चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 फेब्रुवारी 2024

Date : 5 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अपेक्षित कामगिरीसह जागतिक गट ‘१’मध्ये प्रवेश
  • भारतीय टेनिस संघाने ६० वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करताना डेव्हिस चषक लढतीत अपेक्षित कामगिरी करताना एकतर्फी विजयासह जागतिक गट ‘१’ मध्ये प्रवेश मिळवला. दुसऱ्या दिवशी दुहेरीची आणि परतीची पहिली लढत जिंकत भारताने पाकिस्तानवर ४-० असा विजय मिळविला. भारताचा आठ लढतीत पाकिस्तानवर आठवा विजय ठरला. या विजयाने भारत आता सप्टेंबर महिन्यात गट ‘१’ मध्ये खेळेल. पाकिस्तान गट ‘२’ मध्येच राहील.
  • दुहेरीच्या लढतीत युकी भांब्री-साकेत मायनेनी या जोडीने विजय मिळवला, तर एकेरीत संधी मिळालेल्या निकी पोंचाने विजयी पदार्पण केले. एकेरीच्या २-० अशा आघाडीसह भारताची युकी-साकेत जोडी दुहेरीसाठी कोर्टवर उतरली. या दुहेरीच्या लढतीत युकी-साकेत जोडीने पाकिस्तानच्या मुझामिल मुर्तझा-अकिल खान जोडीचा ६-२, ७-६ (७-५) असा पराभव केला. पाकिस्तानने दुहेरीत ऐनवेळी बरकत उल्लाच्या जागी अनुभवी अकिल खानची निवड केली होती. पण, युकी-साकेत जोडीने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. साकेतच्या जोरकस ‘सव्‍‌र्हिस’ निर्णायक ठरल्या. पाकिस्तानी जोडी भारतीय जोडीवर कधीच वरचढ ठरू शकली नाही आणि त्यांचा प्रतिकारही करू शकली नाही.
  • साकेतच्या जोरकस आणि खोलवर ‘सव्‍‌र्हिस’ पाकिस्तानी जोडीला झेपल्या नाहीत. साकेतने आपल्या ‘सव्‍‌र्हिस’वर अभावानेच गुण गमावला. त्याच वेळी युकीच्या कोर्ट गेमदेखील पाकिस्तानी जोडीच्या आकलनापलीकडचा ठरला. परतीच्या एकेरीच्या पहिल्या लढतीत भारताने निकी पोंचाला पदार्पणाची संधी दिली. पाकिस्तानने मोहम्मद शोएबला स्थान दिले. भारताच्या विजयी आघाडीमुळे या लढतीस फारसे महत्त्व नव्हते. पण, निकीने पदार्पणाची संधी अचूक साधली आणि शोएबचा ६-३, ६-४ असा सहज पराभव केला.
महावितरण ग्राहकांना ‘प्रीपेड’ची सक्ती? केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे ग्राहकांना जाच
  • केंद्र सरकारच्या अखत्यारितील महामंडळांनी ‘महावितरण’ आणि ‘बेस्ट’ला वीज वितरण सुधारणांसाठी निधी मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या ग्राहकांवर ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ची सक्ती होण्याची चिन्हे असून अदानी आणि टाटा वीज कंपनी या खासगी कंपन्यांच्या ग्राहकांना मात्र ‘पोस्ट पेड’चा पर्याय उपलब्ध राहणार आहे.  केंद्र सरकारच्या संस्थांकडून कर्ज घेत नसल्याने त्यांच्या ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती नसून त्यांना पोस्टपेडचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.
  • वीज वितरण करण्यासाठीचे ट्रान्सफॉर्मर्स, केबल्स व अन्य यंत्रणा सुधारणांसाठी केंद्राच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) आणि ग्रामीण विद्युतीकरण कॉर्पोरेशन (आरईसी) या महामंडळांनी ‘महावितरण’ला सुमारे २६ हजार कोटी तर ‘बेस्ट’ला सुमारे चार हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. याचा व्याजदर नऊ ते १० टक्के असून कामांच्या पूर्ततेनुसार निधीचे वितरण होणार आहे. कर्ज मंजूर करताना पीएफसी आणि आरईसी यांनी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याची अट घातली आहे. त्यामुळे राज्यभरातील एक कोटी ७१ लाख ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे होण्याची शक्यता आहे.
  • स्मार्ट मीटर बसविण्यास काम पुढील दोन-तीन वर्षांत होणे अपेक्षित आहे. मोबाईल ग्राहकांना प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. मात्र महावितरण व बेस्ट यांनी घेतलेल्या कर्जामुळे त्यांच्या ग्राहकांना हे पर्याय उपलब्धच नसण्याची शक्यता आहे. स्मार्ट मीटर मोफत असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची किंमत, देखभाल खर्च व घसारा आदी बाबी वितरण कंपनीच्या खर्चात समाविष्ट असून त्याचा भार पर्यायाने ग्राहकांवरच येणार आहे. केंद्राच्या अर्थसंस्था सर्व राज्यांच्या वितरण कंपन्यांना अर्थ सहाय्य करतात. पश्चिम बंगाल, केरळसारख्या काही राज्यांनी ग्राहकांवर सक्ती करण्यास नकार देत केंद्राचे कर्जही घेतलेले नाही. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही प्रीपेड स्मार्टमीटर सक्तीला विरोध होत आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्य वीज नियामक आयोगाने आदेश जारी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आसाममध्ये ११,६०० कोटींच्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आसाममध्ये सुमारे ११,६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्राच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले.
  • मोदींनी यावेळी प्रमुख प्रकल्पांच्या पायाभरणीची घोषणा केली आणि मोठय़ा प्रमाणात निधी जाहीर केला. यामध्ये कामाख्या मंदिर कॉरिडॉर (४९८ कोटी), गुवाहाटीमधील नवीन विमानतळ टर्मिनलपासून सहा पदरी रस्ता (३५८ कोटी), नेहरू स्टेडियमचे फिफा मानकांमध्ये सुधारणा (८३१ कोटी) यांचा समावेश आहे. पंतप्रधान ‘असोम माला’ रस्त्यांच्या दुसऱ्या आवृत्तीचे लोकार्पण केले. या टप्प्यात एकूण ३,४४४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ४३ नवीन रस्ते आणि ३८ काँक्रीट पुलांचा समावेश असेल. याशिवाय ३,२५०  कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या एकात्मिक नवीन इमारतीची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली. ५७८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित करीमगंज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची आणि गुवाहाटीमध्ये २९७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या युनिटी मॉलची पायाभरणीही पंतप्रधान मोदी केली.

मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

  • पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली की, स्वातंत्र्यानंतर सत्तेत असलेल्यांना धार्मिक स्थळांचे महत्त्व समजले नाही. त्यांना स्वत:च्या संस्कृतीची लाज वाटत होती असा आरोप मोदी यांनी केला. राजकीय फायद्यांमुळे, त्यांनी स्वत:च्या संस्कृतीची आणि भूतकाळाची लाज बाळगण्याचा ट्रेंड सुरू केला असा दावा मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता  केला. कोणताही देश आपला भूतकाळ विसरून, पुसून टाकून आणि त्याची मुळे तोडून विकास करू शकत नाही, असे ते म्हणाले.
भारतात फक्त मुंबई नाही तर ‘या’ शहरांमध्येही होते भयंकर वाहतूक कोंडी; जगात काय स्थिती? जाणून घ्या
  • वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या वाढतेय. परिणामी अनेक शहरांमध्ये लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. भारताचा विचार केल्यास मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली अशी अनेक शहरे वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत आघाडीवर आहेत. पण, केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक शहरांमध्ये हीच स्थिती आहे. अशा परिस्थितीत डच जियोलोकेशन टेक्नोलॉजी फर्म टॉमटॉमने जगभरातील अनेक देशांमधील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत एक अहवाल सादर केला आहे. ज्या अहवालानुसार, भारतातील टेक कॅपिटल म्हणून ओळख असणारे बंगळुरू हे शहर जगातील वाहतूक कोंडीच्या समस्येत सहाव्या स्थानी आहे. या अहवालात विविध देशांतील शहरांमधील वाहतूक कोंडीच्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर त्या प्रत्येक शहरातील वाहनाचा सरासरी वेग, प्रवासाचा वेळ आणि वाहतूक कोंडीचा स्तरदेखील सांगण्यात आला आहे.
  • टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने ६ खंडातील ५५ देशांमधील ३८७ शहरांमधील प्रवासाचा सरासरी वेळ, इंधन खर्च आणि CO2 उत्सर्जनावर आधारित मूल्यांकन केले आहे. हा अहवाल ६०० दशलक्षाहून अधिक इन-कार नेव्हिगेशन सिस्टम आणि स्मार्टफोनवर आधारित आहे. प्रत्येक शहरासाठी टॉमटॉमने २०२३ मध्ये संपूर्ण नेटवर्कवर लाखो किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपासून प्रति किलोमीटरसाठी लागणारा सरासरी प्रवास वेळ काढला.
  • बंगळुरू, पुण्यात वाहतूक कोंडीची भयंकर स्थिती
  • या अहवालात भारतातील दोन शहरांची नावे टॉप १० मध्ये आहेत. २०२३ च्या वाहतूक कोंडीच्या समस्येत भारतातील बंगळुरू हे सहाव्या क्रमांकावर आणि पुणे सातव्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये बंगळुरूमध्ये प्रति १० किलोमीटर प्रवासासाठी सरासरी २० मिनिटे १० सेकंद इतका वेळ लागत होता, तर पुण्यात याच अंतरासाठी २७ मिनिटे ५० सेकंद इतका वेळ लागला.
  • दरम्यान, या अहवालात २०२२ मध्ये बंगळुरू दुसऱ्या स्थानावर होते, पण २०२३ मध्ये बंगळुरू ट्रॅफिकच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे.

