चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 07, 2021 | Category : Current Affairs


संयमाची परीक्षा नको :
 • लवादांवर नियुक्त्या करणे टाळून त्यांना शक्तीहीन केले जात असल्याची टिप्पणी करीत, ‘‘आमच्या संयमाची परीक्षा पाहिली जात आहे, मात्र आम्हाला सरकारशी संघर्षांत रूची नाही, त्यामुळे १३ सप्टेंबपर्यंत सर्व प्रमुख लवादांवरील नियुक्त्या कराव्यात’’, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले.

 • सर्व महत्त्वाचे लवाद आणि अपिलीय लवादांतील सुमारे २५० पदे रिक्त आहेत. त्यांत राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी), कर्जवसुली लवाद (डीआरटी), दूरसंचार वाद आणि अपिलीय लवाद (टीडीएसएटी), राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी), ग्राहक आयोग इत्यादींचा समावेश आहे.

 • सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांचा समावेश असलेल्या विशेष पीठाने सोमवारी लवादांवरील नियुक्त्यांच्या संदर्भात केंद्राला खडे बोल सुनावले. आम्हाला सरकारशी संघर्ष करण्यात रस नाही, परंतु आमची सहनशक्ती संपत चालली आहे.

 • त्यामुळे केंद्राने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सर्व प्रमुख लवादांवरील नियुक्त्या पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे येत्या सोमवापर्यंत कराव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आम्ही अवमान कारवाई करण्याचा विचार करू शकतो, असा इशाराही सरन्यायाधीशांनी दिला.

देशाच्या उभारणीत नौदलाचे योगदान मोठे- राष्ट्रपती :
 • संकटकाळात अनेक वेळा सागरी तैनाती करून भारतीय नौदलाने हिंदी महासागरातील अग्रक्रमाच्या भागीदाराचा व्यापक दृष्टिकोन पूर्ण करण्यावर भर दिला आहे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे.

 • राष्ट्रपतींनी येथील आस्थापनास ‘प्रेसिडेंटस कलर टू दी इंडियन नॅव्हल अ‍ॅव्हीएशन’ प्रदान करताना  हे मत व्यक्त केले असून ते म्हणाले की, भारतीय नौदलाने संकटकाळात तैनाती करून नेहमीच चांगली कामगिरी केली असून हिंदी महासागरातील अनुकूल भागीदाराचे स्थान मिळवले आहे.

 • ‘आयएनएस हंस’ (वास्को) येथील कार्यक्रमात ते बोलत होते. तेथे त्यांनी भारतीय नौदलाची सलामी स्वीकारली. कोविंद हे तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून त्यांनी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांच्या उपस्थितीत ‘प्रेसिडेंटस कलर टू दी इंडियन नॅव्हल अ‍ॅव्हीएशन’ प्रदान  केले. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्ले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. प्रेसिडेंटस कलर सन्मान  हा देशासाठी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या लष्कराच्या विभागांना प्रदान करण्यात येतो.

 • कोविंद यांनी सांगितले की, भारतीय नौदलाने सर्व महत्त्वाच्या प्रादेशिक गोष्टींची वचनबद्धता पूर्ण केली असून त्यामुळे मित्र देशांशी राजनैतिक सहकार्य वाढवण्यास मदत झाली असून भारत हा हिंद प्रशांत क्षेत्रात महत्त्वाचा भागीदार देश ठरला आहे. 

‘नीट- यूजी’ परीक्षा लांबणीवर टाकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार :
 • १२ सप्टेंबरला होऊ घातलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट- यूजी) परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. आपण या प्रक्रियेत हस्तक्षेप करू इच्छित नाही आणि परीक्षेचे वेळापत्रक  बदलणे ‘अत्यिंत अनुचित’ ठरेल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

 • विद्यार्थ्यांना अनेक परीक्षांना बसायचे असेल, तर त्यांना प्राधान्य निश्चित करावे लागेल आणि त्यातून निवड करावी लागेल, कारण परीक्षांच्या तारखांबद्दल प्रत्येकजण समाधानी राहील अशी परिस्थिीत कधीच असणार नाही, असे न्या. अजय खानविलकर, हृषीकेश रॉय व सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले.

 • तथापि, या मुद्दयावर सक्षम अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा असेल आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबत कायद्यानुसार लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे न्यायालय म्हणाले.

