चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 जानेवारी 2024

Date : 5 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्राचे मॉडेल नेणार देशपातळीवर, पुढील वर्षीपासून सात नवे अभ्यासक्रम
  • राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून भारतीय ज्ञान प्रणालीवर (इंडियन नॉलेज सिस्टीम) आधारित सात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. उपविषय (मायनर) म्हणून विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित अभ्यासक्रमांबाबत महाराष्ट्रात होत असलेले काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या अभ्यासक्रमांचे प्रारुप देशपातळीवर नेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दिल्या जातील, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव के. संजय मूर्ती यांनी दिली.
  • मूर्ती यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह डेक्कन कॉलेज विद्यापीठाला बुधवारी भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या चार विद्यापीठांच्या पुढाकारातून भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम राबवण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचेही मूर्ती यांनी सांगितले.
  • भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
शिंदे सरकारने घेतले १० महत्त्वाचे निर्णय, नोव्हेंबर २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार
  1. नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा.
  2. अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी २५० रुपये.
  3. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.
  4. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार.
  5. मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता मिळणार.
  6. पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देणार. ४०० उद्योगांना फायदा.
  7. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार.
  8. द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार.
  9. नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता.
  10. सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला.
प्राण प्रतिष्ठा सोहळमच्या निमंत्रण पत्रिकेवर मंदिराचे चित्र
  • अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळयासाठीची निमंत्रण पत्रिका निर्माणाधीन मंदिराच्या भव्यतेचे दर्शन घडवत आहे. निमंत्रण पत्रिकेवर मंदिराच्या भव्य छायाचित्रासह प्रभू रामाचे बालरूप समाविष्ट आहे.  मोठया आकाराच्या आणि सुंदर डिझाइन केलेल्या निमंत्रण पत्रिकेत एक पुस्तिका देखील असून त्यात रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींचा संक्षिप्त परिचय देण्यात आला आहे.
  • ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळयासाठी अयोध्येची सजावट केली जात आहे. या सोहळयात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र मंदिर ट्रस्टच्या निमंत्रित यादीत सात हजारांहून अधिक लोकांची नावे आहेत, ज्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर,  क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचा समावेश आहे. पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली जात आहेत. अतिथींच्या यादीत मोठया संख्येने संत व काही परदेशी निमंत्रितांचाही समावेश आहे.
  • मुख्य निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावर ‘अपूर्व अनादिक निमंत्रण’ (हिंदी) देखील छापलेले आहे. त्यात ‘प्राण प्रतिष्ठे’चा ‘शुभ मुहूर्त’ दुपारी १२ वाजून २० मिनिटे  असाही उल्लेख आहे. ‘रामायण’ या मालिकेत भगवान राम आणि देवी सीता यांच्या भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी तारीखच का निवडली? महंतांनी सांगितला खास योगायोग
  • २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी वाजता, अभिजात मुहूर्तावर अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामलल्ला यांचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. पवित्र कार्यासाठी कोणताही वेळ काळ शुभच असला तरी नेमकी २२ जानेवारी ही तारीख का निवडली असावी याविषयी अनेकांना कुतूहल आहे. सहज म्हणून ही निवड झालेली नसून त्यामागे विशेष अर्थ आहे असे सध्या सांगण्यात येतेय. नेमकं असं या दिवशी काय खास असावं याविषयी जाणून घेऊया..

२२ जानेवारी २०२४ ही तारीख इतकी शुभ का?

