चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 एप्रिल 2023

Date : 7 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी AI बाबत व्यक्त केली चिंता; म्हणाले, “सोशल मीडियाचा…”
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी AI बद्दल चिंता व्यक्त केली आहे. बायडेन म्हणाले की, AI समाजासाठी धोकादायक ठरू शकतो. मात्र टेक्नॉलॉजी समाजाला कसे प्रभावित करेल हे पाहणे बाकी आहे. याआधी ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आणि Apple चे सह-संस्थापक यांनी AI बद्दल चिंता व्यक्त केली होती. मस्क यांनी तर शक्तिशाली AI चा विकास थांबवण्याचा इशाराही दिला आहे.

काय म्हणाले जो बायडेन

  • विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील अध्यक्षांच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बायडेन म्हणाले की, त्यांची प्रॉडक्ट्स लोकांसाठी लॉन्च करण्यापूर्वी सुरक्षित आहेत याची खात्री करणे ही टेक कंपन्यांची जबाबदारी आहे. एआय धोकादायक आहे का असे विचारले असता बायडेन म्हणाले ते “पाहायचे बाकी आहे” परंतु “ते धोकादायक असू शकते”. याबाबतचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
  • तसेच जो बायडेन पुढे म्हणाले, AI रोग आणि हवामान बदल यासारख्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकते. मात्र टेक्नॉलॉजीच्या विकसकांनी “आपल्या समाजासाठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य जोखीम” पाहणे आणि संबोधित करणे आवश्यक आहे.
  • मानवी-प्रतिस्पर्धी बुद्धिमत्तेसह AI सिस्टीम समाज आणि मानवतेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शक्तिशाली AI सिस्टीम केवळ तेव्हाच विकसित केली पाहिजे जेव्हा खात्री असेल की त्याचा प्रभाव सकारात्मक असेल आणि त्यांचे धोके नियंत्रित केले जाऊ शकतात. त्यामुळे अनेक टेक दिग्गजांनी AI बंदीची मागणी केली आहे.
यंदाची IPL फुकटात दाखवून Jio ला नेमका कसा फायदा होत आहे? जाणून घ्या
  • भारतात चित्रपट, राजकारण आणि क्रिकेट या तीन गोष्टींना प्रचंड महत्त्व आहे. यापैकी क्रिकेट हा सर्व भारतीयांचा धर्मच आहे, आणि याच धर्मातला एक जबरदस्त लोकप्रिय असा एक सण सध्या सुरू आहे तो म्हणजे ‘आयपीएल‘.
  • एकेकाळी क्रोमासारख्या बड्या शोरुमच्या बाहेर वेड्यासारखी गर्दी करून क्रिकेट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींचा जत्था हा आता आपआपल्या घरी ६ इंचाच्या मोबाईल समोर मान तुकवून या आयपीएल सामन्यांचा ‘फूल एचडी’मध्ये आनंद लुटत आहे. हे सगळं घडवून आणलं ते उद्योगविश्वातील दिग्गज मुकेश अंबानी आणि त्यांच्या जिओ या कंपनीने. सध्या जिओच्या माध्यमातून संपूर्ण आयपीएल विनामूल्य दाखवण्यात येत आहे.
  • २०२३ ते २०२७ पर्यंतचे ‘आयपीएल’ प्रसारणाचे हक्क बीसीसीआयने काही टप्प्यात विभागले. टेलिव्हिजनचे हक्क हे स्टार या चॅनलला मिळाले तर डिजीटल हक्क हे व्हायकॉम १८ या कंपनीला मिळाले.
  • हे हक्क मिळवण्यासाठी व्हायाकॉम १८ ने २३ हजार ७५८ कोटी खर्च केले. पण देशातील सर्वांना हा एवढा मोठा खेळ फुकटात दाखवणं नेमकं कसं काय परवडतं? जिओला त्याचा नेमका काय आणि कसा फायदा होणार आहे ते आपण जाणून घेऊया!
कर्नाटकसाठी काँग्रेसची ४१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
  • येत्या १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ४१ उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसने गुरुवारी जारी केली. अलीकडेच आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या तिघांचा यादीत समावेश आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या जेथून लढू इच्छितात त्या कोलार मतदारसंघाचा, तसेच जेथून त्यांच्या नावाला याआधीच पसंती मिळाली आहे त्या वरुणा मतदारसंघाचा या यादीत उल्लेख नाही.
  • भाजपच्या विधान परिषद आणि विधानसभा आमदारकीचा अलीकडेच राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बाबुराव चिंचनसुर व एन.वाय. गोपालकृष्ण यांना अनुक्रमे गुरुमठकल व मोळकाल्मुरू मतदारसंघांतून उमेदवारी देण्यात आली आहे. जद (एस) पक्षाची आमदारकी सोडलेले एस.आर. श्रीनिवास यांना गुब्बी येथून रिंगणात उतरवण्यात आले आहे. गोपालकृष्ण हे सध्याच्या विधानसभेत विजयनगर जिल्ह्यातील कुडलिगी मतदारसंघातील भाजपचे आमदार होते.
  • मंडय़ा जिल्ह्यातील मेलुकोटेची जागा काँग्रेसने सर्वोदय कर्नाटक पक्षाचे दर्शन पुत्तनैया यांच्यासाठी सोडली आहे. शिग्गांव मतदारसंघात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी लढत देतील अशी काहीजणांची अपेक्षा असलेले माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना धारवाडमधून निवडणूक लढण्यास सांगण्यात आले आहे.माजी मुख्यमंत्री धरम सिंह यांचे पुत्र विजय धरम सिंह यांना बसवकल्याणमधून तिकीट मिळाले आहे.

