चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ जुलै २०२१

Date : 5 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पुष्कर सिंह यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ :
  • उत्तराखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत पूर्वीच्या तीरथसिंह रावत मंत्रिमंडळातील ११ सदस्यांचाही शपथविधी झाला.

  • सत्ताधारी भाजपचे काही खासदार व आमदार, तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत राजभवन परिसरात झालेल्या एका साध्या कार्यक्रमात राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी धामी व त्यांच्या सहकाऱ्यांना पदाची शपथ दिली. धामी यांच्या मंत्रिमंडळात कुठलाही नवा चेहरा घेण्यात आला नसून, त्यांचे पूर्वसुरी तीरथसिंह रावत यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच कायम ठेवण्यात आले आहेत.

  • फरक एवढाच, की यावेळी सर्व मंत्री कॅबिनेट दर्जाचे आहेत. रविवारी शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये सत्पाल महाराज, हरकसिंह रावत, बंसीधर भगत, यशपाल आर्य, बिशन सिंह चुफल, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, गणेश जोशी, धनसिंह रावत, रेखा आर्य आणि यतिश्वरानंद यांचा समावेश आहे. यापैकी शेवटचे तिघे तीरथसिंह रावत मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. नाराज समजले जाणारे सत्पाल महाराज यांची यापूर्वी धामी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

‘एमपीएससी’च्या ३ हजार नियुक्त्या, मुलाखती रखडल्या :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे(एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा, मुलाखती, आयोगावरील सदस्यांच्या रखडलेल्या नेमणुका आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यात हतबल ठरलेल्या सरकारमुळे विविध सेवांसाठी अर्हताप्राप्त असलेल्या लाखो उमेदवारांचे भवितव्य अधांतरी आहे.

  • तीन वर्षांपासून राज्य सेवा परीक्षा-२०१९ बरोबरच स्थापत्य अभियांत्रिकी, पशुधन विकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २९९६ पदांसाठी हजारो उमेदवारांच्या मुलाखती आणि मुख्य परीक्षा रखडल्या आहेत. स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • ‘एमपीएससी’ने ४२० जागांसाठी जुलै २०१९मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली. जून २०२०मध्ये मुलाखती घेऊन अंतिम निकाल जाहीर केला. यात ४१३ उमेदवारांची निवड झाली. त्यानंतर नियुक्ती देण्याचे काम राज्य शासनाचे असते.

  • मात्र, सरकारने ९ सप्टेंबर २०२०च्या आधी नियुक्त्या के ल्या असत्या तर ४१३ मधील ‘एसईबीसी’ प्रवर्गातील काही उमेदवारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असती. मात्र, दोन वर्षांपासून नियुक्त्याच न केल्याने तहसीलदारपदासाठी निवड झालेले उमेदवारही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

डॉ. जया द्वादशीवार वाङ्मयीन पुरस्कार जाहीर :
  • ज्येष्ठ लेखिका तथा समिक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या जन्मदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये साहित्यिक शर्वरी पेठकर यांना कादंबरीसाठी तर नाट्य लेखनासाठी माधवी भट, कवितांसाठी डॉ.पद्मरेखा धनकर यांना तर वैचारिक लेखनासाठी ज्येष्ठ लेखिका अरूणा सबाने यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

  • ज्येष्ठ लेखिका, इंग्रजीच्या प्राध्यापिका तथा समिक्षक डॉ. जया व्दादशीवार यांच्या निधनानंतर दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून पुरस्कार वितरीत केले जातात.

  • यावर्षी डॉ. जया व्दादशीवार यांचे निवासस्थान असलेल्या भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथे २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला नागपूरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्याच हस्ते वाड्.मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीचे डॉ. कन्ना मडावी, डॉ. सविता भट, शैला धनकर, वसू देशपांडे, पुष्पा नागरकर यांनी केले आहे.

भारतात तिसरी लाट तुलनेत सौम्य :
  • देशात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दरम्यान करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यात दुसऱ्या लाटेपेक्षा बाधितांची दैनंदिन संख्या निम्मी असेल, शिवाय कोविड प्रतिबंधक वर्तनाने प्रसंगी ही लाट टाळलीही जाऊ शकते, असे मत सरकारी गटातील वैज्ञानिकांनी प्रारूपाच्या आधारे म्हटले आहे.

  • कोविड संसर्ग तिसऱ्या लाटेत वेगाने पसरू शकतो कारण सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूचा अधिक प्रसार करणारा विषाणू  येऊ शकतो, असे मत सूत्र प्रारूपाचे मुख्य गणिती मणिंद्र अग्रवाल यांनी म्हटले आहेत. त्यांनी गणितीय प्रारूपाच्या आधारे आतापर्यंत करोना लाटांच्या स्वरूपाची मांडणी केली आहे.

  • विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने करोनाच्या वाढत्या रुग्णांचा वेध घेण्यासाठी गणितीय प्रारूप तयार करण्यासाठी एक पथक स्थापन केले होते. अग्रवाल यांच्याशिवाय या गटात हैदराबाद आयआयटीचे एम. विद्यासागर, संरक्षण विभागाच्या वैद्यकीय उपसंचालक (वैद्यकीय) माधुरी कानिटकर यांचा समावेश आहे. या गटाने कोविड १९ विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज योग्य प्रकारे सांगितला नाही, त्याबाबत अलिकडेच टीका झाली होती.