  • शुभ मृगाशिरा नक्षत्र सोमवारी (२२ जानेवारी) पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल तर २३ जानेवारीला (मंगळवार) पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत कायम राहील. २२ जानेवारीला अभिजात मुहूर्त सकाळी ११ :५१ ते दुपारी १२ :३३ पर्यंत आहे.
  • मृगाशिरा नक्षत्र हे सर्वात शुभ व ‘अमरत्वाचा देव’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोमा या देवतेशी संबंधित आहे असे मानले जाते. या नक्षत्राचे चिन्ह अमृताच्या शाश्वत शोधाचे प्रतीक असलेल्या हरिणाचे प्रतीक मानले जाते. मंगळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मृगाशिरा नक्षत्राचा, कामाच्या वेग व स्थिरतेवर प्रभाव असतो असा समज आहे. धार्मिक समजुतींनुसार मृगाशिरा नक्षत्र विविध धार्मिक विधींसाठी शुभ मानले जाते. तसेच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार महंत गिविंद देवगिरी यांच्या हवाल्याने टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, २२ जानेवारी रोजी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग मृगाशिरा नक्षत्रातच जुळत आहेत त्यामुळे राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यासाठी ही तिथी व मुहूर्त ठरवण्यात आला आहे.
आकाराने लहान असले तरी लक्षद्वीपचे हृदय मात्र विशाल!
  • ‘‘लक्षद्वीपचा द्वीपसमूह आकारमानाने लहान असला तरी त्याचे हृदय मात्र विशाल आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील तंत्रज्ञान, ऊर्जा, जलसंपदा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक हजार १५० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान  बोलत होते.
  • मोदी सरकारने सुरू केलेल्या सुधारणांविरुद्ध लक्षद्वीपमध्ये मोठया प्रमाणात नाराजी असून, सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. मुस्लीमबहुल लक्षद्वीपवासीयांची मने जिंकण्यासाठी मोदींनी ही प्रशंसा केल्याचे मानले जात आहे. या सोहळयात महिला-मुलांसह शेकडो लक्षद्वीपवासीय सहभागी झाले होते. त्यांना मल्याळम भाषेत ‘माझ्या परिवारातील सदस्य’ असे संबोधून मोदींनी भाषणाचा प्रारंभ केला.
  • लक्षद्वीपचे सौंदर्य शब्दातीत असल्याचे सांगून येथील रहिवाशांना भेटण्यासाठी गती, बंगारम आणि कावरत्ती येथे जाण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले. ते म्हणाले, की लक्षद्वीपचे भौगोलिक क्षेत्र भलेही छोटे असेल पण लोकांची हृदये समुद्रासारखी विशाल आणि खोल आहेत. मला येथे मिळत असलेले प्रेम आणि आशीर्वादामुळे मी भारावून गेलो आहे. मी तुम्हा सर्वांप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत लक्षद्वीपसाठी विशेष योजना विकसित करण्याची घोषणा मोदीं यावेळी केली. ज्यात लक्षद्वीपच्या खास आकर्षक पर्यटन स्थळांचा समावेश असेल, अस सांगून पंतप्रधानांनी कदमत आणि सुहेली बेटांवरील दोन ‘ब्ल्यू-फ्लॅग’ समुद्रकिनारे आणि आगामी ‘वॉटर व्हिला’ प्रकल्पांचाही उल्लेख केला. लक्षद्वीप हे मुख्य ‘क्रूझ पर्यटन स्थळ’ म्हणून उदयास येत आहे, पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे.
  • यावेळी पंतप्रधानांनी नागरिकांना प्रवास करून आपल्या देशाची माहिती घेण्याचे आवाहन केले. जगभरात पर्यटनाचा विचार करण्यापूर्वी देशातील किमान १५ ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. विशेषत: लक्षद्वीपला भेट देण्याची शिफारस करताना मोदींनी सांगितले की लक्षद्वीपचे सौंदर्य अनेक जागतिक ठिकाणांनाही मागे टाकते. एकदा  लक्षद्वीपचे सौंदर्य अनुभवल्यानंतर जगातील अन्य ठिकाणे त्या समोर तुम्हाला फिकी वाटतील.

 

‘चांद्रयान-३’ प्रक्षेपणासाठी सज्ज,जून-जुलै मध्ये प्रक्षेपणाची शक्यता; इस्रोकडून माहिती : 
  • चांद्रयान- ३ मोहिमेचे काम जवळपास पूर्ण झाले असून ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. येत्या जून-जुलै २०२३ मध्ये त्याचे प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली.

