चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जुलै २०२०

Date : 7 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 
  • मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांवर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची वरिष्ठ विधिज्ञांसमवेत बैठक झाली. यावेळी मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यांसंबंधी चर्चा करण्यात आली होती.

  • मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका असून मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही याचं उत्तर आज मिळेल अशी शक्यता आहे. तसंच वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांबाबतही स्पष्टता मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

  • राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र, विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास संमती :
  • विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. हा दिलासा अल्पकाळच टिकला आहे. आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या कोविड-१९ च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थआ अंतिम वर्षांच्या परीक्षा घेऊ शकतात असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

  • गृहमंत्रालयाने लागू केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात गृह मंत्रालयाने आज विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.”केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • गृहमंत्रालयाने लागू केलेल्या पत्रानुसार अंतिम सेमिस्टरची परीक्षा सक्तीची असेल आणि यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चेही पालन केले जाईल. राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे राज्य सरकारने विद्यापीठातील पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या.  आता केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा :
  • भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्व लडाखमध्ये पेच सुरू असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवर रविवारी चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य माघारी घेण्याचे मान्य करण्यात आले. डोभाल व वँग हे सीमाप्रश्नी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी आहेत त्यांच्यात ही चर्चा झाली.

  • भारताच्या परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने दोन्ही प्रतिनिधींमधील चर्चा खुली व सखोल झाल्याचे स्पष्ट केले असून त्यात एकमेकांनी मतांचे आदान प्रदान केल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य माघारीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी यावर दोन्ही देशांचे मतैक्य झाले आहे.

  • भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमधील तणावामुळे गेले आठ आठवडे पेच सुरू असून पँगॉग त्सो, गलवान खोरे, गोग्रा हॉट स्प्रिंग या ठिकाणी चीनच्या सैन्याने घुसखोरी केली होती. चीनच्या लष्कराने सोमवारी सीमेवरून माघारी सुरू केली असून गलवान खोरे व गोग्रा हॉट स्प्रिंग भागातून सैन्य माघारी घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन या दोन्ही देशांनी सैन्य तातडीने माघारी घेण्याची गरज यावेळी प्रतिपादन करण्यात आली. परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, दोन्ही देशांनी वेगाने सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले असून टप्प्याटप्प्याने सीमा भागातून सैन्य मागे घेत शांतता प्रस्थापित केली जाईल.

देशातील रुग्णसंख्या सात लाखांवर :
  • देशातील एकूण रुग्णसंख्या सात लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार २४८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी म्हटले होते. मात्र, सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे देशातील रुग्णसंख्येने सात लाखांचा टप्पा पार केल्याचे स्पष्ट झाले.

  • देशात पाच दिवसांमध्ये १ लाख रुग्ण वाढले असून सलग तीन दिवस प्रतिदिन २० हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. करोनासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये करोनाबाधित नमुन्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६.७३ टक्के आहे.

  • दिल्लीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पण, करोनाबाधित रुग्णांचे सरासरी प्रमाण कमी होऊ लागले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत प्रतिदिन १८ हजार चाचण्या घेतल्या जात आहेत.

०७ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.