चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ नोव्हेंबर २०२१

Date : 7 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा - हरिका संयुक्त दुसऱ्या स्थानी :
  • भारताची ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिकाने रशियाच्या एलिना कॅशलिंस्कायाचा पराभव करत ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत नऊ फेऱ्यांअंती अन्य चार खेळाडूंसह संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.

  • हरिकाने सुरुवातीपासून चांगला खेळ करत रशियन प्रतिस्पर्धीवर दडपण टाकले. त्यामुळे कॅशलिंस्कायाने ८३व्या चालीवर हार पत्करली. या विजयामुळे हरिकाचे नऊ फेऱ्यांमध्ये सहा गुण झाले आहेत. सर्वाधिक आठ गुणांसह चीनची खेळाडू ली तिन्गजेई अव्वल स्थानी असून महिलांमध्ये तिचे विजेतेपद जवळपास निश्चित आहे.

  • खुल्या गटात, भारताच्या के. शशिकिरणने नवव्या फेरीत पावेल एल्यानोव्हला पराभूत केले. त्याच्या खात्यात एकूण सहा गुण झाले असून अन्य नऊ खेळाडूंसह तो संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानीलाही (एकूण ५ गुण) विजय प्राप्त करण्यात यश आले.

चीनचा लोकशाहीवादी चेहरा :
  • बीजिंगमध्ये पीपल्स काँग्रेसचे ४,८९८ जिल्हास्तरीय उपाध्यक्ष आणि शहर स्तरावरील ११,१३७ उपाध्यक्ष निवडण्यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बीजिंगमधील ह्युएरेंटांग (झोंगनानहाय निवडणूक जिल्हा) मतदान केंद्रावर मतदान केले. चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्ष आपण लोकशाहीवादी असल्याची प्रतिमा उभी करीत आहे.

  • लोकशाही व्यवस्था ही काही विशिष्ट देशांची मक्तेदारी नाही, असे चिनी कम्युनिस्ट पक्षान म्हटले आहे.  ८६ वर्षीय क्षी यांनी यावेळी सर्वांगीण लोकशाही विकसित करून मतदान पद्धती मजबूत करण्यावर भर दिला, असे चीनच्या शासकीय झिन्युहा वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा देश लोक चालवितात, हे या निवडणुकीतून स्पष्ट होते.

  • निवडणूक पद्धती एकात्मिक असावी आणि त्यातून लोकांचे समाधान साधले जावे, असेही चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असलेले क्षी यांनी म्हटले आहे. क्षी यांच्यासह पक्षातील अन्य नेते आणि पंतप्रधान ली केक्वींग यांनीही मतदान केले.

दरवर्षी दिवाळीत व्हायरल होतं ‘नासा’ने काढलेलं भारताचं ‘ते’ छायाचित्र! जाणून घ्या त्यामागचं सत्य :
  • गेली काही वर्ष दिवाळीच्या काळात नासाने अवकाशातून भारताचा काढलेला एक फोटो नेहमी वायरल होत आला आहे, त्याबाबत स्पष्टीकरण नासाने दिलं आहे. दिवाळीच्या काळात नासाच्या कृत्रिम उपग्रहाने काढलेला भारताच्या नकाशाचा एक फोटो नेहमी वायरल होत आला आहे.

  • यामध्ये दिवाळीतील प्रकाशाच्या झगमगटामुळे भारत कसा उजळून निघाला आहे, सगळ्यात धुमधडाक्यात दिवाळी ही उत्तर भारतात साजरी केली जाते इथपासून ते अवकाशातून अंतराळवीरांना भारत देशाच्या आकाशात फटाक्यांची सुरु असलेली आतषबाजी स्पष्ट दिसते वगैरे असे दावे केले जातात, असे मेसेजसुद्धा एकमेकांना पाठवले जातात.

  • यावर नासाच्या NASA History Office या ट्विटरने फोटोसह स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. नासाच्या Suomi NPP पर्यावरणाशी संबंधित पृथ्वीची छायाचित्रे काढणाऱ्या ध्रुवीय उपग्रहाने १२ नोव्हेंबर २०१२ ला इन्फ्रारेड तरंगलांबीच्या माध्यमातून काढलेले भारताचे संबंधित छायाचित्र काढले आहे.

