चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ ऑगस्ट २०२१

Updated On : Aug 07, 2021 | Category : Current Affairs


जाणून घ्या कोण आहेत जेफ बेझोस यांना मागे टाकणारे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :
 • लूई विटॉनचे (Louis Vuitton) मालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnoult) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अमॅझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकलंय. फोर्ब्सच्या रियल-टाइम बिलिनेयर्स लिस्टमध्ये त्यांचं नाव सर्वात वर आहे. अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती १९८.९ अब्ज डॉलर आहे. तर जेफ बेझोस १९४.९ अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आणि एलन मस्क १८५.५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

 • बर्नार्ड अर्नाल्ट हे ७२ वर्षीय फ्रेंच उद्योजक आहेत. ते ब्रांड लूई विटॉन मोएट हेनेसीचे मालक आहेत. अर्नाल्ट यांच्याजवळ एकूण ७० ब्रांड्स आहेत. त्यामध्ये लुई वीटन, मार्क जॅकब्स, केंजो, स्टेला मेकार्टनी फेंडी, क्रिश्चियन डायर, गिवेंची, सेफोरा यांसारख्या फेमस ब्रांडचा समावेश आहे.

 • बर्नार्ड अर्नाल्ट यांनी वडिल जीन लिओन अर्नाल्ट यांच्या मालकीच्या फेरेट-साविनेल यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर 1978 ते 1984 या काळात त्यांनी वडिलांच्या कंपनीचे नेतृत्व देखील केले. ते १९८९ पासून LVMH कंपनीचे प्रमुख आहेत.

 • बर्नार्ड यांनी दोनदा लग्न केले असून त्यांना पाच मुलं आहेत. अॅने डेव्हरिन यांच्यासोबतच्या लग्नापासून त्यांना डेल्फाइन आणि अँटोनी नावाची मुलं आहेत. त्यांनी दुसरं लग्न १९९१ मध्ये कॅनेडियन कॉन्सर्ट पियानो वादक हेलिन मर्सियरशी केले. त्यांच्यापासून त्यांना अर्नाल्ट आणि मर्सियर यांना अलेक्झांड्रे, फ्रेडरिक आणि जीन अशी तीन मुलं आहेत.

पाच महिन्यांच्या खंडानंतर इस्रोच्या अवकाश मोहिमांना सुरुवात! १२ ऑगस्टला होणार ‘EOS-03’ चं प्रक्षेपण :
 • देशांत कोरोनोची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन सुरळित सुरु झालं असताना आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो पुनश्च हरिओम म्हणत उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना सुरुवात करत आहे. येत्या १२ ऑगस्टला इस्त्रो २२६८ किलो वजनाचा EOS-03 हा उपग्रह GSLV-F10 या प्रक्षेपकाद्वारे भूस्थिर कक्षेत पाठवणार आहे.

 • पहाटे पाच वाजून ४३ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजित आहे. या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागाची २४ तास सुस्पष्ट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे. पीक लागवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती घेणे, दुष्काळ-पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची ताजी माहिती, आपातकालीन व्यवस्थापन अशा विविध गोष्टींसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. 

 • या मोहिमेची तयारी सध्या आंध्रप्रदेशमधील श्रीहरिकोटा इथे युद्धपातळीवर सुरू असून GSLV-F10 या प्रक्षेपकाला प्रक्षेपणासाठी सज्ज करण्याचे काम केले जात आहे.

खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्यानंतर ‘भारतरत्न’बद्दल हजारो पोस्ट; मोदींकडे केली जातेय ‘ही’ मागणी :
 • राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली आहे.

 • मोदींनी यासंदर्भातील दोन ट्विट केले असून हे नाव बदलण्यामागील कारणाचाही खुलासा त्यांनी केलीय. मात्र या घोषणेनंतर ट्विटरवर भारतरत्न ट्रेण्डींग टॉपिक आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार देण्याबरोबरच आता मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणीही केली जात आहे.

 • मोदींनी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याची घोषणा केल्यानंतर Bharat Ratna हा ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिक होता. हजारो लोकांनी हा शब्द वापरुन ट्विट करण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते व्हेरिफाइड अकाऊंट असल्याने मान्यवरांचाही समावेश होता.

 • अगदी दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रींपासून ते मेजर सुंरेंद्र पुनियांपर्यंत अनेकांनी ट्विट करुन नाव बदलण्याचा निर्णय उत्तम आहे पण आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही जाहीर करावा अशी मागणी केलीय.

School Reopening in Maharashtra- शाळा १७ ऑगस्टपासून :
 • करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या गावांमधील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केल्यानंतर निर्बंध शिथिल झालेल्या नगरपालिका, नगर परिषदा आणि महापालिका क्षेत्रातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्गही १७ ऑगस्टपासून सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे. त्याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यात येणार आहेत.

