चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ नोव्हेंबर २०२०

Date : 6 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तृणमूल सरकारची मृत्युघंटा वाजल्याची जाणीव - गृहमंत्री :
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध जनक्षोभ उसळला असल्याची आपल्याला जाणीव झाली आहे. त्यांच्या सरकारची मृत्युघंटा वाजली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे सांगितले.

  • ‘शोनार बांगला’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात भाजपला सरकार स्थापनेची संधी द्या, अशी विनंतीही शहा यांनी जनतेला केली आहे.

  • बुधवारी रात्रीपासून आपण पश्चिम बंगालमध्ये आहोत आणि सरकारविरुद्ध जनक्षोभ असल्याची जाणीव आपल्याला झाली आहे, इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच बदल घडू शकतो याची जाणीव जनतेला झाली असल्याचेही दिसून येत आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.

मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार :
  • महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.

  • महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.

  • सोलापूरमध्ये होणार पुरस्कार वितरण - यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप :
  • वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा पेच दिवसागणित अधिकच वाढत आहे. एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. अनधिकृत मतांच्या माध्यमातून विजय चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसा ज्यो बायडन यांना २६४ तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.

  • प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, जर तुम्ही वैध मतांची मोजणी केली तर मी सहजपणे जिंकत आहे. मात्र जर तुम्ही अवैध मतांची (मेल इन बॅलेट्स) मोजणी केली तर डेमोक्रॅट आमच्याकडून विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मी अनेक मोठ्या राज्यांमध्ये ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.

  • यावेळी विविध माध्यमांनी दाखवलेल्या ओपिनियन पोल्सवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली. ओपिनियन पोल्स घेणाऱ्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण देशाता ब्लू व्हेव दाखवली. प्रत्यक्षात अशी कुठलीही लाट नव्हती. संपूर्ण देशात मोठी रेड व्हेव आहे. याचा प्रसारमाध्यमांना अंदाज होता. मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर :
  • राज्यातील करोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, आज राज्यात नव्याने ५,२४६ करोनाचे रुग्ण आढळून आले. तर ११७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

  • आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. तसेच आत्तापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्के एवढे झाले आहे.

  • दरम्यान, आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

  • सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या १७,०३,४४४ झाली आहे.

०६ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.