चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ मार्च २०२२

Date : 7 March, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - भारतीय महिला त्रिकुटाची सुवर्णकमाई :
  • राही सरनोबत, इशा सिंग आणि रिदम सांगवान या भारतीय त्रिकुटाने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक ठरले.

  • रविवारी सुवर्णपदकाच्या लढतीत भारताच्या त्रिकुटाने सिंगापूरवर १७-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. या लढतीच्या पहिल्या टप्प्यात भारताने १५ पैकी सहा वेळा अचूक वेध साधताना २-० अशी आघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर सिंगापूरने पुनरागमन केल्याने तिसऱ्या टप्प्याअंती दोन्ही संघांमध्ये ३-३ अशी बरोबरी होती.

  • मग राहीने आपला अनुभव पणाला लावताना पाचव्या टप्प्यात पाच वेळा अचूक वेध साधल्याने भारताला ७-३ अशी आघाडी मिळाली. परंतु सिंगापूरने पुन्हा खेळ उंचावल्याने लढतीत पुढे ९-९ आणि १३-१३ अशी बरोबरी झाली. यानंतर मात्र सिंगापूरच्या त्रिकुटाने चूका केल्या आणि भारताने सातत्य राखत विजय मिळवला. भारत एकूण पाच पदकांसह आता पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

  • भारताच्या श्रीयंका सदांगी आणि अखिल शेरॉन या जोडीने ५० मीटर रायफल थ्री-पोजिशन मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत श्रीयंका-अखिल जोडीने ऑस्ट्रियाच्या रेबेका कोएक आणि ग्रेनॉट रमप्लेर जोडीवर मोठय़ा फरकाने मात केली.

राज्यातील ३८ हजार नायक पोलीस थेट हवालदार :
  • राज्य पोलीस दलातील ३८ हजार १६९ पोलीस नायक शिपायांना पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती थेट पोलीस हवालदार पदावर करण्यात येत आहे. राज्य शासनाने नायक शिपाई हे पद व्यपगत केल्यामुळे राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पोलिसांना पदोन्नती मिळाली आहे, हे विशेष. 

  • राज्य पोलीस दलात जवळपास १ लाख ९७ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत.  गृह मंत्रालयाकडून नवीन पदोन्नती योजना लागू करण्यात आली असून राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला पोलीस अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

  • गृह मंत्रालयाने पदोन्नतीसाठी पुनर्रचना केल्याने जवळपास ५१ हजार पोलिसांना लाभ होणार आहे. पुनर्रचनेनंतर पोलीस शिपायांची पदे १ लाख ८ हजार ५८, पोलीस हवालदारांची पदे ५१ हजार २१०, सहायक पोलीस उपनिरीक्षकांची पदे १७ हजार ७१ इतकी वाढवण्यात आली आहे.  

  • नव्या पदोन्नती संरचनेसुसार आता दहा वर्षांत थेट पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्याचा लाभ राज्यातील ३८ हजार १६९ पोलीस नाईक शिपायांना होणार आहेत. आता या सर्व नायक शिपाई यांना थेट हवालदार पदावर पदोन्नती मिळणार आहे.  नागपूर शहर पोलीस दलात १७७६ पोलीस नायक शिपाई आहेत. गृह मंत्रालयाच्या नव्या पदोन्नती आदेशाने आता ते सर्व कर्मचारी थेट पोलीस हवालदार होणार आहेत.

दिल्लीत १६ मार्चपासून पर्यावरणपूरक वाहने :
  • सीएनजीवरील वाहनानंतर आता ग्रीन हायड्रोजनवर चालणारी वाहने शहरात आणत आहोत. ग्रीन हायड्रोजनवरील जगात रेल्वे धावत असून काही देशात कारही धावत आहे. आता हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत १६ मार्चपासून चालणार आहे. नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

  • १२ ते १४ मार्चदरम्यान आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवाची माहिती देताना रविवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रक्रिया प्रकल्प महापालिकेच्यावतीने शहरात राबवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. कचरा आणि पाण्यातून हे ग्रीन हायड्रोजन इंधन निर्माण केले जाईल. ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्याचे विदर्भ हे केंद्र असणार आहे. अशी माहिती गडकरी यांनी या वेळी दिली.

  • विदर्भात ७५ टक्के पाणी आणि ८५ टक्के जंगल आहे, याची मागणी मोठी आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मँगनीज आहे. त्या ठिकाणी स्टील उद्योगांची मोठी क्षमता असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

  • बांगलादेश पहिल्या क्रमांकाचा रेडिमेड कॉटन गारमेंट आयात करणारा देश आहे. तेथे विदर्भाचा कापड जातो. विदर्भात उद्योगाची मोठी क्षमता आहे. मात्र आपल्याकडे एकमेकांत ताळमेळ नाही. पण सर्व उद्योग एकमेकांवर आधारित आहे. पर्यटनवाढीसाठी आता सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरली जाणार आहेत. त्यामुळे प्रदूषण आणि आवाज होणार नाही.

रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये मोडला कपिल देव यांचा खास विक्रम :
  • मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कपिल देवचा विक्रम मोडला. अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. कपिल देव यांचा विक्रम मोडून त्याने हा पराक्रम केला. अश्विनने चरिथ असलंकाला विराट कोहलीकरवी झेलबाद करून ही कामगिरी केली. अश्विनने आता कसोटीत ४३५ विकेट्स घेतल्या आहेत.

  • अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५६, इंग्लंडविरुद्ध ८८, श्रीलंकेविरुद्ध ५५, न्यूझीलंडविरुद्ध ६६, बांगलादेशविरुद्ध १६, वेस्ट इंडिजविरुद्ध ६० आणि अफगाणिस्तानविरुद्ध ४३५ कसोटी बळी घेतले.

  • भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक विकेट घेतल्या असून कपिल देव दुसऱ्या क्रमांकावर होते. पण आता अश्विन भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांच्या नावावर ४३४ कसोटी विकेट आहेत आणि अश्विनच्या नावावर ४३५ कसोटी विकेट आहेत.

“रशियावर निर्बंध म्हणजे युद्धाची घोषणा…”; पुतिन यांचा पाश्चात्य देशांना गंभीर इशारा :
  • रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांनी युद्धाला विरोध करत रशियावर निर्बंध लादले आहेत. परंतु तरीही रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले. दरम्यान, या निर्बंधांवर प्रतिक्रिया देत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इशारा दिला आहे.

  • पाश्चात्य देशांकडून त्यांच्या देशावर लादण्यात आलेले निर्बंध हे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहे, असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले आहेत. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पुतिन यांनी शनिवारी मॉस्कोजवळ फ्लाइट अटेंडंटच्या एका गटाला सांगितले की, “हे जे निर्बंध लादले जात आहेत, ते युद्ध घोषित करण्यासारखे आहेत.”

  • युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन स्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याचे युरोप आणि जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. नाटोने नो-फ्लाय झोनची युक्रेनची राजधानी किव्हची विनंती नाकारली आहे. कारण असं केल्यास ते रशियाला मोठे युद्ध करण्यास प्रवृत्त करण्यासारखं होईल, असं मत त्यांनी नोंदवलं.

  • दरम्यान, युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून, पाश्चात्य देशांनी रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर कठोर निर्बंध घातले आहेत. कंपन्यांना रशियामध्ये व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. तसेच परदेशात oligarchs च्या नौका आणि लक्झरी मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

०७ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.