चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ ऑगस्ट २०२१

Date : 6 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अदर पूनावाला यांची मोठी घोषणा; आर्थिक मदतीसाठी घेतला पुढाकार :
  • करोना काळामध्ये देखील अनेक देशांमध्ये निर्बंध अजूनही कायम आहेत. पण काही देशांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध उठवले आहेत. अशा देशांमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता संबंधित देशात जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना परदेशात गेल्यावर क्वारंटाईन केलं जात आहे.

  • सिरम इन्स्टिट्युटतर्फे उत्पादित केली जाणारी कोविशिल्ड लस घेऊनही काही विद्यार्थ्यांना संबंधित देशामध्ये क्वारंटाईन व्हावं लागत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी मदतीचा हात पुढे केला असून तब्बल १० कोटींची रक्कम या विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवल्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.

  • अदर पूनावाला यांचं ट्वीट - सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केलं आहे. त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत केली जाणार आहे, त्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. “परदेशी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनो…काही देशांमध्ये अजूनही कोविशिल्ड लसीला परवानगी मिळालेली नाही.

  • क्वारंटाईन न होता त्या देशात प्रवेश करण्यासाठी कोविशिल्ड लसीला संबंधित देशाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे अशा देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचा खर्च येतो. याचसाठी मी १० कोटींचा निधी बाजूला काढून ठेवला आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे”, असं अदर पूनावाला या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

अकरावी ‘सीईटी’ साठी ११ लाख अर्ज :
  • राज्य मंडळातर्फे  होणाऱ्या अकरावीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) आदी मंडळांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर एकूण १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

  • अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता राज्य मंडळाच्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे.

  • करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य मंडळातर्फे  सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.

  • राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालात १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक २ लाख ५५ हजार ६४३ अर्ज मुंबई विभागातून भरले गेले आहेत, तर सर्वात कमी २० हजार ५६६ अर्ज कोकण विभागातून भरले गेले आहेत.

१३५ देशांत डेल्टाचा कहर; जागतिक रुग्णसंख्या २० कोटींवर  :
  • करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक करोना अपडेटमध्ये म्हटलंय.

  • जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, २६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ४० लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असेही अपडेटमध्ये म्हटले आहे.

  • जागतिक पातळीवर नोंदवल्या गेलेल्या प्रकरणांची एकत्रित संख्या आता जवळपास १९.७ कोटी झाली असून एकूण मृतांची संख्या ४२ लाख झाली आहे. रुग्णांची संख्या याच गतीने वाढत राहिली तर पुढच्या आठवड्यात रुग्णसंख्या २० कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.गेल्या आठवड्यात सर्वात जास्त ५ लाख ४३ हजार ४२० रुग्ण अमेरिकेत आढळले असून त्यापाठोपाठ २ लाख ८३ हजार ९२३ रुग्ण भारतात आढळले आहेत.

  • तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया, नंतर ब्राझील आणि इराण आहेत. तर, गेल्या आठवड्यात सर्वाधिक मृत्यू १२ हजार ४४४ इंडोनेशियात झाले असून त्यापाठोपाठ भारतात ३ हजार ८०० मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे.

SBI बँक खातेदारांसाठी सूचना; महत्त्वाचं काम लवकर करा, कारण :
  • एसबीआय डिजिटल व्यवहार करणाऱ्या खातेदारांसाठी बँकेनं महत्त्वाची सूचना दिली आहे. खातेदारांना यूपीआय, इंटरनेट बँकिंक, योनो आणि योन लाइट सुविधा वापरताना काही तास अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

  • एसबीआय ६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ७ ऑगस्टला मध्यरात्री १ वाजून १५ पर्यंत देखभालीचं काम हाती घेणार आहे. त्यामुळे ऑनलाइन सुविधा वापरता येणार नाहीत. जवळपास दोन तास ही सुविधा बंद असणार आहे. बँकेनं खातेदारांना याबाबतची आगाऊ सूचना दिली आहे.

  • “बँक ६ ऑगस्ट २०२१ ला रात्री १०.४५ ते ७ ऑगस्टला रात्री १.४५ मिनिटापर्यंत देखभालीचं काम करणार आहे. जवळपास १५० मिनिटं आपल्याला सुविधा मिळणार नाही. बँकिंग सुविधा अपग्रेड करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”, असं ट्वीट एसबीआयनं केलं आहे. यापूर्वी १६ जुलै, १३ जूनला एसबीआयने देखभालीचं काम हाती घेतलं होतं. मे महिन्यातही एसबीआयची योनो, योनो लाइट, इंटरनेट बँकिंग, यूनिफाइड पेमेंटसह डिजिटल बँकिंग खंडित झाली होती.

भारताला कुस्तीमध्ये रौप्य, तर हॉकीत कांस्य :
  • टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील गुरुवारचा दिवस भारतासाठी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. हॉकीमध्ये तब्बल चार दशकांहून सुरू असलेला पदकदुष्काळ संपुष्टात आणताना भारतीय पुरुष संघाने कांस्यपदकाची कमाई केली. कुस्तीमध्ये भारताच्या रवी कुमार दहियाला सुवर्णपदकावर नाव कोरण्यात अपयश आले. मात्र रौप्यपदक जिंकून भारताचे पदक पंचक साकारण्यात त्याने अमूल्य योगदान दिले.

  • मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हॉकीतील शिलेदारांनी बलाढ्य जर्मनीला ५-४ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारताला पदकाचे दर्शन घेता आले. राष्ट्रीय खेळातील या कामगिरीमुळे देशभरात आनंदाचे वातावरण होते.

  • कुस्तीमधील ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियन ऑलिम्पिक समितीच्या झॅव्हूर युग्येव्हने रवीला ७-४ असे नमवले. त्यामुळे भारताचा ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्णपदकाचा शोध अद्याप कायम आहे. मात्र एकूण पाच पदकांसह भारताने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांच्या विक्रमाला मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

पदकविजेते…

  • मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)
  • पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन)
  • लवलिना बोर्गोहाइन (बॉक्सिंग)
  • भारतीय पुरुष संघ (हॉकी)
  • रवी कुमार दहिया (कुस्ती)

०६ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.