चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ सप्टेंबर २०२०

Date : 8 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संरक्षण तंत्रज्ञानात भारताची नवी झेप :
  • संपूर्ण देशी बनावटीच्या ‘हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमन्स्ट्रेटर व्हेइकल’ची (एचएसटीडीव्ही वाहन) यशस्वी चाचणी केल्यामुळे भारताने सोमवारी अमेरिका, रशिया आणि चीनशी बरोबरी साधली आहे. या कामगिरीमुळे भारताला अत्यंत प्रगत अशा ध्वनीपेक्षा वेगवान – हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती शक्य होणार आहे.

  • भारताने ही कामगिरी करून क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात अभूतपूर्व झेप घेतली आहे. ‘एचएसटीडीव्ही’ हे वाहन ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगवा इंधन तंत्रज्ञानावर आधारित असून ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केले आहे.

  • भारताला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार करण्यास त्याची मदत होणार आहे, असे ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ओदिशातील एपीजे अब्दुल कलाम प्रक्षेपण संकुलातून ‘एचएसटीडीव्ही’ वाहनाचे उड्डाण करण्यात आले. स्वदेशी ‘स्क्रॅमजेट’ तंत्रज्ञान वापरलेल्या वाहनाने अवकाशात यशस्वी झेप घेतली. सोमवारी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली.

  • ‘एचएसटीडीव्ही’ वाहन स्क्रॅमजेट इंजिनावर चालते. अनेक क्षेपणास्त्रांत रॅमजेट इंजिने वापरतात, पण स्क्रॅमजेट हे त्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान आहे. रॅमजेट इंजिन मॅक ३ इतका वेग वाहनास देऊ शकते, तर स्क्रॅमजेटने हे वाहन ‘मॅक ६’ म्हणजे ध्वनीवेगाच्या सहा पट अधिक वेगाने जाते.

सरकारचे नव्हे, देशाचे शैक्षणिक धोरण - पंतप्रधान :
  • परराष्ट्र धोरण वा संरक्षणविषयक धोरण हे कधी सरकारचे नसते, ते देशाचे धोरण असते, तसेच नवे शैक्षणिक धोरणही संपूर्ण देशाचे असून केंद्र सरकारचे नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. नव्या शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या राज्यपालांच्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी केले.

  • देशाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे माध्यम म्हणून शैक्षणिक धोरणाकडे पाहिले पाहिजे. हे धोरण राबवण्याची जबाबदारी फक्त केंद्राची नव्हे तर, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन अशा सगळ्या स्तरातील घटकांची आहे. पण शिक्षण धोरणात सरकारचा हस्तक्षेप आणि प्रभावही कमीत कमी असला पाहिजे. बदल होतात तेव्हा त्याबद्दल शंका उपस्थित करणे गैर नसते. कला, वाणिज्य, विज्ञान हे शैक्षणिक कप्पे काढून टाकले तर नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी कशी होणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचा कोणता परिणाम होणार अशी भीती पालकांना वाटू शकते, असेही मोदी म्हणाले.

  • आंतरशाखीय अभ्यासाला महत्त्व देणारे हे धोरण तयार करण्यासाठी शहरातील, गावांतील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सूचना केल्या होत्या. हे धोरण ठरवताना फक्त सरकारच्या दृष्टिकोनाचा विचार केलेला नाही. नवे शैक्षणिक धोरण सगळ्यांनाच आपले वाटू लागले आहे. आधीच्या शिक्षण धोरणात ज्या सुधारणा व्हाव्या असे वाटत होते ते बदल नव्या शिक्षण धोरणात झाले आहेत, अशी भावना अनेकांमध्ये दिसते. म्हणूनच त्यांनी नव्या शिक्षण पद्धतीचे स्वागत केले असल्याचे मोदी म्हणाले. शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण मिळाले तर, भारत स्वावलंबी बनण्यास मदत होईल, असा विचार मोदींनी मांडला.

