चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ जून २०२१

Date : 5 June, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींकडून शास्त्रज्ञांचे कौतुक :
  • कोविड-१९ ची मेड इन इंडिया लस तयार केल्याबद्दल आणि करोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा प्रतिकार करण्यासाठी केवळ एका वर्षातच अन्य उपाययोजनांना चालना दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले.

  • व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रीसर्च  सोसायटीच्या बैठकीला संबोधित करताना मोदी  म्हणाले की, भारताने देशात कोव्हॅक्सिन लस विकसित केली, शास्त्रज्ञांनी करोना चाचणी किट तयार करून भारताला स्वयंपूर्ण बनविले, अल्पावधीत  औषधे शोधून काढली, प्राणवायू निर्मितीला चालना दिली.

भारतीय नौदलासाठी आणखी सहा पाणबुड्या :
  • नौदलासाठी देशी बनावटीच्या सहा पारंपरिक सहा पाणबुड्यांची बांधणी करण्याच्या ४३ हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पाला शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली.

  • चीन आपल्या सागरी क्षमतेमध्ये वाढ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे धैर्य वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील परदेशी कंपन्यांसमवेत देशी संरक्षण उत्पादकांची सामरिक भागीदारी असावी याबाबत चर्चा सुरू होती त्यानुसार या पाणबुड्यांची बांधणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

  • या महाप्रकल्पाचे ‘पी-७५ इंडिया’ असे नामकरण करण्यात आले असून त्याला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची अंमलबजावणी  १२ वर्षांत केली जाणार आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि माझगाव डॉक लि.ला विनंतीप्रस्ताव दिला जाणार आहे.

आता बँक हॉलिडेच्या दिवशीही खात्यात पगार जमा होणार! RBI चा नवा निर्णय :
  • सामान्यपणे सरकारी किंवा खासगी अशा दोन्ही ठिकाणी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पगार जमा होतात. मात्र, कधीकधी पगार जमा होण्याच्या ठरलेल्या तारखेच्या दिवशीच सार्वजनिक सुट्टी, वीकएंड किंवा सणासुदीची सुट्टी येते आणि पगार जमा होणं लांबतं. मात्र, येत्या १ ऑगस्टपासून आठवड्याच्या कोणत्याही दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी देखील पगार, पेन्शन, व्याज, डिव्हिडंड आपल्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI नं यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. यानुसार नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस अर्थात NACH ची सुविधा आठवड्याच्या सातही दिवशी आणि वर्षाच्या पूर्ण ३६५ दिवशी उपलब्ध राहणार आहे. आरबीआयनं परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.

  • कोणत्या प्रकारच्या ट्रान्सफरला होणार फायदा - आरबीआयने परिपत्रकात म्हटल्यानुसार, सध्याच्या कोविड काळामध्ये सरकारी अनुदान असो किंवा खूप साऱ्या खात्यांमध्ये एकाचवेळी ट्रान्सफर करण्याची रक्कम असो, त्यासाठीच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) साठी NACH लाच सर्वाधिक पसंती मिळते आहे. सध्या या माध्यमातून डिव्हिडंड, व्याज, पगार, पेन्शन, वीजबिलाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करणं, गॅस, टेलिफोन, पाण्याची बिलं जमा करणं किंवा कर्जावरील व्याज, म्युच्युअल फंड, विम्याचे हफ्ते भरण्यासाठी देखील या सुविधेचा वापर केला जातो.

  • १ ऑगस्टपासून मिळणार सुविधा - सध्या NACH ची सुविधा फक्त बँक सुरू असते त्याच दिवशी दिली जाते. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी ही सुविधा देखील बंद असते. मात्र, येत्या १ ऑगस्टपासून आठवड्याचे सर्व दिवस ही सुविधा सुरू असेल. RTGS आता आठवड्याच्या सर्व दिवशी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच आधारे ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

नव्या नियमांमध्ये e Pass संदर्भातही मोठे बदल; अनेक जिल्ह्यांना दिलासा तर काही ‘जैसे थे’ :

महाराष्ट्रामध्ये अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शनिवारी मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली असून त्यावर आधारीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

एकूण पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच जिल्ह्यांमध्ये प्रवासासंदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. खासगी गाड्या, टॅक्सी किंवा बसने लांबचा प्रवास करण्यासंदर्भातील नियमांमध्ये झालेला हा बदल आणि हे स्तर नक्की काय आहेत जाणून घेऊयात.

  • पहिला गट - ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

  • दुसरा गट - पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

  • तिसरा गट - पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

  • चौथा गट - पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

  • पाचवा गट - पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

भारतीय खेळाडूंचे कडक विलगीकरण :
  • न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी एजेस बाऊल येथे सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना तीन दिवसांच्या कडक विलगीकरणाला सामोरे जावे लागत आहे. यात आम्हाला एकमेकांनाही भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असे भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने सांगितले.

  • भारतीय संघ बुधवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला असून, न्यूझीलंडचा संघ मात्र सध्या येथे दोन कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडशी खेळत आहे. भारतीय संघाने दौऱ्यावर निघण्यापूर्वीच मुंबईत १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण केले. त्यानंतर विशेष विमानाने भारताचे पुरुष आणि महिला संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले.

०५ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.