करोनाकाळातील सेवेबद्दल डॉक्टरांना ‘भारतरत्न’ द्यावे :
  • करोना साथीत लोकांसाठी सेवेचे  काम करणाऱ्या  डॉक्टर्स, परिचर व निमवैद्यकीय कर्मचारी यांना  ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात यावे, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

  • केजरीवाल यांनी म्हटले आहे, की अनेक डॉक्टरांनी या लढय़ात प्राण गमावले आहेत त्यांना ‘भारतरत्न’ देऊन गौरवणे हीच खरी आदरांजली ठरणार आहे. ‘भारतीय डॉक्टर’ या समूहाला ‘भारतरत्न’ जाहीर करावे म्हणजे त्यात परिचर व निमवैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश राहील. कारण त्यांनी स्वत:च्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता काम केले आहे.

  • केजरीवाल यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे, की कोविडविरोधी लढय़ात  दुसऱ्या लाटेत  ७३० डॉक्टर्सनी जीव गमावले आहेत. जूनच्या मध्यावधीत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अनेक डॉक्टर्स व परिचर तसेच निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले आहेत. बिहारमध्ये ११५, दिल्लीत १०९, उत्तर प्रदेशात ७९, पश्चिम बंगाल, ६२, राजस्थान ४३, झारखंड ३९, आंध्र प्रदेश  ३८ याप्रमाणे मृतांची आकडेवारी असून करोनाच्या पहिल्या लाटेत ७४८ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता.

चीनच्या अंतराळवीरांचं स्पेसस्टेशनवर पहिलं ‘स्पेसवॉक’ :
  • चीनच्या दोन अंतराळवीरांनी अंतराळात स्पेसवॉक करत नवा इतिहास रचला आहे. लियु बोमिंक आणि तांग होंग्बो या दोघांनी एअरलॉकमधून बाहेर पडत स्पेसस्टेशनवर काम केलं. रोबोटिक आर्मची सेटिंग करण्यासाठी ते बाहेर आले होते. या दोघांनी १५ मीटर लांब रोबोटिक आर्म इन्स्टॉल केला. तर तिसरे क्रू मेंबर कमांडर निए हॅशेंग आतच होते. यावेळी टिपलेल्या दृश्यांमधून अंतराळातून पृथ्वी दिसत आहे. चीनच्या सरकारी टिव्हीने हे फुटेज दाखवले आहेत.

  • चीनचे तीन अंतराळवीर १७ जूनला तिसऱ्या ऑर्बिटल स्टेशनवरील कामासाठी तीन महिन्यांच्या मिशनवर आहेत. हा चीनचा सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी स्पेस प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर मे महिन्यात मंगळावर रोबोट पोहोचवण्यास या प्रोजेक्टची मदत घेतली जाणार आहे.

  • चीननं स्पेस स्टेशनसाठी पहिलं मॉडेल तियानहे हे २९ एप्रिलला लॉन्च केलं होतं. त्यानंतर ऑटोमेटेड स्पेसक्राफ्ट खाणं आणि इंधनासाठी लॉन्च केलं गेलं. त्यानंतर १७ जूनला तीन अंतराळवीरांसह शेनजोउ-१२ कॅप्सूल अंतराळात पाठवण्यात आलं. यात रोबोटिक आर्म इन्स्टॉल करण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती.

  • त्यात अंतराळवीरांना यश मिळालं आहे. या कामगिरीसाठी अंतराळवीरांना खास स्पेस सूट डिझाइन करण्यात आला आहे. गरजेच्या वेळी सहा तास रिकाम्या जागेवर यामुळे काम करता येतं. या रोबोटिक आर्ममुळे इतर स्पेसस्टेशन निर्मितीसाठी मदत होणार आहे.

दिल्लीच्या ‘हिटमॅन’ची दमदार कामगिरी, टी-२० क्रिकेटमध्ये ठोकली ‘डबल सेंच्युरी’ :
  • क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असे म्हणतात, मग ते सहा चेंडूत सहा षटकार असो, किंवा एका षटकात चार बळी असो. भारताचा हिटमॅन रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये २६४ धावा ठोकत सर्वांना स्तब्ध केले होते. आता असाच काहीसा पराक्रम दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने केला आहे. सुबोधने टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकत सर्वांचा लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. सुबोधने २०५ धावांची नाबाद खेळी केली.

  • एका क्लब टी-२० सामन्यात खेळत सुबोधने द्विशतक ठोकले. त्याच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने १०२ धावा १७ चेंडूत केल्या. म्हणजे त्याने १७ षटकार ठोकले. याशिवाय त्याने आपल्या खेळीत १७ चौकार लगावले. सुबोध सलामीला गेला आणि ७९ चेंडू खेळून नाबाद परतला.

  • रणजी क्रिकेटर सुबोधच्या संघाने एकूण २५६ धावा केल्या. त्याने २५०च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. सुबोधच्या संघाने २० षटकांत एक गडी गमावत २५६ धावा केल्या. यापूर्वी सुबोधने दिल्ली संघासाठी देशांतर्गत स्पर्धेत महत्त्वपूर्ण खेळी खेळत अनेक सामने जिंकले आहेत.

०५ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.