चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ डिसेंबर २०२१

Date : 7 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा; राही सरनोबतला सलग तिसऱ्यांदा सुवर्ण :
  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील गतविजेत्या राही सरनोबतने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना ६४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई केली.

  • नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले. तिने आपले जेतेपद राखताना दमदार कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना मागे टाकले. दिल्लीच्या १४ वर्षीय नाम्या कपूरने ३१ गुणांसह रौप्यपदक मिळवले. तिने नुकतेच कनिष्ठ जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील राष्ट्रीय विजेत्या मनू भाकरला २७ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • तसेच भोपाळ येथे होत असलेल्या राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेत, ओदिशाच्या श्रीयांका सदांगीने (४५४.९ गुण) महिलांच्या ५० मीटर थ्री-पोझिशन प्रकाराचे अजिंक्यपद मिळवले. मध्य प्रदेशच्या मानसी कथित (४५३.५) आणि बंगालच्या आयुषी पोद्दारने (४४०.९) अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. 

जागतिक बुद्धिबळ लढत; नेपोम्निशीच्या चुकीमुळे कार्लसन विजयी :
  • इयान नेपोम्निशीने केलेल्या चुकीचा फायदा घेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने जागतिक र्अंजक्यपद बुद्धिबळ लढतीच्या आठव्या डावात विजयाची नोंद केली.

  • पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना मागील तीनपैकी दोन डावांत विजय प्राप्त करत कार्लसनने आपले जगज्जेतेपद राखण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

  • सर्वोत्तम १४ डावांच्या या लढतीत आठ डावांअंती कार्लसनच्या खात्यात पाच गुण झाले असून नेपोम्निशीचे तीन गुण आहेत. त्यामुळे उर्वरित सहा डावांमध्ये कार्लसनला आता केवळ २.५ गुणांची आवश्यकता आहे.

  • जागतिक र्अंजक्यपद लढतीच्या सात डावांत आव्हानवीर नेपोम्निशीने कार्लसनला कडवी झुंज दिली. आठव्या डावातील २१व्या चालीत मात्र त्याने चूक केली. त्यामुळे त्याने मोहरा गमावला आणि मग त्याला सावध खेळ करावा लागला. कार्लसनने विचारपूर्वक खेळ करताना आपली आघाडी वाढवली. अखेर ४६व्या चालीत नेपोम्निशीने हार पत्करली.

जॉब स्वीच करणं महागात पडणार! …तर नोकरी सोडताना संपूर्ण पगारावर भरावा लागणार १८ टक्के जीएसटी :
  • आज अनेक श्रेत्रांमध्ये खास करुन माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रामध्ये नोकऱ्या बदलण्याचं प्रमाण फार वाढलं आहे. अनेकदा कंपन्या समोरच्या व्यक्तीला लवकरात लवकर नोकरीवर रुजू करुन घेण्यासाठी नोटीस पिरियड बाय आऊट करतानाही दिसतात.

  • मात्र आता अशाप्रकारे नोटीस पिरियडचा कालावधी पूर्ण न करता नोकरी बदलण्याचा विचारात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशाप्रकारे नोटीस पीरियडचा कालावधी पूर्ण न करता नोकरी सोडताना नोटीस पीरियडच्या कालावधीमध्ये मिळालेल्या संपूर्ण वेतनावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.

  • भारत पेट्रोलियमची सहाय्यक कंपनी असलेल्या ओमान रिफायनरीच्या प्रकरणात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क प्राधिकरणाने या पद्धतीचा निर्णय दिला आहे.

  • त्यानुसार कंपन्या भरत असलेले टेलिफोन बिल, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे ग्रुप इन्शुरन्स, नोटीस पीरियडच्या बदल्यात दिले जाणारे वेतन अशा सगळय़ा गोष्टी जीएसटीच्या अखत्यारीत येण्याची शक्यता असल्याचं वृत्त द इकनॉमिक टाइम्सने दिलं आहे.

