नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली. करोना प्रतिबंधक लशीच्या ४०-५० कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून २०२१च्या जुलैपर्यंत २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
लसीकरणात करोना साथनियंत्रणासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. लशीचे डोस तयार झाल्यानंतर सर्व राज्यांना योग्य आणि न्याय्य पद्धतीने त्यांचे वितरण करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमात बोलताना दिली.
लसीकरणासाठी प्राधान्य असलेल्या लोकसमूहांच्या याद्या राज्यांनी ऑक्टोबरअखेपर्यंत केंद्राला देणे अपेक्षित आहे. या याद्यांमध्ये साथ नियंत्रणाच्या आघाडीवर काम करणारे सरकारी आणि खासगी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा कर्मचारी, रुग्ण- संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणारे, चाचण्या करणारे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक आदींचा समावेश असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लशीच्या ४०-५० कोटी मात्रा जुलै २०२१पर्यंत उपलब्ध होतील. त्यातून सुमारे २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज आहे. लसीकरण मोहिमेच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
वॉशिंग्टन : करोनाग्रस्त झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लष्करी रुग्णालयात दाखल केले असून आता ँप्रकृती सुधारत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पहिल्या दिवशी फारसे स्वस्थ वाटत नव्हते, पण नंतर दुसऱ्या दिवशी चांगले वाटत आहे. पहिल्या दिवशी ताप व कफ होता. तो आता नाही. आपण लवकरच कामास सुरुवात करू ,असे त्यांनी सांगितले.
ट्रम्प हे रुग्णालयातून कामकाज पाहात असल्याची छायाचित्रेही प्रसारित झाली आहेत. अमेरिकन जनता व जागतिक नेत्यांनी या आजारपणाच्या प्रसंगात आपल्याला जो पाठिंबा दिला त्याबाबत त्या सर्वाचे आभार, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
व्हाइट हाऊसचे डॉक्टर शीन कॉन्ले यांनी सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प हे अजून बरे झालेले नाहीत. आम्ही त्यांच्या प्रकृतीबाबत आशावाद बाळगून आहोत. रविवारीही त्यांना रेमडेसिवीर देण्यात आले असून अध्यक्षीय कामकाज ते पार पाडत आहेत. त्यांना रेगेरॉन्स प्रतिपिंड मिश्रण देण्यात आले.
कॉन्ले यांनी सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प यांची प्रकृती सुधारत आहे. रेमडेसिवीरची दुसरी मात्रा दिल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत झालेली नाही. आता त्यांना ताप नसून ऑक्सिजन देण्याची वेळ आलेली नाही. त्यांची ऑक्सिजनची पातळी दिवसभरात ९६ ते ९८ होती. काल दुपारी त्यांनी काम केले. संरक्षकपोशाखातही ते सहज वावरत आहेत.
करोनाच्या संकटातून सावध पावलं टाकत केंद्र सरकारनं शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचं लक्ष लागलं होतं. अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयं बंद होती. आता राज्य अनलॉत होत आहे. त्यातच शाळाही सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
अमरावती : हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना आतापर्यंत आठ ते दहा पत्रे दिली. मात्र अद्यापही अध्यक्षाची नेमणूक झाली नसल्याची खंत राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्याच सरकारबाबत व्यक्त केली आहे. लवकरच सर्व मंत्री एकत्र बसून महिला आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करतील, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, करोना संकटाच्या काळातही घरगुती हिंसाचार, कार्यालयस्थळी लैंगिक छळ, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा स्थितीत महिला आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि नेत्यांना मी पत्रे लिहिली, पण अजून महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीचा मुहूर्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सापडलेला नाही.
भाजप सरकारमध्ये विजया रहाटकर या राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, मात्र त्यांनी ४ फेब्रुवारीला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. परंतु अध्यक्ष नेमण्यासाठी सर्व जण एकत्र येऊन लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पॅरिस : फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेचा माजी विजेता स्टॅनिस्लॉस वॉवरिंकाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास आणि सोफिया केनिन यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत मजल मारली. ‘लाल मातीवरील बादशाह’ राफेल नदाल तसेच जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि किकी बेर्टेन्स यांनी आपापले सामने सहज जिंकत उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.
ग्रीसच्या त्सित्सिपासचे ६-१, ६-२, ३-१ असे वर्चस्व असताना अल्जाझ बेडेने याने घोटय़ाच्या दुखापतीमुळे माघार घेतली. तीन ग्रँडस्लॅम विजेत्या वॉवरिंकाला नमवत फ्रान्सच्या ह्य़ुगो गॅस्टनने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तीन तास, १० मिनिटे रंगलेल्या तिसऱ्या फेरीच्या लढतीत गॅस्टनने २-६, ६-३, ६-३, ४-६, ६-० असा विजय मिळवला.
स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालने इटलीच्या स्टेफानो ट्रॅव्हाग्लियाचा अवघ्या दीड तासात ६-१, ६-४, ६-० असा सहज फडशा पाडला. रशियाच्या आंद्रेय रुबलेव्हने दक्षिण आफ्रिकेच्या केनिन अँडरसनवर ६-३, ६-२, ६-३ असा विजय मिळवला. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने इटलीच्या मार्को चेचिनाटोचे आव्हान ६-१, ७-५, ६-३ असे परतवले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.