  • नागपुरात आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ते बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सोमनाथ म्हणाले, चांद्रयान-३ जवळपास सज्ज आहे. यासाठी आवश्यक सर्व गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. आम्ही आता योग्य वेळेची वाट बघतोय. यावर्षी जून-जुलै मध्ये प्रक्षेपण केले जाईल. चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ चा उद्देश सारखा आहे. यावेळी मात्र सुरक्षित ‘लँिडग’साठी आवश्यक घटनांचा अधिक सक्षमतेने विचार करण्यात आला आहे.

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणे हा चांद्रयान-२ चा उद्देश होता. चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान सप्टेंबर २०१९ मध्ये लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते. त्यानंतर चांद्रयान-३ ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अवकाशातील ई-कचऱ्याबद्दल ते म्हणाले, अवकाशात दोन लाख टन ई-कचरा आहे. त्याचे सुमारे २० हजार तुकडे आहेत. ही गंभीर समस्या आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येईल. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना कायद्याचे बळ हवे आहे, असे डॉ. सोमनाथ म्हणाले.

  • ‘जी-२०’साठी इस्रोचे दोन कार्यक्रम - भारताकडे सध्या जी-२० चे अध्यक्षपद आहे. त्यानिमित्ताने देशात या समूहाचे वर्षभर कार्यक्रम होतील. यासाठी इस्रोच्या माध्यमातून दोन कार्यक्रम आखले आहेत. पहिला कार्यक्रम शिलाँगमध्ये होईल. यामध्ये राजदूतांसमोर इस्रोचे सादरीकरण केले जाईल. बंगळूरु येथे होणाऱ्या दुसऱ्या कार्यक्रमात अंतराळ तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालून अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत चर्चा करणार असल्याचे डॉ. सोमनाथ म्हणाले.

  • अंतराळ संशोधन क्षेत्रात खासगी कंपन्यांना संधी - नवीन धोरणात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संशोधन, विकास आणि क्षमता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. शिवाय या क्षेत्रात खासगी संस्थांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे. अनेक भारतीय खासगी कंपन्या आणि स्टार्ट-अप्स अंतराळ सहभाग सेवा देण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. त्यासाठी केंद्र सरकार अनुकूल असल्याचे डॉ. सोमनाथ यांनी सांगितले.

हरित डायड्रोजन उत्पादनाला प्रोत्साहन शुद्ध ; उर्जानिर्मितीसाठीच्या राष्ट्रीय मोहिमेला केंद्र सरकारची मंजुरी : 
  • वातावरण बदलाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी जगभर हरित डायड्रोजनच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात असून देशातही २०३० पर्यंत वार्षिक ५० लाख टन हरित हायड्रोजन उत्पादनाची क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

  • या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार १९ हजार ७४४ कोटी खर्च करणार आहे. योजनेत ८ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून २०३० पर्यंत ६ लाख रोजगार निर्माण होऊ शकतील, असा दावा असे केंद्र सरकारने केला आहे. हरित हायड्रोजनचे देशांतर्गत उत्पादन वाढणार असून इंधन आयातीचे प्रमाण कमी होऊन १ लाख कोटींची बचत होईल.

  • कार्बन उत्सर्जनामुळे हरित वायूच्या प्रमाणात वाढ होत असून तापमानाचा पाराही चढू लागला आहे. हरित हायड्रोजनच्या वापरामुळे फक्त पाण्याची वाफ हवेत मिसळते. त्यामुळे हे इंधन शुद्ध उर्जा मानली जाते. म्हणूनच प्रदुषणविरहित हरित हायड्रोजन इंधनावरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वांतत्र्यदिनी केलेल्या भाषणात हरित हायड्रोजन मोहिमेचा उल्लेख केला होता. 