 

 ‘Dunzo’ मध्ये दुसऱ्यांदा होणार ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या
  • सध्या जगभरामध्ये आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढला आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple, Amazon अशा आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. Amazon ने आपल्या दुसरी फेरीतील कपात देखील केली आहे.  आता ग्रोसरी डिलिव्हरी करणारी कंपनी Dunzo बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या कंपनीमधील अनेक कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार आहे. कारण कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांनी कपात करणार आहे.

  • भारतातील बंगळुरू स्थित स्टार्टअप कंपनी Dunzo पुन्हा एकदा आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. रिलायन्स रिटेलच्या सहकार्याने चालणारी ही कंपनी आपल्या ३० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार किराणा वितरित करणारी Dunzo कंपनी आपल्या ३०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

  • रिपोर्टनुसार Dunzo कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कबीर बिस्वास यांनी ५ टाऊनहॉल येथे ५ एप्रिल रोजी झालेल्या बॅबिटकीत कर्मचाऱ्यांना कपातीच्या नवीन फेरीबद्दल माहिती दिली. तथापि, डंझोने अद्याप टाळेबंदीच्या नवीन फेरीबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने दिल्ली-एनसीआरसह आसपासच्या अनेक भागात आपले काही डार्क स्टोअर्स बंद केले होते. या डार्क स्टोअर्स टीममधून कंपनीने २५ ते ३५ टक्के कर्मचारी काढून टाकले होते. कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी आणि हंगामी अशा दोन्ही कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागाबाबत कोनेरू हम्पी साशंक
  • भारताची तारांकित महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी करोनाच्या भीतीमुळे या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याबाबत साशंक आहे. हम्पीने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.२०२०मध्ये चीन येथेच करोनाचे रुग्ण सर्वप्रथम सापडले होते. येथूनच करोनाचा जगभरात प्रसार झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार, ३ जानेवारी २०२० ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत चीनमध्ये ९ कोटी ९२ लाख ३८ हजार ५८६ करोनाचे रुग्ण सापडले असून १ लाख २० हजार ८९६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु गेल्या २४ तासांत चीनमध्ये नव्या करोनाबाधितांची नोंद झालेली नाही. असे असले तरी हम्पी चीनमध्ये जाणे टाळण्याची शक्यता आहे.
  • चीनमधील हांगझोऊ येथे गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार होती. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर पडली. आता या वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल १३ वर्षांनंतर बुद्धिबळ खेळाचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेबाबत विचारले असता हम्पी म्हणाली, ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये आयोजित केली जाणार असल्याने माझ्या सहभागाबाबत साशंकता आहे.’’
  • ‘‘चीनमध्ये ही स्पर्धा होणार असल्याने त्यात खेळायचे की नाही, याबाबत मी साशंक आहे. जून-जुलैपर्यंत मी अंतिम निर्णय घेईन. करोनाच्या भीतीमुळे मला या स्पर्धेतील सहभागाबाबत विचार करावा लागतो आहे. मी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी खूप उत्सुक होते. परंतु ही स्पर्धा चीनमध्ये होणार असल्याचे शल्य आहे,’’ असे ३६ वर्षीय हम्पीने सांगितले.
  • यंदा २३ सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका यांचे भारतीय बुद्धिबळ संघातील स्थान निश्चित मानले जात होते. गेल्या वर्षी महाबलीपूरम येथे झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघात हम्पीचा समावेश होता. त्यामुळे तिने आशियाई स्पर्धेतून माघार घेतल्यास भारतासाठी हा मोठा धक्का असेल.

 


 

…६, ४, ६, ६, ४, ६ ! पंधरा चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून कमिन्सने रचला नवा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात :
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १४ सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असून कोलकाताचा पाच गडी राखून विजय झाला आहे. या विजयासाठी श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स यांनी दिमाखदार खेळ करत विजय अक्षरश: खेचून आणला. पॅट कमिन्सने तर या डावात १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करुन नवा विक्रम रचला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान आणि कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठऱला आहे. त्याच्या या कामगिरीला पाहून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यानेदेखील आश्चर्य व्यक्त केलंय.