दिल्ली आणि मुंबईत काय स्थिती?

  • या यादीत दिल्ली ४४ व्या, तर मुंबई ५३ व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार २०२३ मध्ये दिल्लीमध्ये प्रति १० किलोमीटर प्रवासासाठी सरासरी २१ मिनिटे ४० सेकंद इतका वेळ लागतोय, तर मुंबईत २१ मिनिटे २० सेकंद इतका वेळ लागत आहे.
बनवारीलाल पुरोहित यांचा राज्यपालपदाचा राजीनामा
  • पंजाबचे राज्यपाल आणि चंडीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा सादर केला. वैयक्तिक कारणांसाठी व इतर काही जबाबदाऱ्यांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
  • पुरोहित यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला. चंडीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने  घवघवीत यश मिळवताना सर्व तिन्ही पदे जिंकली होती. यामुळे जोरदार धक्का बसलेल्या काँग्रेस- आप आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यावर मतपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. यानंतर काही दिवसांनी पुरोहित- शहा यांची भेट झाली.
  • पंजाबचे राज्यपाल व चंडीगडचे प्रशासक म्हणून नेमणूक होण्यापूर्वी पुरोहित यांनी २०१६ ते २०१७ या कालावधीत आसामचे, तर २०१७-२०२१ या कालावधीत तमिळनाडूचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.

 

उत्तर प्रदेशचा चित्ररथ ठरला सर्वोत्तम तर कास पठार स्पेशल महाराष्ट्राच्या चित्ररथाला : 
  • प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या चित्ररथालाही सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे. सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिलीय. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यंदा संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले होते.

  • त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळालाय. तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आलं आहे. मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आलाय. यंदाच्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आलेला. तर यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आलं होतं.

  • महाराष्ट्राच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आलं होतं. यंदाच्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरली.

NEET PG exam 2022 : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली :
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG परीक्षा 2022 सहा ते आठ आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. याआधी ही परीक्षा १२ मार्च रोजी होणार होती. आता ती परीक्षा मे-जून मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा देखील लवकरच होऊ शकते.

  • १२ मार्च रोजी होणारी परीक्षा NEET PG काऊन्सेलिंग संपण्यापूर्वीच आयोजित करणयात आली होती. प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थ्यांशी संबंधित कारणांमुळे मे-जून 2022 मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या काळात होणारी NEET PG परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी देखील विद्यार्थ्यांची मागणी होती.

  • NEET PG 2022 परीक्षा स्थगित करण्याची मागणी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यात राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, एनबीई द्वारे आयोजित नीट पीजी परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली होती.

‘टेस्ला’च्या आयातीत अडचण ; इलेक्ट्रिक वाहनासाठी करसवलतीची मागणी भारताने फेटाळली :
  • इलेक्ट्रिक कार आयात करण्यासाठी कर सवलत देण्याची अमेरिकी उद्योगपती इलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची मागणी भारताने फेटाळली आहे. ती फेटाळताना, अंशत: बांधलेली वाहने आयात करण्याबाबत आणि त्यांची उर्वरित जोडणी भारतात करण्यासाठी कमी कर आकारणीचा नियम आधीपासून लागू असल्याचे कारण देण्यात आले आहे.

  • केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले, ‘‘आयात शुल्कात पुन्हा बदल करणे आवश्यक आहे की किंवा काय हे आम्ही तपासले, परंतु देशात सध्या काही वाहननिर्मिती सुरू आहे आणि काही गुंतवणूकही सध्याच्याच कररचनेनुसार आली आहे. त्यामुळे कर किंवा शुल्क आकारणी हा टेस्लापुढील अडथळा नाही, हे स्पष्टच आहे.’’ केंद्र सरकारने मागणी केल्यानंतरही ‘टेस्ला’ने स्थानिक पातळीवर उत्पादनासाठी आणि भारतातून खरेदीसाठी अद्याप आपली योजना सादर केलेली नाही, असेही जोहरी यांनी स्पष्ट केले.

