चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ एप्रिल २०२१

Date : 8 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry; स्वत:च्या नागरिकांनाही प्रवेश नाकारला :
  • देशात कोविड १९ विषाणूची दुसरी लाट अधिकच संसर्ग पसरवणारी ठरली आहे. मंगळवारी देशात १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे.

  • देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.

  • न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. भारतामधून येणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ही बंदी न्यूझीलंडचे नागरीक असणाऱ्या मात्र सध्या भारतात असणाऱ्या व्यक्तींनाही लागू असणार आहे.

  • भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आर्डेन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. न्यूझीलंड सरकारने जारी केलेली ही बंदी जवळजवळ दोन आठवडा कायम राहणार आहे. त्यामुळेच ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान कोणत्याही व्यक्तीला भारतामधून न्यूझीलंडला जाता येणार नाही. “या तात्पुरत्या निर्बंधांमुळे अडचणी निर्माण होतील याचा मला अंदाज आहे.

पंतप्रधान मोदींनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस; देशवासियांना केलं आवाहन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी १ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता.

  • लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नसतानाच मोदींनी लस घेतल्याने लसीकरणाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झालेली पहायला मिळाली होती. करोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं यावेळी मोदी म्हणाले आहेत.

  • मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एम्स रुग्णालयात आज करोना लसीचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा”.

अब्जाधीशांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर :
  • प्रतिष्ठित अशा फोर्ब्ज मासिकाने जगातील श्रीमंतांची नवी यादी प्रसिद्ध केली असून, त्यानुसार अमेरिका व चीननंतर जगात अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी चिनी उद्योगपती जॅक मा यांना मागे टाकून आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचे स्थान परत मिळवले आहे.

  • फोर्ब्जच्या जगातील अब्जाधीशांच्या पस्तिसाव्या वार्षिक यादीत अ‍ॅमॅझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व संस्थापक जेफ बेझोस हे सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थानावर आहेत. त्यांची निव्वळ मालमत्ता १७७ अब्ज अमेरिकी डॉलरची असून अ‍ॅमॅझॉनच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या मालमत्तेत ६४ अब्ज डॉलरची भर पडली आहे.

  • जागतिक यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क हे असून, डॉलरच्या संदर्भात सर्वाधिक जास्त फायदा त्यांना झाला आहे. गेल्या वर्षीच्या यादीत २४.६ डॉलर मालमत्तेसह ते ३१व्या क्रमांकावर होते. यंदा त्यात तब्बल १२६.४ डॉलरची प्रचंड वाढ होऊन ही मालमत्ता १५१ अब्ज डॉलर झाली आहे. ‘टेस्लाच्या समभागांमध्ये झालेली ७०५ टक्क्यांची वाढ हे याचे मुख्य कारण आहे’, असे फोर्ब्जने सांगितले आहे.

१ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस, जो बायडेन यांची घोषणा :
  • जगभरात पुन्हा एकदा करोना व्हायरस डोकं वर काढत असताना करोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला करोनाची लस घेता येईल असं बायडेन यांनी सांगितलं.

  • यापूर्वी, अमेरिकेने १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला करोना लस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी जो बायडेन यांनी १ मे ऐवजी १९ एप्रिलपासूनच १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आम्ही १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला, असं सांगितलं.

  • तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून १०० दिवस पूर्ण होईपर्यंत २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा गाठणारा आणि ६२ दशलक्ष लोकांचं पूर्णपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केलं आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मोठी बातमी! नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार :
  • पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

  • करोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.

  • नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर होता. तर दुसरीकडे निर्बंध, करोनाचे वाढते रुग्ण यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या पालक करत होते. मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभाग ठाम होतं.

०८ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.