चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ डिसेंबर २०२१

Date : 8 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
युवा ताऱ्यांकडे लक्ष; विजय हजारे क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ :
  • स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान असलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. एकूण ३८ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत युवा ताऱ्यांना ‘आयपीएल’ लिलावापूर्वी संघमालकांचे लक्ष वेधण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे राहुल चहर, हर्षल पटेल, आवेश खान, अथर्व अंकोलेकर यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

  • उदयोन्मुख फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व सोपवण्यात आले असून राहुल त्रिपाठी उपकर्णधारपद सांभाळणार आहे. महाराष्ट्राची बुधवारी सलामीच्या लढतीत मध्य प्रदेशशी गाठ पडणार आहे.

  • ’ महाराष्ट्राचा संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, यश नाहर, नौशाद शेख, अझिम काझी, अंकित बावणे, शाम्सशुझमा काझी, मुकेश चौधरी, प्रदीप दाढे, मनोज इंगळे, आशय पालकर, दिव्यांग हिंगणेकर, जगदीश झोपे, स्वप्निल फुलपागर, अवधूत दांडेकर, तरणजित सिंग ढिल्लोन, सिद्धेश वीर, यश क्षीरसागर, पवन शहा, धनराज परदेशी.

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या VL-SRSAM क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; १५ किमीवरच्या शत्रूलाही करु शकते नष्ट :
  • भारताने मंगळवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर येथे ‘व्हर्टिकली लॉन्च्ड शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल’ (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या अधिकार्‍यांच्या मते, हे क्षेपणास्त्र सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या शत्रूच्या लक्ष्यांना नष्ट करू शकते.

  • डीआरडीओने म्हटले आहे की VL-SRSAM भारतीय नौदलासाठी विकसित केले गेले आहे, ज्याचा उद्देश सागरी-स्किमिंग लक्ष्यांसह सीमेवरील विविध हवाई धोक्यांना रोखण्याचे आहे. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, अतिशय कमी उंचीवर असलेले इलेक्ट्रॉनिक लक्ष्य नष्ट करण्यासाठी उभ्या लाँचरमधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले.

  • यावेळी भारतीय नौदलाच्या जहाजांकडून भविष्यात प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेले नियंत्रकासह उभ्या लाँचर युनिट, कॅनिस्टराइज्ड फ्लाइट व्हेईकल, शस्त्र नियंत्रण प्रणाली इत्यादी सर्व शस्त्र प्रणाली घटकांच्या एकात्मिक ऑपरेशनचे प्रमाणीकरण करण्यासाठी या प्रणालीचे प्रक्षेपण करण्यात आले.

ओमायक्रॉनची दहशत - ‘या’ राज्याच्या राजधानीत ५ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू; घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक :
  • ओमायक्रॉन या वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या नवीन विषाणूची दहशत आणि करोनाचा एकंदरितच वाढता प्रादुर्भाव पाहता उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊ शहरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

  • हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. या आदेशानुसार शहरामधील रेस्तराँ, हॉटेल, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, व्यायामशाळा, मैदाने यासारख्या गोष्टी ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच शहरामध्ये मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

  • आता लखनऊमध्ये घराबाहेर पडताना मास्क वापरणं बंधनकारक झालं आहे. तसेच बंद ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमामध्ये १०० हून अधिक लोकांची उपस्थिती असणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असं आदेशात म्हटलं आहे. हे आदेश ५ जानेवारी २०२२ पर्यंत असतील असं सांगण्यात आलं आहे.

  • कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारी जेसीपी पीयूष मोर्डिया यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व ठिकाणी करोना नियमांचं योग्य पद्धतीने पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. विधानसभेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. रेस्तराँ, हॉटेल, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, व्यायामशाळा, मैदाने ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असल्याचं सांगण्यात आलंय.

भारत सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत सामील; एक टक्के लोकांकडे देशाची २२ टक्के संपत्ती :
  • जागतिक विषमता अहवाल २०२२ मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारत हा गरीब आणि असमानता असलेला देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताबाबत या अहवालात हा एक असा देश आहे जिथे लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नात ५७ टक्के वाटा आहे. तर खालच्या ५० टक्के विभागाचा केवळ १३ टक्के वाटा आहे, असे म्हटले आहे.

  • हा अहवाल वर्ष २०२१ वर आधारित आहे. या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की २०२० मध्ये देशाचे जागतिक उत्पन्नही अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहे.

  • ‘जागतिक असमानता अहवाल २०२२’ नावाचा अहवाल लुकास चॅन्सेल यांनी लिहिला आहे जे ‘वर्ल्ड इनक्वालिटी लॅब’ चे सह-संचालक आहेत. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ञांनी हा अहवाल तयार करण्यात हातभार लावला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारत आता जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.

अफ्स्पा’ रद्द करण्याची नागालँडची केंद्राकडे मागणी;हॉर्नबिल महोत्सव रद्द :
  • नागालँडमधील हिंसाचारानंतर राज्यात तणावपूर्ण शांतता आहे. जवानांच्या गोळीबारानंतर झालेल्या या हिंसाचाराने हादरलेल्या राज्य सरकारने सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.

  • नागालँडमध्ये जवानांच्या गोळीबारात खाणमजुरांसह १४ नागरिकांचा मृत्यू आणि त्यानंतरच्या दंगलीत एका जवानानेही प्राण गमावल्याची घटना शनिवारी घडली होती. त्याचे नागालँडसह अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटले. ही घटना गैरसमजातून घडल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसदेत निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते.

  • या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागालँड राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीत विशेष तपास पथकाच्या तपासाबरोबरच (एसआयटी) हिंसाचारानंतरच्या कार्यवाहीचा तपशील सादर करण्यात आला. या प्रकरणाचा तपास महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश ‘एसआयटी’ला देण्यात आले आहेत. ‘अफ्स्पा’ कायदा रद्द करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

  • गोळीबार करण्याआधी खाणमजुरांची ओळख पटविण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नव्हता, असा दावा या हिंसाचारप्रकरणी रविवारी राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे ‘अफ्स्पा’ कायद्यामुळे मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकार वाढल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार अनेकांनी केला.

  • नागालँड हिंसाचाराच्या - निषेधार्थ हॉर्नबिल महोत्सव रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. नागालँडच्या किसमा येथील ‘नागा हेरिटेज व्हिलेज’मध्ये दरवर्षी होणारा हा महोत्सव पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दहा दिवसांच्या या महोत्सवाची १० डिसेंबरला सांगता होणार होती. मात्र, त्यापूर्वीच महोत्सवातील उर्वरित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

०८ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.