  • यामध्ये शहरे ही स्पष्ट दिसावीत यासाठी संबंधित फोटो हा जरा तेजस्वी ( bright ) करण्यात आला असल्याचं स्वतः नासानेच स्पष्ट केलं आहे. या फोटोमध्ये मुंबई, दिल्ली, बंगळूरू, कोलकत्ता, कराची ही शहरे चिन्हांकित करुन दाखवण्यात आली आहे. 

यंदाच्या दिवाळीतील खरेदीनं १० वर्षांचा विक्रम मोडला, CAIT कडून आकडेवारी जारी :
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने व्यापाराचं संपूर्ण गणित बिघडवलं. मात्र, दिवाळीने या व्यवसायिकांना मोठं जीवनदान दिल्याचं पाहायला मिळालंय. यंदाच्या दिवाळीत झालेल्या खरेदीनं व्यवसायाचे मागील १० वर्षांमधील विक्रम मोडले आहेत.

  • व्यापारी संघटना द कंफडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) याबाबत आकडेवारी जारी करत माहिती दिली. यानुसार, यंदाच्या दिवाळीत आतापर्यंत १.२५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.

  • दिवाळीत नागरिकांना दिलखुलासपणे बाजारात खरेदी केली. यामुळे छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा झालाय. दिवाळीत दरवर्षी होणाऱ्या खरेदीचा मागील १० वर्षांचा विक्रम यंदा मोडलाय. या प्रतिसादामुळे भविष्यातही बाजारात चांगली मागणी होऊन बाजारपेठ सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मुकेश अंबानी सहकुटुंब लंडनला शिफ्ट होणार? रिलायन्सनं दिलं स्पष्टीकरण :
  • मुकेश अंबानी हे नाव आता फक्त भारतच नाही तर जगभरात सर्वश्रुत झालं आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आण रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या लंडनमधील घराची गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. मुकेश अंबानींचं मुंबईतील आलिशान अँटिलिया हाऊस अजूनही उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरत असताना आता त्यांच्या लंडनमधील घराचीही चर्चा सुरू झाली आहे.

  • लंडन्या बकिंगहॅमशायरमध्ये त्यांनी तब्बल ३०० एकरची मालमत्ता खरेदी केली असून तिथल्या आलिशान घरात मुकेश अंबानी लवकरच शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर खुद्द रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  • मिड-डेनं दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी लवकरच सहकुटुंब लंडनला वास्तव्यास जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. बकिंगहॅमशायरमघील स्टोक पार्क या ठिकाणी ही मालमत्ता असून या घरात तब्बल ४९ बेडरुम असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

  • या घरात अत्याधुनिक उपचार सुविधा देखील उपलब्ध आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ऐन लॉकडाऊनच्या मध्यावर मुकेश अंबानींनी लंडनमध्ये तब्बल ५९२ कोटींना ही मालमत्ता खरेदी केली आहे.

केदारनाथ मंदिर पुन्हा उभे राहिल्याचे समाधान :
  • महापुराच्या दुर्घटनेनंतर केदारनाथ पूर्ण गौरवाने उभे राहील, असा विश्वास होता. तसा माझा आतला आवाज सांगत होता. हा विश्वास पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. केदारनाथची सेवा करण्यापेक्षा पुण्य दुसरे नाही. येथे केलेले कार्य हे ईश्वरी कृपा आहे. याचे श्रेय कोणी घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

  • पंतप्रधान शुक्रवारी केदारनाथ धाममध्ये होते. त्यांनी येथील विकासकामांचा आढावा घेतला. नंतर मंदिराच्या गर्भगृहात १८ मिनिटे प्रार्थना केली. त्यांनी आदिगुरू शंकराचार्यांच्या १२ फूट उंच आणि ३५ टन वजनाच्या मूर्तीचे अनावरणही केले. यानंतर त्यांनी पुतळ्याजवळ बसून पूजा केली. ही मूर्ती म्हैसूर येथील एका शिल्पकाराने बनवली आहे. आदिगुरू शंकराचार्य समाधीची मूळ मूर्ती २०१३ मध्ये महापुरात वाहून गेली होती. यावेळी मोदींनी ४०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचे पुनर्बांधणी प्रकल्पांचे उद्घाटन केले.

  •  आज मी सैनिकांच्या भूमीवर आहे. सणाचा आनंद मी माझ्या सैनिकांसोबत साजरा केला आहे. १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. गोवर्धन पूजेच्या दिवशी मला केदारनाथ धाम येथे दर्शन-पूजा करण्याचे भाग्य लाभले आहे, असे मोदी म्हणाले. 

०७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.