  • 'राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेमुळे ५० लाख टन हरित वायूंचे उत्सर्जन कमी होईल,’ असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. या क्षेत्रात चीन आणि जपानने आघाडी घेतली असून संयुक्त अरब अमिराती, ओमान, सोदी अरेबिया, दक्षिण कोरिया या देशांनीही हरित हायड्रोजनच्या उत्पादनावर भर दिला आहे.

महत्त्वाची उद्दिष्टे

  • हरित हायड्रोजन उत्पादन, निर्यातीचे जागतिक केंद्र होणे
  • ८ लाख कोटींची गुंतवणूक, ६ लाख रोजगारनिर्मिती
  • अपारंपरिक उर्जेत १२५ गिगावॉटची वाढ – हरित वायूंच्या उत्सर्जनात ५० लाख टन घट
  • ६०-१०० गिगावॉट इलेक्ट्रोलायझर क्षमता
  • इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी ५ वर्षांसाठी अनुदान
अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? कोण सादर करते? जाणून घ्या : 
  • केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक वर्षातील केंद्राचा महसूल, खर्च यांचा समावेश असतो. उत्पन्नाचे इतर स्रोत आणि इतर खर्च यांचाही यात समावेश असतो. यावर्षीचा म्हणजेच २०२३ चा अर्थसंकल्प कधी सादर केला जाणार आहे आणि तो कसा तयार केला जातो जाणून घ्या.

  • केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ची तारीख - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. पण यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला सुरू होणार असून ते ८ एप्रिलला संपण्याची शक्यता आहे

  • केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ची वेळ - २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये १ फेब्रुवारी (बुधवारी) सकाळी ११ वाजता सादर केला जाईल.

  • अर्थसंकल्प कोण सादर करते - गेल्यावर्षीप्रमाणे २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रुवारीला सादर करतील. २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा हा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करण्यात येण्याच्या एक दिवस आधी ३१ जानेवारीला निर्मला सीतारमन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.

  • अर्थसंकल्प कसा तयार केला जातो - अर्थसंकल्प सादर करण्याच्या ६ महिने आधीपासून म्हणजे ऑगस्ट- सप्टेंबरपासून अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली जाते. ही खुप मोठी प्रक्रिया असते. यात तज्ञांचा सल्ला, नियोजन, अंमलबजावणी या गोष्टींचा समावेश असतो.

पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींनीही नाकारले भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपाचे निमंत्रण : 
  • एकूण गैरव्यवस्थापन आणि अनागोंदीने मंगळवारी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घातला. नागपूर विद्यापीठ आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए) यांचा समावेश असलेल्या आयोजकांनी दिलेल्या निकृष्ट सुविधांबाबत मान्यवर, विद्यार्थी आणि अगदी माध्यमातील व्यक्तींकडूनही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिक कारणांमुळे कार्यक्रमाला प्रत्यक्षरित्या येऊ न शकल्याने आधीच कार्यक्रमाची शोभा गेली. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील समारोपीय सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक पाहुण्यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारल्याने विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना चिल्ड्रन सायन्स काँग्रेस आणि वूमेन्स सायन्स काँग्रेसचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. विज्ञान काँग्रेसच्या नियोजनासंदर्भात संशोधकांच्याही अनेक तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे संकेतस्थळावरही अनेक तक्रारी आहेत. येथे कार्यक्रमासंदर्भात कुठलीही अद्ययावत माहिती नाही. प्रदर्शनाकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याबद्दल अभ्यागतांनी तक्रार केली आहे.

  • प्रदर्शनासाठी विद्यापीठाच्या विभागांनाच मागितले १३ हजार रुपये - विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विज्ञान काँग्रेसचे २० कोटी रुपयांचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. असे असतानाही विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांना येथे प्रदर्शन लावण्यासाठी जागा देण्यास कंत्राटदाराकडून नकार दिला जात आहे. शिवाय प्रति प्रदर्शनासाठी १३ हजार रुपये मागितले जात आहेत. अनेक महाविद्यालये येथे नवनवीन प्रदर्शन मांडण्यासाठी उत्सुक आहेत. असे असतानाही त्यांना कंत्राटदाराच्या धोरणामुळे उपस्थित राहता येत नसल्याची माहिती आहे.

