चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ फेब्रुवारी २०२१

Date : 8 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
न्यूयॉर्क विधानसभेने ५ फेब्रुवारी ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित केला; भारत म्हणाला :
  • अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये पाकिस्तानचे समर्थन करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. या ठरावानुसार ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करण्यात येणार आहे. मात्र या ठरावाविरोधात भारताने कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे.

  • भारताने हा ठराव म्हणजे स्वार्थी हेतूने मांडण्यात आलेला ठराव असल्याचं म्हटलं आहे. तसेच जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून त्याला भारतापासून वेगळं करता येणार नाही. तसेच भारताने न्यूयॉर्क राज्यातील नवनिर्वाचित प्रतिनिधिंशी भारतीय समुदायाशीसंबंधित चर्चा करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.

  • न्यूयॉर्क स्टेट असेम्बली म्हणजेच विधानसभेमध्ये पाच फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करणारा ठराव गव्हर्नर एण्ड्रू कुओमो यांनी संमत केला. पाकिस्तानमध्ये ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर एकदा दिवस म्हणून साजरा करतो. या प्रस्तावावर भारताने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत, दोघांमध्ये दुफळी निर्माण करण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची चुकीची व्याख्या तयार करुन स्वार्थी हेतूने हा ठराव संमत करण्याचा प्रयत्न चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. विधानसभेमधील सदस्य नादर सायेघ आणि अन्य १२ सदस्यांनी हा ठराव मांडला होता.

म्यानमारमध्ये निदर्शने सुरूच; इंटरनेट सेवा पूर्ववत :
  • म्यानमारमध्ये लष्कराने गेल्या आठवड्यात केलेल्या बंडाला विरोध दर्शवण्यासाठी हजारो  लोकांनी रविवारी राजधानी यांगूनच्या रस्त्यांवरून मोर्चे काढले. आदल्या दिवशी बंद करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा बहाल करण्यात आल्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला होता.

  • यांगूनच्या निरनिराळ्या भागांत निदर्शने सुरू झाली. त्यानंतर शहराच्या बाजारपेठेतील सुले पॅगोडा येथे निदर्शक एकत्र आले आणि त्यांनी ‘लाँग लिव्ह मदर सू’ आणि ‘लष्करी हुकूमशाहीचा निषेध असो’ अशा घोषणा दिल्या.

  • शनिवारी निदर्शने मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा बंद केल्या होत्या.  मात्र, रविवारी दुपारी आपल्या मोबाइल फोन्सवरील डेटा अ‍ॅक्सेस पुन्हा सुरू झाल्याचे यांगूनमधील नागरिकांनी सांगितले. गेल्या सोमवारी लष्कराने बळकावलेली सत्ता सोडून द्यावी अशी निदर्शकांची मागणी असून, देशाच्या पदच्युत नेत्या आंग सान सू की, तसेच त्यांच्या ‘नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी’ पक्षाचे इतर उच्चपदस्थ नेते यांची सुटका करावी अशीही मागणी ते करत आहेत.

  • गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याची तक्रार आपण केली होती, मात्र सू की व त्यांच्या पक्षांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा लष्कराचा आरोप आहे. निवडणूक आयोगाने मात्र या दाव्याला पुष्टी देणारा काही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

“देशाविरोधात कारस्थान रचणाऱ्यांनी भारतीय चहाला देखील सोडलं नाही” :
  • “आज देशाला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचणारे एवढ्या खालच्या पातळीपर्यंत पोहचले आहेत की, भारतीय चहाला देखील ते सोडत नाहीत. हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की, योजनाबद्धरित्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगभरात बदनाम करायचं आहे. परदेशात असलेल्या काही शक्ती चहा बरोबर भारताची जी ओळख जुडलेली आहे, त्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत ” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) आसाम येथील सभेत बोलताना केला.

  • पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज जेव्हा मी आसामच्या चहा कामगारांबाबत बोलत आहे, तेव्हा आजकाल देशाविरोधात सुरू असलेल्या षडयंत्राबाबत देखील बोलू इच्छित आहे. आज देशाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करणारे, एवढ्या पातळीपर्यंत पोहचले आहेत की भारताच्या चहाला देखील सोडत नाहीत.

  • तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल, हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की, भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम करायचं आहे, योजनाबद्धरित्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगभरात बदनाम करायचं आहे.

  • काही कागदपत्रं समोर आली आहेत ज्यावरून असं उघड होतं आहे की, परदेशात असलेल्या काही शक्ती चहा बरोबर भारताची जी ओळख जुडलेली आहे, त्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. हा हल्ला तुम्हाला मंजूर आहे का? या हल्ल्यानंतर गप्प बसणारी लोकं तुम्हाला मान्य आहेत का? हल्ले करणाऱ्यांची स्तुती करणारी लोकं तुम्हाला मान्य आहे का? प्रत्येकाला उत्तर द्यावं लागेल ज्यांनी भारतीय चहाला बदनाम करण्याचं काम हाती घेतलं आहे व त्यांच्यासाठी इथं जे गप्प बसले आहेत, त्या सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक चहा बागायतदार उत्तर मागेल. भारतीय चहा पिणारा प्रत्येक व्यक्ती उत्तर मागेल.”

मातृभाषेत शिक्षण देणारं वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावं - पंतप्रधान :
  • प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषेत शिक्षण देणारे किमान एक मेडिकल आणि एक तांत्रिक महाविद्यालय असावं हे माझं स्वप्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आसाममधील सोनितपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. आसाममध्ये भाजपा सत्तेत आल्यास अशा महाविद्यालयांची पायाभरणी करु, असं आश्वासन यावेळी त्यांनी येथील जनतेला दिलं.

  • मोदी म्हणाले, “ईशान्य भारत विकासाच्या मार्गावर आहे आणि त्यात आसाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सामुहिक प्रयत्नांमुळे चांगली कामगिरी कशी करता येते याचं आसाम हे उत्तम उदाहरण आहे”

  • सोनितपूर जिल्ह्यातील धेकियाजुली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘असोम माला’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आसामच्या आर्थिक प्रगतीत आणि दळणवळणामध्ये सुधारणा होण्यासाठी ‘असोम माला’ हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावेल. आसाममधील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांना वेग मिळावा यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच येथील बिस्वनाथ आणि चराईदेवो येथील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या कोनशिलेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

परस्परांवर कौतुक वर्षाव :
  • सर्व रूढ संकेतांना बगल देत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, तर पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी आणि न्यायमूर्ती शहा शनिवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या अहमदाबाद येथील हीरक महोत्सव सोहळ्यात दूरचित्रसंवाद माध्यमातून सहभागी झाले होते.

  • नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याचे आणि व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखण्याचे आपले कर्तव्य न्यायव्यवस्थेने चोख बजावले आहे, त्याचबरोबर तिने संविधानाचेही रक्षण केले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी न्यायव्यवस्थेची प्रशंसा केली. गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त काढलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते.

  • सर्व देशांच्या सर्वोच्च न्यायालयांचा विचार करता, करोना महासाथीच्या काळात आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दूरचित्रसंवाद माध्यमातून सर्वाधिक सुनावण्या घेतल्या, असे पंतप्रधान म्हणाले. देशाची न्याययंत्रणा भविष्यासाठी सुसज्ज करण्याच्या  उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

०८ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.