चांद्रयान-३ मिशनसंदर्भात महत्त्वाची माहिती, इस्रोकडून लँडिंगसाठी जोरदार तयारी :
  • अन्य क्षेत्रांप्रमाणे करोना व्हायरसच्या साथीचा अवकाश कार्यक्रमाला सुद्धा फटका बसला आहे. करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-३ मोहिमेला विलंब झाला आहे. २०२१ च्या सुरुवातीला चांद्रयान-३ मोहिम लाँच होऊ शकते.

  • “२०२१ या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-२ सारखी चांद्रयान-३ मोहिम असेल. चांद्रयान-२ प्रमाणे चांद्रयान-३ तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली. सध्या चांद्रयान-२ चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे. या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.

  • मागच्यावर्षी २०२० मध्ये चांद्रयान तीन मोहिम लाँच होईल अशी माहिती मंत्र्यांनी दिली होती. गेल्यावर्षी सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्रावर कोसळल्यानंतर इस्रोने चांद्रयान-३ ची घोषणा केली होती.

करोनावरील लस खरेदी आणि पुरवठय़ासाठी ‘युनिसेफ’चा पुढाकार :
  • करोनावर लस उपलब्ध झाली तरी ती कुणाला, कशी व केव्हा उपलब्ध होणार हा सर्वात मोठा प्रश्न असून आता युनिसेफने यात पुढाकार घेऊन लशीची खरेदी व पुरवठा याची जबाबदारी घेतली आहे.

  • आम्ही लस खरेदी करून सर्व देशांना त्याचा सुरक्षित, वेगाने व समान पुरवठा करू ,असे संस्थेने म्हटले आहे. ‘दी युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड ’म्हणजे ‘युनिसेफ ’ही जगातील सर्वात मोठी लस खरेदी करणारी संस्था असून ते दरवर्षी विविध लशींचे २ अब्ज डोस खरेदी करीत असतात. नेहमीच्या लसीकरणात ज्या लशींचा समावेश असतो त्या १०० देशात वितरित केल्या जातात. ही संस्था आता ‘रिव्हॉल्विंग फंड ऑफ दी पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या मदतीने कोविड १९ लशींची खरेदी करणार आहे.

  • ‘कोव्हॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन’ सुविधा त्यासाठी उभारण्यात आली असून त्यात कमी व मध्यम उत्पन्न गटातील ९२ देशांना लस दिली जाईल. युनिसेफने शनिवारी एका ट्वीट संदेशात म्हटले आहे, की आम्ही हे मोठे आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत.

  • गोवर, पोलिओ यासारख्या रोगांवर ही संस्था दरवर्षी २ अब्ज लशीचे डोस खरेदी करून शंभर देशांना देत असते. युनिसेफ ही लस खरेदीत समन्वयाचे काम करते. ८० टक्केउच्च उत्पन्न देशांना लस खरेदीत मदत करण्यात युनिसेफची मदत असते. आता कोविड लशीसाठी कोवॅक्स ही सुविधा करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत जगातील १७० देशात या लशीचा समान पुरवठा करणे हे आव्हानात्मक काम संस्थेने घेतले आहे.

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा : स्पेनचा युक्रेनवर दमदार विजय :
  • सर्जियो रामोस तसेच युवा फुटबॉलपटू अन्सू फाटी यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर स्पेनने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत युक्रेनवर  ४-१ असा दमदार विजय मिळवला.

  • रामोसने तिसऱ्या मिनिटाला पेनल्टीवर आणि २९व्या मिनिटाला गोल झळकावल्यानंतर फाटीने ३२व्या मिनिटाला तिसरा गोल केला. स्पेनकडून गोल झळकावणारा तो सर्वात युवा (१७ वर्षे ३११ दिवस) फुटबॉलपटू ठरला आहे. त्यानंतर फेरान टोरेसने चौथा गोल लगावत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • जर्मनीला नेशन्स लीगमध्ये पहिल्या विजयाची उत्सुकता लागली असून रविवारी त्यांना स्वित्झर्लंडने १-१ असे बरोबरीत रोखले. इकाय गुंडोजेन याने १४व्या मिनिटाला जर्मनीचे खाते खोलल्यानंतर सिल्वन विडमेर याने ५७व्या मिनिटाला स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली.

०८ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.