 • ज्या गावात महिनाभर करोनाचा एकही बाधित आढळून आलेला नाही, तिथले इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार पहिल्या ५,६०० शाळा सुरू झाल्या. दरम्यान नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागातील शाळा पालक मंत्र्यांच्या आदेशाने बंद करण्यात आल्या. मात्र आता पुन्हा शाळा लवकरात लवकर सुरू कराव्या, यासाठी शिक्षक, पालक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या, संस्था, व्यक्ती यांच्याकडून आग्रह वाढला आहे.

 • अनेक गावांमध्ये मोबाइल, संगणक, इंटरनेट सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांसह शिक्षक, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्ते, संस्था आदींकडून शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

अकरावी प्रवेशांत राखीव जागांवरही ‘सीईटी’ला प्राधान्य :
 • केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत संस्थांतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि अल्पसंख्याक (मायनॉरिटी) या राखीव जागांवरील प्रवेश गुणवत्तेनुसार करणे आवश्यक असल्यामुळे या राखीव जागांवर सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सीईटी न देता अकरावी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 • राज्य मंडळामार्फत अकरावी प्रवेशांसाठी ऑफलाइन पद्धतीने सीईटी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सीईटी ऐच्छिक असली तरी अकरावीच्या प्रवेशांत सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 • केंद्रीय संस्थांतर्गत राखीव जागा १० टक्के, व्यवस्थापनासाठीच्या राखीव जागा ५ टक्के आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये अल्पसंख्याक राखीव जागा ५० टक्के असतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात राखीव जागांचा तपशील दिला असला, तरी राखीव जागांवर सीईटी दिलेल्या आणि सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचे धोरण स्पष्ट के ले नसल्यामुळे पालक व विद्यार्थाकडून याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. 

 • माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप म्हणाले, ‘‘अकरावी प्रवेश प्रक्रियेत सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याबाबत शासन निर्णयाद्वारे स्पष्ट के लेले आहे. तसेच राखीव जागांवर गुणवत्तेला प्राधान्य देऊन प्रवेश देणे आवश्यक आहे. त्यामुळे राखीव जागांवर प्रवेश देताना सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.’’

‘डब्ल्यूएचओ’कडून भारताला ४९ कोटी लसमात्रा :
 • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आग्नेय आशियासाठी मोठय़ा प्रमाणात करोना प्रतिबंधक लशींच्या मात्रा देण्यात आल्या असून भारताला ४८.९ कोटी लसमात्रा पुरवण्यात आल्या असल्याचे शुक्रवारी डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

 • करोना महासाथीच्या काळात या भागातील अनेक देश लसीकरण करून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे डब्ल्यूएचओच्या आग्नेय आशिया विभागीय संचालक  डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

 • ६१.८५ कोटी लसमात्रा पुरवण्यात आल्या असून त्यातून १४.६० जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जून महिन्यातील मोहिमेत ४८.९० कोटी लसमात्रा भारताला पुरवण्यात आल्या. तर इंडोनेशियाला ७.१ कोटी आणि थायलंडला १.८० कोटी लसमात्रा पुरवण्यात आल्या आहेत. तर श्रीलंकेला १.३ कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून त्यातून दर दिवशी ५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे, निवेदनात म्हटले आहे.

खेलरत्न पुरस्काराबाबतच्या निर्णयाचे क्रीडापटूंकडून स्वागत :
 • क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे भारताच्या आजी-माजी क्रीडापटूंनी स्वागत केले आहे.

 • ध्यानचंद यांनी १९२६ ते १९४९ या काळात भारताचे प्रतिनिधित्व करताना देशाला सलग तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके (१९२८, १९३२, १९३६) जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. ध्यानंचद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 • ‘‘भारतातील क्रीडा पुरस्कार देशाच्या महान क्रीडापटूंच्या नावाने देणे गरजेचे होते. परंतु विलंबाने घेतलेल्या या निर्णयाचेही स्वागत आहे. हॉकीमध्ये देशाला उच्च स्तरावर नेणाऱ्या ध्यानचंद यांना यापेक्षा उत्तम आदरांजली असू शकत नाही,’’ असे पहिली खेलरत्न पुरस्कार विजेती अ‍ॅथलेटिक्सपटू अंजू बॉबी जॉर्ज म्हणाली.

 • ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय उत्तम आहे. ध्यानचंद यांच्यापेक्षा महान क्रीडापटू देशात आजवर घडलेला नाही. त्यामुळे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कारही त्यांच्याच नावाने देणे योग्य आहे,’’ असे भारताचे माजी हॉकीपटू अजितपाल सिंग म्हणाले. याशिवाय भारतीय हॉकी संघातील माजी गोलरक्षक मिर रंजन नेगी यांनीसुद्धा या निर्णयाचे कौतुक करताना ध्यानचंद यांना लवकरच ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी मागणी केली.

०७ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)