 • इतर अनेक परीक्षा १२ सप्टेंबरच्या आसपासच होणार असल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेली नीट- यूजी २०२१ ही परीक्षा पुढे ढकलली जावी, असा युक्तिवाद आलम यांनी केला होता.

NEET 2021 Exam - परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली :
 • १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (National Eligibility-cum-Entrance Test ) पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयात NEET UG परीक्षा २०२१ दुसऱ्या तारखेला घेण्याबाबत मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने म्हटले होते की NEET परीक्षेचे तारीख सीबीएसई कंपार्टमेंट व अन्य परीक्षेचा तारखा सारख्या आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की NEET परीक्षा येत्या रविवारी, १२ सप्टेंबर रोजी निर्धारित वेळेवर घेतली जाईल.

 • न्यायालयाने म्हटले की, NEET परीक्षेत १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात आणि केवळ काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, “आम्ही या याचिकेवर सुनावणी घेणार नाही. आम्हाला अनिश्चिततेची परिस्थिती नको आहे. परीक्षा होऊ द्या.” अ‍ॅड सुमंत नकुलाने सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

 • न्यायालयाने असेही म्हटले आहे की, शिक्षणाच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही कारण लाखो विद्यार्थी त्यांच्या आदेशामुळे प्रभावित होतील.

गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदान; आनंद कुमार यांचा गौरव :
 • ‘सुपर ३०’चे संस्थापक आणि गणितज्ञ आनंद कुमार यांना राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषद (एनसीटीएस)कडून ‘साराभाई टिचर्स सायंटिस्ट नॅशनल ऑनररी अवॉर्ड २०२१’ देऊन गौरविण्यात आले.

 • गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवणे आणि गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘आयआयटी’ची प्रवेश परीक्षा ‘जेईई’मध्ये यश प्राप्त करून देणे यासाठी आनंद कुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आनंद कुमार गेल्या २० वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.

 • रविवारी शिक्षक दिनी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन गौरवण्याबरोबरच त्यांना राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषदेचे आजीवन सभासदत्वही बहाल करण्यात आले असल्याची माहिती ‘एनसीटीएस’चे अध्यक्ष चंद्रमौली जोशी यांनी दिली. गुजरातमधील रमन विज्ञान आणि तंत्रज्ञान फाऊंडेशनने शिक्षकांमध्ये वैज्ञानिक विचारप्रणाली विकसित करण्यासाठी ‘एनसीटीएस’ची स्थापना केली. दिल्ली येथे ‘एनसीटीएस’चे मुख्यालय आहे.

 • आनंद कुमार यांनी पुरस्कार आयोजकांचे आभार मानून करोना महासाथीच्या काळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

भारत-इंग्लंड कसोटी मालिका - ओव्हलवर विजयक्रांती :
 • अखेर ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारताच्या विजयाची क्रांती घडली. मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरसह (२/२२) अन्य गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा १५७ धावांनी धुव्वा उडवला.

 • यापूर्वी, १९७१मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने ओव्हलवर इंग्लंडला धूळ चारली होती. यंदा विराट कोहलीच्या शिलेदारांनी हा पराक्रम करताना पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताने दिलेले ३६८ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांत आटोपला. भारताच्या दुसऱ्या डावातील शतकवीर रोहित शर्मा सामनावीर ठरला. पाचवी कसोटी १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवण्यात येईल.

 • रविवारच्या बिनबाद ७७ धावांवरून पुढे खेळताना रॉरी बर्न्‍स आणि हसीब हमीद यांनी अर्धशतके झळकावतानाच शतकी भागीदारी रचली. परंतु शार्दूलचे गोलंदाजीसाठी आगमन होताच त्याने बर्न्‍सचा (५०) अडथळा दूर केला. डेव्हिड मलान (५) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने हमीदचा (६३) त्रिफळा उडवला.

 • १४१ धावांवर तिसरा बळी गमावल्यानंतर मात्र इंग्लंडची घसरगुंडी उडाली. जसप्रीत बुमराने जॉनी बेअरस्टो (०) आणि ऑली पोप (२) यांना त्रिफळाचीत करून इंग्लंडच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. फिरकीपटू जडेजाने मोईन अलीला (०) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. मात्र शार्दूलने दुसऱ्या स्पेलमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज जो रूटला (३६) त्रिफळाचीत करून भारताचा विजय सुनिश्चित केला.

०७ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)