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका: भारताचे विजयी आघाडीचे लक्ष्य : 
  • भारतीय संघाचे लक्ष्य दुसऱ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे असेल. यासह पॉवरप्लेमधील शुभमन गिलच्या कामगिरीवरही नजरा असणार आहेत. गिल चांगली कामगिरी करताना सलामी फलंदाज म्हणून संघात आपली जागा भक्कम करण्याचा प्रयत्न करेल.

  • सलामीला गिल, इशानकडून अपेक्षा- सलामीच्या स्थानासाठी गिलला त्याचा प्रतिस्पर्धी ऋतुराज गायकवाडचे आव्हान असेल, त्यामुळे चांगली कामगिरी करून संघातील आपले स्थान भक्कम करण्याकडे त्याचे लक्ष्य असेल. भारताला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले असले, तरीही त्यांना दोन धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असून ट्वेन्टी-२० प्रारूपाला कमी प्राथमिकता असेल. तरीही, गिलला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. गेल्या सामन्यात ट्वेन्टी-२० पदार्पण करणाऱ्या गिल लयीत दिसला नाही. गिल गुजरात टायटन्सच्या आघाडीच्या फळीचा महत्त्वाचा भाग आहे. जलदगतीने धावा न केल्याने केएल राहुलला ट्वेन्टी-२० संघातील आपले स्थान गमवावे लागले. भारताकडे ट्वेन्टी-२० प्रारूपासाठी चांगले खेळाडू आहेत. ऋतुराज आणि राहुल त्रिपाठी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. गिल आणि इशान किशनला उर्वरित सामन्यांसाठीही सलामीची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. या दोघांनीही आक्रमक सुरुवात केल्यास उर्वरित फलंदाजांचे काम सोपे होईल.

  • सूर्यकुमारवर मध्यक्रमाची मदार - भारताचा प्रयत्न दुसऱ्या सामन्यात अधिक धावा करण्याचा असणार आहे आणि यासाठी उपकर्णधार सूर्यकुमार यादववर संघ अवलंबून असेल. पहिल्या सामन्यात सूर्यकुमारला स्वस्तात माघारी परतावे लागले. श्रीलंकेची गोलंदाजी फिरकी गोलंदाज वािनदु हसरंगा आणि महेश तीक्षणा यांच्यावर अवलंबून आहे. या दोघांनीही पहिल्या सामन्यात मिळून आठ षटकांत ५१ धावा देत दोन बळी मिळवले. दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनीही या सामन्यात आपल्या फलंदाजीने प्रभावित केले. या सामन्यातही या दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

  • चहलच्या कामगिरीकडे नजरा - भारताचा लेग स्पिनर यजुर्वेद्र चहलकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. चहलने पहिल्या सामन्यात केवळ दोन षटके टाकताना २६ धावा दिल्या. यानंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. या सामन्यात तो आपल्या कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. वेगवान गोलंदाज शिवम मावीच्या पदार्पणामुळे कर्णधार हार्दिक पंडय़ाला समाधान मिळाले असेल. पंडय़ानेही नवीन चेंडूने गोलंदाजी करताना प्रभावित केले.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ जानेवारी २०२२

 

राज्यातील महाविद्यालयेही बंद? आज निर्णय - सत्र परीक्षा ऑनलाइन :
  • करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद करण्याबाबत कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारच्या बैठकीत मतैक्य झाले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यावर बुधवारी घोषणा केली जाईल. त्यामुळे सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

  • करोना रुग्ण वाढल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना प्रसारानुसार, अन्य शहरांमधील शाळाही टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. महाविद्यालयेही बंद करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

  • करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाविद्यालये बंद करावी व ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यावर सर्वाचे एकमत झाले. बुधवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असे सामंत यांनी जाहीर केले. 

