चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ डिसेंबर २०२१

Date : 6 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रशियाचे अध्यक्ष पुतिन आज भारत दौऱ्यावर :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे आज, सोमवारी नवी दिल्लीत आगमन होणार आहे. भारत रशियाकडून एस-४०० ही प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा ताब्यात घेणार असून, त्यानिमित्ताने पुतिन हे गेल्या सहा महिन्यांत प्रथमच एखाद्या देशाचा दौरा करत आहेत. ही खरेदी म्हणजे ५ अब्ज डॉलरच्या शस्त्र खरेदी व्यवहाराचा भाग आहे.

  • एरवी अशा व्यवहारांसाठी अमेरिकेचे निर्बंध लागू होण्याचा धोका पत्करून भारत रशियाकडून अब्जावधी डॉलरची शस्त्रसामुग्री खरेदी करत आहे. मात्र चीनला आटोक्यात ठेवण्याच्या आपल्या प्रयत्नांत भारतालाही सामील करून घेण्यास इच्छुक असलेली अमेरिका याकडे डोळेझाक करू शकते.

  • एस-४०० प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेची खरेदी हा ५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या शस्त्रखरेदी व्यवहाराचा भाग आहे.

  • नाटोचा मित्रदेश असलेल्या तुर्कस्तानने अशाचप्रकारची खरेदी केल्यानंतर अमेरिकेने आपली आधुनिक एफ-३५ लढाऊ विमाने त्या देशाला विकण्यावर निर्बंध घातले होते.

देशात निम्म्याहून अधिक प्रौढांचे करोना लसीकरण :
  • लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसमात्रांची संख्या १२७.६१ कोटींहून अधिक झाली असल्याने, भारताच्या पात्र प्रौढ लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक जणांचे करोना प्रतिबंधक लसीकरण झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी सांगितले.

  • भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी ८४.८ टक्क्यांहून अधिक लोकांना करोना प्रतिबंधक लशींची पहिली मात्रा देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • ‘भारताचे अभिनंदन. पात्र लोकसंख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे संपूर्ण लसीकरण होणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपण सारे मिळून करोनाविरुद्धची लढाई जिंकू’, असे ट्वीट मांडविया यांनी केले.

  • २४ तासांच्या कालवधीत १,०४,१८,७०७ लसमात्रा देण्यात आल्यामुळे, देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या १२७.६१ कोटींहून अधिक झाली असून; १,३२,४४,५१४ सत्रांद्वारे हे साध्य झाले असल्याचे सकाळी ७ वाजेपर्यंतच्या हंगामी अहवालात म्हटले आहे.

ड्रोननविरोधी देशी तंत्रज्ञान लवकरच :
  • देशाच्या सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या संशयित हालचाली हाणून पाडण्यासाठी भारत ड्रोनविरोधी देशी तंत्रज्ञान विकसित करीत आहे. हे तंत्रज्ञान लवकरच सुरक्षा दलांना पुरविले जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिली. 

  • सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५७ व्या स्थापना दिनानिमित्त राजस्थानातील जैसलमेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहा यांनी उपस्थित अधिकारी-जवानांना सांगितले की, देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल.

  • ड्रोनमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता ड्रोनविरोधी सुरक्षा यंत्रणा तयार करण्याचे काम सध्या बीएसएफ, एनएसजी आणि डीआरडीओ यांच्यातर्फे सुरू आहे. आमच्या शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. देशात विकसित केलेले ड्रोनविरोध तंत्रज्ञान लवकरच आम्हाला प्राप्त होईल.

  •  या वेळी प्रथमच भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफचा स्थापना दिन साजरा झाला. याचे गृहमंत्र्यांनी स्वागत केले. खरे तर असे कार्यक्रम हे दिल्लीत न होता जेथे जवान आपला पराक्रम दाखवितात तेथेच व्हायला पाहिजेत, असे ते म्हणाले.

जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा - सिंधूला उपविजेतेपद :
  • भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडिमटन मालिकेच्या अंतिम टप्प्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला कोरियाच्या आन सेयंगने सरळ गेममध्ये पराभूत केले.

  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला मागील काही काळात जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत १९ वर्षीय सेयंगने तिचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला. ४० मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूला सेयंगचा बचाव भेदता आला नाही किंवा तिने केलेल्या वेगवान खेळाचे उत्तरही देता आले नाही. सिंधूची सरळ गेममध्ये पराभूत होण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली.

  • सिंधूने वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे २०१८ मध्ये जेतेपद पटकावले होते. यंदा अंतिम लढतीत तिला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये सुरुवातीलाच ती ०-४ अशी मागे पडली. सेयंगने वेगवान पद्धतीने खेळ करत १६-८ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण सेयंगला हा गेम २१-१६ असा जिंकण्यात यश आले.

मुंबई पोलीस भरतीसाठी सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर ; आरक्षित वर्गातील शेकडो उमेदवारांना लाभ :
  • मुंबई पोलीस शिपाई भरती-२०१९ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाच्या नियमाला बगल देत ‘कट ऑफ’ जाहीर करण्यात आला होता. यासंदर्भात ‘लोकसत्ता’मधील वृत्ताची दखल घेत पोलीस विभागाने सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर केला आहे. सुधारित ‘कट ऑफ’नुसार ज्या उमेदवारांना शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले नसल्यास त्यांनी ६ ते ८ डिसेंबरदरम्यान लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामुळे आरक्षित वर्गातील अनेक उमेदवारांना संधी मिळणार आहे.

  • मुंबई पोलीस शिपाई भरतीकरिता १४ नोव्हेंबरला अकराशे जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर उत्तरतालिकेवरील हरकतींचे समाधान करून २६ नोव्हेंबरला सदर लेखी परीक्षेची सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय १:१० प्रमाणातील पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याचे पोलीस विभागाने त्यांच्या पत्रात सांगितले आहे.

  • मात्र, या यादीत खुल्या प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ (७७) हा आरक्षित प्रवर्गापेक्षा कमी होता. त्यामुळे या भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणाच्या नियमाला बगल देण्यात आल्याने आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचे नुकसान होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलीस विभागातील निवड समितीची बैठक घेण्यात आली.

  • या बैठकीत एका सदस्याने भरती प्रक्रियेमधील ‘कट ऑफ’वर आक्षेप घेतला. त्यामुळे निवड समितीने यासंदर्भात राज्य शासनाला मार्गदर्शन मागितले होते. यानंतर ४ डिसेंबरला पोलीस शिपाई भरतीचा सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर करण्यात आला आहे. या ‘कट ऑफ’मधील संबंधित उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी, शारीरिक मोजमाप चाचणी या प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले आहे. जर, या ‘कट ऑफ’प्रमाणे एखाद्या उमेदवाराला बोलवण्यात आले नसल्यास त्याने ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत पोलीस मुख्यालय, संकुल हॉलच्या बाजूला, नायगाव, दादर पूर्व, मुंबई येथे भेटून लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०६ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.