान्य महागल्यामुळे अनेकांनी मसुरीच्या डाळीसारखे प्राथमिक अन्नधान्य वापरणे सोडून दिले आहे.

भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry; स्वत:च्या नागरिकांनाही प्रवेश नाकारला :
  • देशात कोविड १९ विषाणूची दुसरी लाट अधिकच संसर्ग पसरवणारी ठरली आहे. मंगळवारी देशात १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे.

  • रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.

  • न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. भारतामधून येणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ही बंदी न्यूझीलंडचे नागरीक असणाऱ्या मात्र सध्या भारतात असणाऱ्या व्यक्तींनाही लागू असणार आहे.

  • भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आर्डेन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. न्यूझीलंड सरकारने जारी केलेली ही बंदी जवळजवळ दोन आठवडा कायम राहणार आहे. त्यामुळेच ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान कोणत्याही व्यक्तीला भारतामधून न्यूझीलंडला जाता येणार नाही. “या तात्पुरत्या निर्बंधांमुळे अडचणी निर्माण होतील याचा मला अंदाज आहे. मात्र त्याचबरोबरच प्रवाशांच्या माध्यमातून करोनासंदर्भात निर्माण होणारा धोका कमी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असंही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे.

विष्णू, गणपती-वरुण ऑलिम्पिकसाठी पात्र :
  • भारतीय नौकानयनपटूंनी गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरवला. विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीने ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला.

  • भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. नेत्रा कुमानन हिने बुधवारी लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते.

  • स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाआधी विष्णू तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गुरुवारी त्याने थायलंडच्या किराती बुआलाँग याचा पराभव करत एकूण दुसरे स्थान पटकावत टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. त्यानंतर चेंगाप्पा आणि ठक्कर या डोडीने ४९ईआर क्लास प्रकारात गुणतालिकेत सर्वोत्तम स्थान पटकावत ऑलिम्पिकचे स्थान प्राप्त केले. या दोघांनी इंडोनेशिया येथे झालेल्या २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.

  • ‘‘नौकानयनपटू, पालक आणि प्रशिक्षकांनी इतक्या वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले,’’ असे  भारताचे प्रशिक्षक टोमास्झ जानूझेवस्की यांनी ओमानहून सांगितले.

भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षक :
  • भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची अमेरिका हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • २०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरेंद्र सिंग यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याआधी त्यांनी महिला संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी निभावली होती.

  • ५५ वर्षीय हरेंद्र लवकरच आपल्या कुटुंबासह अमेरिकेत दाखल होणार आहेत. २०१८च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच २०१८ चॅम्पियन्स करंडक आणि २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती.

०९ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.