चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ नोव्हेंबर २०२०

Date : 7 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“नवा रेकॉर्ड सेट करा,” नरेंद्र मोदींचं बिहारमधील मतदारांना आवाहन :
  • बिहारमध्ये अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. शनिवारी १६ जिल्ह्यांमधील ७८ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करत एक नवा रेकॉर्ड करण्याचं आवाहन केलं आहे. करोना संकटात बिहार विधानसभा निवडणूक पार पडत असून पहिलीच निवडणूक ठरली आहे.

  • मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “बिहार तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान करत आहे. सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाही उत्सवात सहभागी होऊन एक नवा रेकॉर्ड करावा. आणि हो मास्क वापरा तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा”.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जवळपास १२ प्रचारसभांना संबोधित केलं. लोकांनी आपल्या मनात एनडीएला सत्तेत आणण्याचं पक्क केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान नितीश कुमार सलग चौथ्यांदा आपल्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचं आवाहन करत असून ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं सांगत आहेत. अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार एकत्र उपस्थित होते.

नियंत्रण रेषेबाबत भारताची ठाम भूमिका :
  • भारतीय लष्कराने चीनला ठोस  उत्तर दिले असून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला अनपेक्षित परिणामांना तोंड द्यावे लागत आहे, असे मत भारताचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केले आहे. भारताची भूमिका नि:संदिग्ध असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत बदल आम्ही मान्य करणार नाही,असेही त्यांनी बजावले आहे.

  • आभासी संवादात त्यांनी सांगितले, की पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. पण भारताची भूमिका नि:संदिग्ध व कणखर असून पूर्व लडाखमध्ये चीनच्या दु:साहसाला  भारतीय सैन्याने ठोस उत्तर दिले. चीनला अनपेक्षित परिस्थितीस तोंड द्यावे लागत आहे कारण त्यांना भारत असे ठोस उत्तर देईल याचा अंदाज नव्हता.  या मोठय़ा संघर्षांच्या काळात ताणतणाव, अतिक्रमण, काही लष्करी कृती घडण्याची शक्यता असते.

  • संरक्षण प्रमुख रावत यांनी सांगितले, की सीमेपलीकडून पाकिस्तान दहशतवाद पसरवत असला तरी त्याला भारतीय लष्करी दले ठोस उत्तर देत आहेत. सुरक्षा आव्हानांच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले, की पाकिस्तान आणि चीन या दोन अण्वस्त्रसज्ज देशांबरोबरच्या संघर्षांमुळे प्रादेशिक अस्थिरता वाढत  आहे.  या दोन देशांबरोबर भारताचे युद्ध यापूर्वी झालेले आहे.  हे दोन देश एकमेकांच्या मदतीने भारताच्या विरोधात कृती करीत आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानने छुपे युद्ध लादले असून त्यामुळे दोन्ही देशातील  संबंध कधी नव्हे इतके बिघडले आहेत.

न्यूझीलंडच्या संसदेत घुमला भारतीय भाषेचा आवाज, प्रियांका राधाकृष्णन यांचा व्हिडीओ व्हायरल :
  • न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय भाषेचा आवाज घुमला आहे. याचं महत्वाचं कारण ठरल्या आहेत प्रियांका राधाकृष्णन. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात झाला आहे.

  • गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी प्रियांका राधाकृष्णन यांचा मल्याळीतून बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म भारतातला. त्यानंतर त्या सिंगापूरला राहिल्या. प्रियांका राधाकृष्णन या आता न्यूझीलंडच्या नागरिक आहेत. लेबर पार्टीच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. आता पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळालं आहे.

  • केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रियांका राधाकृष्णन यांचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. “न्यूझीलंडमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना प्रियांका राधाकृष्णन यांनी मल्याळी भाषेत शपथ घेतली. भारतासाठी ही निश्चितच गर्वाची बाब आहे” या आशयाचं ट्विट करत पुरी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

चीनचा मोठा निर्णय, भारतातून येणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी :
  • चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,  हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे.

  • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. ३ नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.

  • करोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला असून तात्पुरत्या स्वरुपाचा असेल असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. करोनासंबंधी परिस्थितीप्रमाणे पुढील निर्णय घेतले जातील असं चीनने निवेदनात सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्यासंबंधी मोठी घडामोड, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती :

  • करोना संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालंय अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. दरम्यान दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ तारखेपासून शाळा सुरु कऱण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र हा निर्णय नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच असेल. एबीपी माझाशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

  • “मे महिन्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहे. कारण पुन्हा निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्यांचं पुढील वर्षी प्रवेश घेताना नुकसान होईल. आम्ही काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि मंत्रीमंडळात यासंबंधी कल्पना दिली आहे. साधारणत ही परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होते. पण सध्या तशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे २३ तारखेपासून नववी, दहावी, अकरावी, बारावीच्या शाळा सुरु कराव्यात अशी विनंती केली आहे,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

  • पुढे बोलताना त्यांनी अकरावी प्रवेशासंबंधीही माहिती दिली. “बैठकीनंतर मुख्यमंत्री, अशोक चव्हाण आणि मी असे सगळेजण चर्चेसाठी बसलो होतो. अकरावी प्रवेशाबाबत आज निर्णय होईल. येणाऱ्या काळात कदाचित आम्ही प्रवेश सुरु करु”.

०७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.