चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ ऑगस्ट २०२०

Date : 7 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनला मोठा झटका; टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी :
  • काही दिवसांपूर्वी भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह अन्य काही चीनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अन्य देशांमधूनही अशी मागणी पुढे येत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घातली जाणार असल्याचं म्हटलं होतं.

  • यानंतर आता टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीदेखील केली आहे.

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे,” असं ट्रम्प आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले.

चिनी ‘अतिक्रमणाची’ कबुली देणारा दस्तऐवज नाहीसा :
  • चीनने पूर्व लडाखमध्ये भारतीय भूप्रदेशात ‘अतिक्रमण’ केल्याची कबुली संरक्षण मंत्रालयाच्या एका दस्तऐवजात देण्यात आली होती. मात्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील हा दस्तऐवज दुसऱ्याच दिवशी तेथून नाहीसा झाला आहे.

  • जूनमधील ‘संरक्षण विभागाची महत्त्वाची कामगिरी’ असे नमूद केलेल्या या दस्तऐवजात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये सुरू असलेल्या ‘दीर्घकालीन’ तिढय़ाचा इशारा देण्यात आला होता. विशेष म्हणजे यापूर्वी एप्रिल आणि मेच्या अहवालात संरक्षण मंत्रालयाने चिनी आक्रमणाचा उल्लेख केला नव्हता.

  • या दस्तऐवजातील उल्लेखाच्या आधारेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘खोटारडेपणाचा’ आरोप केला. हा दस्तऐवज आता संकेतस्थळावर दिसत नसल्याने, त्यांनी संकेतस्थळावरून दस्तऐवज काढल्याबद्दल सरकारवर टीका केली. कुणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही, असे सरकारने १९ जुलैला बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते.

  • हा दस्तऐवज मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून का काढून टाकण्यात आला, याबद्दल प्रतिक्रियेसाठी संरक्षण खात्याशी संपर्क साधला असता, प्रवक्त्याने काहीही बोलण्यास नकार दिला.

करोना चाचणी प्रयोगशाळांमध्ये वाढ :
  • देशात करोनाची चाचणी करणाऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात दिली.

  • ३ राज्यांमध्ये ५० टक्के रुग्ण असून ७ राज्यांमध्ये ३२ टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे १० राज्यांत एकूण ८५ टक्के रुग्ण आढळले आहेत. हे पाहता देशात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करता आला आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, १० लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन १४० नमुना चाचण्या घेणे गरजेचे आहे. देशातील ३६ पैकी ३३ राज्यांमध्ये या निकषांपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या जात आहेत. देशात रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून १३७० नमुना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा कार्यरत झाल्या आहेत, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

  • करोनाच्या उद्रेकाची माहिती चीनने जागतिक आरोग्य संघटनेला ७ जानेवारी रोजी दिली. त्यानंतर तातडीने भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले गेले. टप्प्याटप्प्याने बहुस्तरीय संस्थात्मक प्रतिसादामुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतात १० लाखांमागे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यात यश आले असल्याचे हर्षवर्धन म्हणाले.

UNSC मध्ये काश्मीर मुद्दावरुन चीन-पाकिस्तान दोघेही पडले तोंडावर :
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला भारताने आज फटकारले. आमच्या अंतर्गत विषयात चीनचा हस्तक्षेप अजिबात मान्य नाही, असे भारताने स्पष्ट केले.

  • “जम्मू-काश्मीर या भारताच्या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. चीनने पहिल्यांदाच भारताचा अंतर्गत विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. यापूर्वी सुद्धा चीनच्या अशा प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळालाय” असे परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे.

  • बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने चीनच्या समर्थनाने काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. कालच जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले, चीन-पाकिस्तानचा हा प्रयत्न मात्र यशस्वी होऊ शकला नाही. भारत-चीनमध्ये पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती असताना चीनने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला.

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य, उद्धव ठाकरे म्हणतात :
  • करोना संकटाने उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली आहे. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्न काय असेल हे केवळ दाखवले नाही, तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले.

  • जी सूट (G Suite) आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

  • सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहे. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी सूट फॉर एज्युकेशन, गुगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.

०७ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.