चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ ऑगस्ट २०२०

Date : 6 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल :
  • जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करणअयात आली आहे. जीसी मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. काल मूर्मू यांनी आपल्या उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.

  • बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झालं. मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचं सांगण्यात येतं. तसंच राज्यात दहशतवाद आणि दगडफेकीसारख्या घटनांमध्येही घट झाली आहे.

  • कोण आहेत मनोज सिन्हा - मनोज सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहे. मनोज सिन्हा हे भाजपाचा मोठा चेहराही मानले जातात. २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आलं नव्हतं. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती.

आत्मनिर्भर भारतासाठी आत्मविश्वास :
  • भारत आत्मनिर्भर बनवण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आणि आत्मभानाची गरज होती, त्याचा शुभारंभ राम मंदिराच्या भूमिपूजनातून झाला आहे. देशभर आनंदाचे वातावरण असून शतकानुशतकांचे स्वप्न पूर्ण होत आहे, अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या.

  • अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे ध्येय ठरवले होते. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणाले होते, या ध्येयपूर्तीसाठी २०-३० वर्षे काम करावे लागेल. ३० व्या वर्षी ध्येयपूर्तीचा आनंद मिळाला आहे. राम मंदिरासाठी अनेकांनी बलिदान दिले, ते सूक्ष्म रूपाने इथे उपस्थित आहेत.

  • राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते अशोक सिंघल इथे असते तर किती बरे झाले असते. महंत परमहंस रामदास असायला हवे होते. रथयात्रेचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी घरात बसून हा कार्यक्रम पहात असतील. जे आहेत आणि इथे येऊही शकतात त्यांना बोलावता आले नाही. करोनामुळे परिस्थितीच वेगळी आहे; पण ईश्वराच्या इच्छेनुसार सगळे होते, अशा शब्दांत भागवत यांनी मोदीमय समारंभात अडवाणी आणि सिंघल यांची आठवण काढली.

  • साऱ्या जगाला आपल्यात आणि आपण साऱ्या जगात बघण्याच्या आध्यात्मिक दृष्टीचा हा शुभारंभ आहे. राम मंदिराची उभारणी म्हणजे देशात एकता आणि जगात नेतृत्वाच्या प्रतीकाची स्थापना आहे. जेवढे शक्य असेल तेवढे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे. जगात संघर्ष सुरू आहे, या काळात भारतच नेतृत्व करू शकेल. भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. करोनामुळे अवघे जग अंतर्मुख झाले आहे. काय चुकले याचा विचार करत आहे. या संकटातून भारत जगाला बाहेर काढू शकेल, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली - योगी आदित्यनाथ :
  • राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

  • संपूर्ण देशाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं होतं. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना ५०० वर्षांपूर्वीच्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याची भावना व्यक्त केली.

  • “या क्षणामागे ५०० वर्षांचा संघर्ष, साधना आहे. भारताची लोकतांत्रिक मूल्य, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे. या क्षणाची वाट पाहत अनेक पिढ्या गेल्या.

  • अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं. आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभं राहावं अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसंच शांततेच्या मार्गाने समस्येचं निराकरण कसं केलं जातं हे दाखवून दिलं आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे,” असं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटलं.

काळी-पिवळी वाहन चालकाचा मुलगा ‘यूपीएससी’त अव्वल :
  • वडील काळी-पिवळी वाहन चालक, घरची परिस्थिती बेताचीच. पण त्याने अभ्यासाची जिद्द सोडली नाही. बारावीच्या परीक्षेत तो जिल्ह्यात प्रथम आला. तेव्हाच त्याने प्रशासकीय सेवेत जाण्याचा निश्चय केला आणि मंगळवारी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात त्याचे स्वप्न पूर्ण झाले. यवतमाळच्या रचना कॉलनीतील अजरोद्दिन जहिरोद्दिन काजी याची ही यशोगाथा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी ठरली आहे.

  • जिल्ह्याच्या इतिहासात यावेळी प्रथमच तीन विद्यार्थ्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. यवतमाळचा अजरोद्दिन काजी याने देश पातळीवर ३१५ वी रँक, वणी येथील अभिनव प्रवीण इंगोले याने ६२४ वी तर याच तालुक्यातील शिरपूर येथील सुमित सुधाकर रामटेके याने ७४८ वी रँक मिळवून यवतमाळचा गौरव वाढवला.

  • अजरोद्दिन काजी हा यवतमाळच्या रचना कॉलनीतील राहतो. त्याचे वडील काळी-पिवळी वाहन चालक होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही अजरोद्दिनने २००६ मध्ये बारावीची परीक्षा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. पदवीधर झाल्यानंतर बँकेत नोकरी लागली. मात्र प्रशासकीय सेवेत जायचे असल्याने ती सोडून दोन वर्षे दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. आर्थिक अडचणी असताना वडील आणि घरच्या मंडळींनी मोलाचा हातभार लावला. परीक्षेच्या आधी टीव्ही पाहणे बंद केले होते. मात्र पुस्तकं आणि मोबाईलचा अभ्यासात फायदा झाल्याचे त्याने सांगितले.

जैव-सुरक्षा नियमाचा भंग केल्यास शिक्षा :
  • आठ संघांसाठी वेगवेगळे हॉटेल्स, संयुक्त अरब अमिरातीकडे प्रस्थान करण्यापूर्वी दोन नकारात्मक कोविड चाचण्या आणि जैव-सुरक्षा नियमाचा भंग केल्यास शिक्षा अशा मुद्दय़ांचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी संघांकडे सुपूर्द केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीत समावेश आहे.

  • ‘आयपीएल’ पदाधिकारी आणि संघमालक यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत विलगीकरणासह काही मुद्दय़ांवर गांभीर्याने  झाली. प्रत्येक संघाच्या वैद्यकीय चमूकडे १ मार्चपासूनची खेळाडू आणि साहाय्यकांची वैद्यकीय माहिती उपलब्ध असेल. त्यामुळे अमिरातीत करोनाचा प्रसार रोखता येईल आणि स्पर्धा उत्तम वातावरणात पार पडेल, असे ‘बीसीसआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

  • ‘आयपीएल’ आचारसंहितेनुसार कोणत्याही खेळाडू किंवा साहाय्यक मार्गदर्शकाने जैव-सुरक्षा नियमाचा भंग केल्यास त्याला शिक्षा देण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीची करोना चाचणी सकारात्मक आल्यास त्याला विलगीकरण स्वीकारावे लागेल. त्यानंतर १४ दिवसांनी २४ तासांच्या अंतरात त्याच्या दोन करोना चाचण्या होतील. या दोन्ही चाचण्यांचे अहवाल नकारात्मक येणे आवश्यक आहे.

०६ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.