  • भारत सरकारने मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीला स्थानिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहननिर्मितीस प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. परंतु मस्क यांची अशी इच्छा आहे की आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर भारताने १०० टक्के करसवलत द्यावी, जेणेकरून कंपनीला स्पर्धात्मक किमतीत इतरत्र निर्मिती केलेल्या वाहनांची प्रथम विक्री करता येईल. परंतु देशात जोडणीसाठी आयात होणाऱ्या भागांवर सध्या १५ ते ३० टक्क्यांदरम्यान आयात शुल्क आकारण्यात येत आहे.

सू ची यांच्याविरुद्ध अकरावा खटला :
  • म्यानमारमध्ये वर्षभरापूर्वी निवडणुकीनंतर लष्कराने सत्ता ताब्यात घेत पदच्युत केलेल्या नेत्या आँग सान सू ची यांच्याविरुद्ध पोलिसांनी भ्रष्टाचाराचा अकरावा खटला दाखल केला आहे. शासकीय वृत्तसेवेने ही बातमी दिली आहे.  दी ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमार या वृत्तपत्रातील बातमीनुसार, सू ची यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर लाचबाजीचा आरोपही आहे. त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

  • गेल्या वर्षी १ फेब्रुवारीला लष्कराने सू ची यांना ताब्यात घेतल्यापासून त्यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात परतता येऊ नये याच उद्देशाने हे खटले दाखल केले जात आहेत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. देशात २०२३ मध्ये निवडणूक घेण्याचे आश्वासन लष्कराने दिले आहे.  

  • याआधी बेकायदा वॉकीटॉकी बाळगल्याप्रकरणी तसेच करोनानिर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सू ची यांना सहा वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. गोपनीयता कायद्याखालीही त्यांच्यावर खटला सुरू असून त्यात जास्तीत जास्त १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

ऑलिम्पिकच्या मांडवाआडून चीन-रशिया खलबते :
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे शुक्रवारी बीजिंग येथे आगमन झाले. हिवाळी ऑलिम्पिक सामन्यांच्या उद्घाटन समारंभास हजर राहण्याबरोबरच चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्याशी चर्चा करणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश आहे. अमेरिका आणि त्याच्या मित्रपक्षांना शह देण्यासाठी एकजूट दाखविण्याचाही या भेटीचा हेतू असल्याचे मानले जाते.

  • सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढत असून त्याची परिणिती युद्धात होऊ शकते. अशावेळी चीन रशियासोबत उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन बीजिंगच्या दौऱ्यावर आले आहेत.

  • बीजिंगमधील या ऑलिम्पिक सोहळय़ासाठी आपला प्रतिनिधी पाठवायचा नाही, असा निर्णय अमेरिका, ब्रिटन आदी मित्रराष्ट्रांनी घेतला आहे. चीनमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असून तेथील युघेर आदी मुस्लीम समुदायांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप या देशांनी केला आहे. अशा स्थितीत पुतीन हेच या सोहळय़ातील प्रमुख पाहुणे आहेत.

फेसबुकच्या शेअर्सची ऐतिहासिक घसरण, मार्क झुकरबर्गला बसला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका :
  • आत्तापर्यंत जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या १० मध्ये असणारा फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्ग २०१५नंतर पहिल्यांदाच पहिल्या दहामधून बाहेर पडला आहे. आणि याला कारणीभूत ठरली आहे फेसबुकच्या युजर्सची घटणारी संख्या! बुधवारी फेसबुककडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेसबुकच्या युजर्सच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

  • गेल्या तिमाहीपेक्षा या तिमाहीमध्ये ही घट मोठी असून हा आकडा गेल्या १७ वर्षांतला सर्वाधिक आहे. त्याचा परिणाम थेट फेसबुकच्या शेअर्सवर झाला असून खुद्द मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

  • बुधवारी ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाचे शेअर्स घसरू लागले होते. पहिल्या तासाभरातच फेसबुकच्या शेअर्सच्या किंमती २० ते २२ टक्क्यांनी घटल्या होत्या. त्यापाठोपाठ संध्याकाळपर्यंत हे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खाली आले. याचा फटका मार्क झुकरबर्गसोबतच मेटाच्या इतर प्रमुख सदस्यांना देखील बसला आहे.

05 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.