  • मुंबईने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता संघ अडचणीत सापडला होता. कोलकाताची १०१ धावा पाच गडी बाद अशी स्थिती झाली होती. मात्र रसेल बाद झाल्यानंतर आलेल्या पॅट कमिन्सने पूर्ण सामनाच फिरवून टाकला. मैदावर येताच त्याने चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करून कोलकाताला विजय मिळवून दिला.

  • त्याच्या या कामगिरीमुळे कोलकाता संघाने मुंबईवर पाच गडी आणि तीन षटके राखून दणदणीत विजय मिळवला. या धमाकेदार फलंदाजीनंतर पॅट कमिन्सच्या नावावर अनोख्या विक्रमांची नोंद झाली आहे.

एसटी कर्मचारी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कामगारांना दिला अल्टिमेटम :
  • गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

  • एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. मात्र, तोपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ कारवाई करू शकते, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून आता पुढील १० दिवसांत कामावर हजर न झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याची त्रिसदस्यीय समितीने केलेली शिफारस मान्य करण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्याचबरोबर दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली. मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करून प्रयत्न सुरू केल्याकडे लक्ष वेधले.

  • त्याच वेळी दोन्ही बाजू, विशेषत: संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकायचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. परंतु संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली होती. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

अंबानी अदानींमध्ये चुरस; पाहा कोण ठरले भारतातील Top 10 श्रीमंत व्यक्ती :
  • फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील अनेक दिग्गजांनी आपले स्थान निर्माण केले आहे. श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

  • मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९०.७ अब्ज डॉलर आहे. अंबानी हे जगातील १० व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, गौतम अदानी, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत.

  • HCL Technologies Limited चे संस्थापक शिव नाडर हे फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप १० श्रीमंत भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीतील पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या यादीत सायरस पूनावाला चौथ्या स्थानावर आहे. त्यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाची लस कोव्हशील्ड बनवली आहे. पूनावाला यांची एकूण संपत्ती २४.३ अब्ज डॉलर्स आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सुरक्षा परिषदेच्या इतिवृत्ताची मागणी :
  • पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल) बैठकीचे इतिवृत्त मागवतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव नाकारण्याच्या नॅशनल असेम्ब्लीच्या उपाध्यक्षांच्या वादग्रस्त निर्णयाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण प्रकरणाची सुनावणी एका दिवसाने, म्हणजे गुरुवापर्यंत लांबणीवर टाकली. हा अविश्वास ठराव सरकार उलथून पाडण्याच्या एका ‘विदेशी कारस्थानाशी’ संलग्न असल्यामुळे तो दखलपात्र नाही असा निर्णय नॅशनल असेम्ब्लीचे उपाध्यक्ष कासिम सुरी यांनी रविवारी दिला होता. यानंतर काही वेळातच, अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान खान यांच्या शिफारशीवरून नॅशनल असेम्ब्ली विसर्जित केली.

  • सर्वोच्च न्यायालयाने काही तासांतच या घडामोडीची स्वत:हून दखल घेतली आणि पाच सदस्यांच्या खंडपीठाने सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. सरन्यायाधीश उमर अता बंडियाल यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठात इजाझुल अहसान, मोहम्मद अली मझहर, मुनीब अख्तर व जमाल खान मंडोखेल या न्यायाधीशांचा समावेश आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीच्या सुनावणीत बाबर अवान हे पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्यावतीने, तर अली झफर हे अध्यक्ष अल्वी यांच्या वतीने उपस्थित होते.

  •  पीटीआयप्रणीत सरकारला हटवण्यासाठीच्या विदेशी कारस्थानाचा पुरावा दर्शवणाऱ्या पत्रावर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) नुकत्याच झालेल्या ज्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती, तिच्या इतिवृत्ताबाबत सरन्यायाधीश बंडियाल यांनी अवान यांना विचारणा केली.  

  • उपाध्यक्षांनी ज्या आधारावर हा निर्णय दिला, त्याबाबत न्या. बंडियाल यांनी प्रश्न विचारल्याचे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले. ‘वस्तुस्थिती न मांडता अध्यक्ष असा निर्णय जाहीर करू शकतात काय?’ असे विचारतानाच, या घटनात्मक मुद्यावर न्यायालयाला निर्णय घ्यायचा असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले. ‘ठोस’ पुराव्यासह अध्यक्षांच्या निर्णयाचे समर्थन करावे, असा सल्ला त्यांनी पीटीआयच्या वकिलांना दिला आणि एनएससीचे इतिवृत्त न्यायालयात सादर करण्यास सांगितले.

०७ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.