  • सुमारे दीड वर्षांनंतर राज्यातील महाविद्यालये २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. परंतु, रुग्णसंख्या वाढल्याने महाविद्यालये पुन्हा बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. सध्या तरी या महिनाअखेर महाविद्यालये बंद ठेवली जातील. रुग्णसंख्या लक्षात घेता पुढे निर्णय घेतला जाईल. सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्यावरही बैठकीत चर्चा झाली.

सोलापुरात ३४ व्या राज्य पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन ; ‘माळरान- शिकार पक्षी संवर्धन’ अशी आहे संकल्पना :
  • ३४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन येत्या ७, ८, व ९ जानेवारी रोजी सोलापुरात डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित केले असून संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संयोजक डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी दिली.

  • डॉ. मेतन फाऊंडेशनच्यावतीने आणि सामाजिक वनीकरण व वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त सहकार्याने होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पक्षिमित्र प्रा. डॉ. निनाद शहा हे आहेत. तर स्वागताध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आहेत.

  • वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उद्घाटक आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते व पुण्याच्या एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनच्या सचिव प्रा. स्वाती कराड-चाटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. करोनाविषयक सर्व नियमावलींचे काटेकोरपणे पालन करीत पार पडणाऱ्या या संमेलनासाठी अमरावती व नाशिकहून सायकल फेरी येणार आहे. या सायकल फेरीचे स्वागत पोलीस आयुक्त हरीश बैजल करतील.

देशात करोनाने पकडला भयानक वेग; गेल्या २४ तासांत ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद :
  • देशात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ज्या प्रकारे ओमायक्रॉनच्या नवीन प्रकारांची प्रकरणे वाढत आहेत, त्यामुळे एक नवीन समस्या उद्भवू शकते, असा इशारा दिला आहे.

  • भारतातील करोना रुग्ण संख्येने आता वेग पकडला आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात करोनाच्या ५० हजार ९७ नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आला आहे. त्याच वेळी, या कालावधीत केवळ १५ हजार ३८९ करोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे.

  • देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे ५८,०९७ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, १५,३८९ लोक बरे झाले आहेत आणि या दरम्यान ५३४ लोकांचा या करोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • सध्या देशात २ लाख १४ हजार ४ करोना रुग्ण आहेत, जे आतापर्यंत देशात आलेल्या एकूण करोना रुग्णांच्या ०.६१ टक्के आहे. त्याच वेळी, पुनर्प्राप्ती दर देखील किंचित कमी होऊन ९८.०१ टक्के झाला आहे. दैनंदिन संसर्ग दर वाढत आहे आणि आज ४.१८ टक्के आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! जानेवारीच्या पगारात मिळणार अधिकचे पैसे - जाणून घ्या कसे :
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या पगारात अधिकचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास ४५०० रुपये अधिकचे मिळू शकतात. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना एक वाउचर भरून द्यावा लागेल.

  • करोना संकटामुळे देशभरातील शाळा बंद होत्या. त्यामुळे कर्मचारी मुलांच्या शिक्षणाच्या भत्त्यासाठी अर्ज करू शकले नव्हते. याचा फायदा २५ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. दुसरीकडे, गेल्या १८ महिन्यांपासून अडकलेल्या महागाई भत्त्यावरही निर्णय होऊ शकतो. याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांसह पेन्शनर्संना होणार आहे.

  • केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त वेगवेगळे भत्ते देते. यात मुलांच्या शिक्षण भत्त्याचाही समावेश आहे. करोना संकटामुळे सरकराने कर्मचाऱ्यांना सूट दिली आहे. जर तुम्हीही मुलांच्या शिक्षण भत्त्यासाठी अर्ज करू शकला नसाल, तर जानेवारी महिन्यात यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी कोणतीही कागदपत्रं सादर करण्याची आवश्यकता नाही.