CBSE 12th Exam 2021-22: गणिताचा पेपर बघून विद्यार्थ्यांना फुटला घाम; शिक्षक म्हणाले :
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर बारावीच्या गणित या विषयाची परीक्षा घेतली. एकूण ४० गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० निवडीच्या आधारावर प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. परीक्षेची तीन विभागात विभागणी करण्यात आली होती.

  • मात्र परीक्षा दिल्यानंतर केंद्राबाहेर आलेल्या विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला. कारण पेपर खूप लांब असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षेत विचारलेले प्रश्न सोडवण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आता यावर आपली मतं मांडली आहेत. गणित परीक्षेची प्रश्नपत्रिका लांब आणि कठीण होती, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

  • परीक्षेसाठी दीड तासांऐवजी अडीच तास द्यायला हवे होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार प्रश्नपत्रिका थोडी अवघड होती. ज्याने रोज गणिताच्या प्रश्नांचा सराव केला असेल तो पेपर सोडवत होता. “सुमारे ५० टक्के प्रश्न खूप सोपे होते पण बाकीचे कठीण होते.

  • निवडींचाही फारसा उपयोग झाला नाही,” असं १२ वीची विद्यार्थिंनी सिया हीने सांगितलं. “पेपर माझ्यासाठी कठीणापेक्षा जास्त लांब होता. मॅट्रिक्सचे प्रश्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागला आणि नंतर त्यात बरेच होते. जर तुम्ही सोपे प्रश्न निवडले, तर त्याला खूप वेळ लागला, कठीण प्रश्न अधिक अवघड होते.” असं अनिर्ध या बारावीच्या विद्यार्थ्याने सांगितलं.

भारताचे कसोटी विश्वविजेत्यांना १४वे रत्न :
  • सहा महिन्यांपूर्वी न्यूझीलंडने साऊदम्पटन येथे भारताला नमवून पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा उंचावली होती. भारताने सोमवारी त्याच विश्वविजेत्या न्यूझीलंडला जणू ‘१४ वे रत्नच’ दाखवले. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध ३७२ धावांनी सर्वात मोठ्या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेवर १-० असा कब्जा केला.

  • सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी म्हणजे दिवसाच्या फक्त ४३ मिनिटांच्या खेळात भारताने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील उर्वरित निम्मा संघ फक्त २७ धावांत तंबूत धाडला. त्यामुळे भारताला मायदेशातील सलग १४व्या मालिका विजयाची नोंद करता आली.

  • कानपूर कसोटीत विजय निसटल्यानंतर भारताने वानखेडेवर अनुकूल खेळपट्टीची व्यूहरचना आखून दोन्ही डावांतील सरावासह निवड समितीलाही चाचपणीची पुरेशी संधी दिली.

  • सोमवारी ५ बाद १४० धावसंख्येवरून दुसऱ्या डावाला पुढे प्रारंभ करणारे न्यूझीलंडचे फलंदाज दडपणाखालीच जाणवले. जयंत यादवने रचिन रवींद्र, कायले जेमिसन, टिम साऊदी आणि विल्यम समरविल यांना डोके वर काढण्याची संधी न देता तंबूत पाठवले. त्यानंतर हेन्री निकोल्सला (४४) वृद्धिमान साहाद्वारे यष्टीचीत करीत अश्विनने १६७ धावसंख्येवर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाला पूर्णविराम दिला.

  • अश्विन आणि जयंत यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. २०१७मध्ये याआधीची कसोटी खेळणाऱ्या जयंतचे १४-४-४९-४ असे प्रभावी पृथक्करण होते.

  • अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर दोन डावांत अनुक्रमे १५० आणि ६२ धावा करणाऱ्या मयांक अगरवालने सामनावीर पुरस्कार पटकावला. परंतु हा सामना एजाझ पटेलने नोंदवलेल्या डावात १० बळींच्या विक्रमाने संस्मरणीय ठरला. एजाझने दोन डावांत मिळून एकण्ूा ७३.५ षटके गोलंदाजी केली, तर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी एकूण ८४.४ षटके भारतीय गोलंदाजीचा सामना केला.

०७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.