चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जुलै २०२१

Updated On : Jul 07, 2021 | Category : Current Affairs


आठ राज्यांत नवे राज्यपाल :
 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्ताराआधी, मंगळवारी केंद्र सरकारने आठ राज्यांच्या राज्यपाल पदांवर नव्या नियुक्त्यांसह फेरबदल केले आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असून त्यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी वर्णी लावण्यात आली आहे. नव्या राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती व जमातींना प्राधान्य देण्यात आले आहे.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून गेहलोत यांच्यासह दोन-तीन मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आधापासून चर्चेत होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाआधीच गेहलोत यांची गच्छंती झाली आहे. गेहलोत राज्यसभेचे खासदार असून वरिष्ठ सभागृहातील गटनेतेही आहेत. आता त्यांना मंत्रिपद, संसद सदस्यत्व व गटनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागेल. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होत असून सत्ताधारी भाजपला राज्यसभेत नव्या गटनेत्याची नियुक्ती करावी लागेल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल सभागृहाचे उपनेते आहेत.

 • आपण तीनही पदांचा बुधवारी राजीनामा देत असून संविधानाच्या चौकटीत नवी जबाबदारी पार पाडू, अशी प्रतिक्रिया गेहलोत यांनी व्यक्त केली. ७४ वर्षांच्या गेहलोत यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळल्याने मोदी सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले.

परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर ; शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी दिली माहिती :
 • जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षांबाबत परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला होता. अखेर आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक याबाबतची भूमिका स्पष्ट करून, हा संभ्रम दूर केला. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षेच्या तारखांची घोषणा करत सांगितले की, जेईई मेनची तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलै पासून २५ जुलै पर्यंत होईल. तर, जेईई मेन चौथ्या टप्प्यातील परीक्षा जी मे महिन्यात होणार होती, ती २७ जुलै पासून २ ऑगस्ट २०२१ पर्यंत होईल.

 • जे विद्यार्थी काही कारणास्तव अर्ज करू शकले नाहीत, त्यांना अर्ज करण्यासाठी एक संधी दिली जात आहे. त्यानुसार आता आज (६ जुलै) रात्रीपासून ८ जुलै २०२१ पर्यंत रात्री ११.५० पर्यंत अर्ज करता येणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी ९ जुलै पासून ११ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

 • शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, मी अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला धन्यवाद देऊ इच्छित आहे. याशिवाय एनटीए ने या तिन्ही दिवसांच्या आत परीक्षा केंद्र बदलण्याची देखील संधी दिली आहे. यामुळे आपल्या सोयीनुसार या तीन दिवसांच्या आत बदल करता येणार आहे.

MPSC - १५,५११ हजार पदांची भरती :
 • लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या के ल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यात लवकरच १५ हजार ५११ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • राज्य लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतीमान करण्यासाठी सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढविण्याचा तसेच आयोगाच्या कामकाजाचे ‘डिजिटलायजेशन’ करण्याचाही निर्णय सरकारने घेतला असून, त्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मंगळवारी के ली.

 • स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाखो तरूणांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

महिला आशिया फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी मुंबई-पुण्यात :
 • पुढील वर्षी होणाऱ्या महिला आशिया चषक फुटबॉल स्पध्रेचे सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. आशियाई फुटबॉल महासंघाने प्रवासाच्या वेळेची बचत आणि जैवसुरक्षित वातावरणाच्या उद्देशाने भुवनेश्वर आणि अहमदाबादला वगळले आहे.

 • महिला आशिया चषक स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत होणार आहे. या स्पध्रेसाठी मुंबईच्या अंधेरी क्रीडा संकुलातील दी मुंबई फुटबॉल एरिना, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल या नव्या तीन ठिकाणांवर शिक्कामोर्तब केले आहे. ‘‘करोना साथीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे आशियाई फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. याआधी ही स्पर्धा ओदिशा आणि गुजरातमध्ये होणार होती.

 • जपान, ऑस्ट्रेलिया, चीन आणि यजमान भारत यांचे स्पध्रेतील स्थान निश्चित झाले आहे. परंतु उर्वरित आठ संघांसाठी पात्रता सामने होणार आहेत. तीन वेळा विजेता चायनीज तैपेई, बहारिन, तुर्केमेनिस्तान यांचा ‘अ’ गटात, तर व्हिएटनाम, ताजिकिस्तान, मालदीव आणि अफगाणिस्तान यांचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. ‘क’ गटात कोरिया, सिंगापूर, इराक आणि इंडोनेशिया तसेच ‘ड’ गटात संयुक्त अरब अमिराती, लेबानॉन , म्यानमान यांचा समावेश आहे.

मोदी सरकारने स्थापन केले नवीन मंत्रालय; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी घेतला निर्णय :
 • राजधानी दिल्लीत सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील फेरबदलांमुळे वेगवान हालचाली सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तही ठरला असून, नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 • देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन’ अर्थात ‘सहकार मंत्रालय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर आणि धोरणात्मक आराखडा तयार करण्याचं काम हे मंत्रालय करणार आहे.

 • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या मंत्रालयाची घोषणा केली होती. केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून या मंत्रालयाबाबतची माहिती दिली आहे. या मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला बळ मिळेल.

 • या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रशासकीय, कायद्यांचा आणि धोरणात्मक कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. तसेच सहाकरी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी कामी येईल. याद्वारे सहकारी संस्थांबद्दल नागरिकांमधील विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे.

०७ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)