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन मुलांसाठी शिक्षण भत्ता मिळतो. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एका मुलाच्या शिक्षणासाठी २२५० रुपयांचा भत्ता मिळतो. दोन मुलांसाटी ४५०० रुपये मिळणार आहेत.

ओमायक्रॉनने मोठं संकट निर्माण केलेलं असतानाच WHO चा इशारा; म्हणाले, “आणखी काही घातक :
  • करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने सध्या संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण केलं आहे. अनेक देशांवर पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची वेळ आली असून भारतातही अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

  • संपूर्ण जग ओमायक्रॉनचा सामना करत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धोक्याचा इशारा दिला आहे. जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणखी नवे आणि घातक व्हेरियंट तयार होऊ शकतात असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

  • ओमायक्रॉन व्हेरियंट सध्या जंगलातील आगीप्रमाणे वेगाने परसत असला तरी इतर व्हेरियंटच्या तुलनेत कमी धोकादायक असून यामुळे ही महामारी लवकरच संपून जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

  • मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कॅथरिन यांनी ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग विपरित परिणाम करु शकतो असा इशारा AFP शी बोलताना दिला आहे. “ओमायक्रॉन जितका जास्त पसरत आहे तितका जास्त प्रसारित होत आहे. यामधून अनके नवे व्हेरियंट तयार होण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉन प्राणघातक आहे, त्याच्याने मृत्यू होऊ शकतो. कदाचित डेल्टापेक्षा कमी घातक आहे, मात्र नव्या व्हेरियंटमध्ये किती धोका असेल हे कोण सांगू शकतं?,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

फ्रान्समध्ये आढळला करोनाचा नवीन प्रकार; तब्बल ४६ म्युटेशन झाल्याची तज्ज्ञांची माहिती :
  • जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असून अनेक नवनवीन व्हेरिएंट समोर येऊ लागले आहेत. ओमायक्रॉननंतर डेल्मिक्रॉन आणि फ्लोरोना या व्हेरिएंटचे रुग्ण देखील आढळत आहेत. त्यातच आता आणखी एक व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. फ्रान्समध्ये करोनाचा एक नवीन व्हेरिएंट आढळला असून तो तब्बल ४६ वेळा उत्परीवर्तीत (म्युटेट) झाला आहे. या नवीन व्हेरिएंटला संशोधकांना ‘आयएचयू’ असं नाव दिलंय.

  • फ्रान्सच्या मारसैल मध्ये करोनाचा ‘आयएचयू’ हा नवा प्रकार सापडला असून त्याचे १२ रुग्ण आढळले आहेत. लागण झालेले सर्वजण हे आफ्रिकी देश कॅमेरूनहून परतले होते, अशी माहिती डेली मेलने दिलीय. फ्रान्समध्ये सध्या करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यातच हा नवा प्रकार सापडल्यानने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. करोनाच्या आयएचयू या प्रकाराचा पहिला रुग्ण १० डिसेंबरला आढळला होता.

  • आयएचयू व्हेरिएंट अन्य देशांमध्ये पसरला आहे की नाही, याचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना व्हेरिएंट अंडर इन्व्हेस्टिगेशनचा टॅग लावून तपास करणार आहे. आयएचयूचा शोध लावणार्‍या टीमचे प्रमुख प्राध्यापक फिलिप कोलसन यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट जास्त घातक असून शकतो आणि याच्यावर लसीचा परिमाण होण्याची शक्यता कमी आहे.

‘चिंधी’ ते पद्मश्री पटकावणारी अनाथांची माय - असा होता सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास :
  • सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज पुण्यामध्ये निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते.

  • सिंधुताई सपकाळ यांचं आठ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची महिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिलीय. नुकतंच पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

  • नकोशी झालेली चिंधी ते अनाथांची माय असा थक्क करणारा सिंधुताईंचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. पाहुयात नक्की कसा होता त्यांचा जीवनप्रवास.

०५ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.