चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ ऑगस्ट २०२०

Date : 5 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरमधील तिघांचे यश :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरमधील तिघांनी यश मिळवले आहे. यामध्ये दोन तरुणी व एक तरुणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे सौरभ व्हटकर यांनी घरीच अभ्यास करून हे यश मिळवलं आहे.

  • ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या डॉ. प्रणोती संजय संकपाळ यांनी दुसऱ्या प्रयत्नात व कोल्हापुरमधील गौरी नितीन पुजारी यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. दोघींना पुण्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वर्गाचा लाभ झाला. तर कोणत्याही मार्गदर्शक वर्गाला उपस्थित न राहता घरीच अभ्यास करून सौरभ विजयकुमार व्हटकर यांनी यश मिळवले आहे. कोल्हापूरच्या इतिहासात एकाच वेळी तिघांनी ही आव्हानात्मक परीक्षा उत्तीर्ण होण्याची पहिलीच वेळ आहे.

  • करवीर तालुक्यातील नेर्ली गावच्या डॉ. प्रणोती यांनी सांगलीतील भारती विद्यापीठातून दंत वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१७ मध्ये त्यांचा पहिला प्रयत्न असफल ठरल्यानंतर २०१९ मध्ये दुसऱ्यांदा परीक्षेला बसत त्या ५०१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

  • राजारामपुरी येथील गौरी पुजारी यांनी तिसऱ्या प्रयत्नांमध्ये २७५ वा क्रमांक मिळवत हे यश मिळवले. बी. ई. मेकॅनिकल या अभियांत्रिकी शाखेत ८५ टक्के गुण मिळवून पदवीधर झालेल्या गौरी यांनी यापूर्वी दोनदा परीक्षा दिली होती. कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे उपाध्यक्ष दिनकर किल्लेदार यांच्या गौरी दिग्विजय किल्लेदार या स्नुषा आहेत. या दोघींनीही पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा वर्गाचे मार्गदर्शन घेतले होते. तर मुलाखतीची तयारी दिल्लीमध्ये केली होती.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन :
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पाहाटे पुण्यातील रुग्णालयात निधनात झालं. आज पहाटे किडणीच्या आजारानं त्यांचं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. परंतु त्यांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती.

  • राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं आज पहाटे पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना किडनीच्या आजारानं निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांनी करोनावर मातही केली होती. त्यानंतर त्यांना नॉन करोना वॉर्डमध्येही हलवण्यात आलं होतं. १९८५ ते ८६ या कालावधीत त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. तसंच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत.

  • शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचाजन्म ९ फेब्रुवारी १९३१ रोजी नणंद येथे झाला. त्याचं शालेय शिक्षण गुलबर्गा येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद व पिछाडी पर्यंत नागपूरात झाले. १९६२ पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पार पाडल्या. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, नातू आणि पणतू असा मोठा परिवार आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणात तीन न्यायमित्रांची नेमणूक :
  • निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील  नेमण्याचा आदेश देऊन पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने भारताला आणखी एक संधी दिली असून तीन वकिलांची न्यायमित्र म्हणून नेमणूक केली आहे.

  • न्यायालयाने असा आदेश दिला की, या प्रकरणी सुनावणीसाठी मोठय़ा पीठाची स्थापना करावी. तसेच ३ सप्टेंबरला या पीठापुढे दुपारी दोन वाजता जाधव यांना लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर सुनावणी होईल.

  • अबीद हुसेन मंटो व हमीद खान हे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील तसेच माजी महाधिवक्ता मखदूम अली खान यांना न्यायामित्र म्हणून नेमण्यात येत आहे.

अयोध्येत आज आनंदसोहळा :
  • रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून मंगळवारी सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करतील. त्यानंतर ते रामलल्लाचे दर्शन घेतील आणि भूमिपूजन समारंभात सहभागी होतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिर’ या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

  • करोनामुळे निमंत्रितांची संख्या मर्यादित असून, १७५ मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील. निमंत्रणपत्रिकेवर सुरक्षाकोड असल्याने समारंभाच्या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश मिळू शकेल. गर्दी टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

  • भूमिपूजन सोहळा साजरा होत असताना करोनाचे नियम पाळण्यावर भर देण्यात येईल. त्यामुळे निमंत्रितांशिवाय अन्य कोणालाही अयोध्या शहरात प्रवेश करू दिला जाणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले. बाजारपेठ आणि दुकाने सुरू राहणार असली तरी नियमांचे पालन बंधनकारक आहे, असेही कुमार यांनी सांगितले.

अटीतटीच्या लढतीत आयर्लंडचा इंग्लंडवर धडाकेबाज विजय :
  • ICCच्या वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेत आयर्लंडने आपले गुणांचे खाते उघडले. पहिल्या दोनही सामन्यात सहज विजय मिळवणाऱ्या इंग्लंडला आयर्लंडने मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले नाही. कर्णधार इयॉन मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३२८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. पण पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी या दोघांच्या शतकांच्या बळावर आयर्लंडने ४९.५ षटकात हे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर लीगमध्ये १० गुणांची कमाई केली.

  • आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली, पण नंतर इयॉन मॉर्गनने दमदार फलंदाजी केली. त्याने ८४ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. त्याला चॉम बँटन चांगली साथ देत अर्धशतक (५८) झळकावले. तळाचे फलंदाज डेव्हिड विली (५१) आणि टॉम करन (नाबाद ३८) यांनीही चांगली खेळी केल्यामुळे इंग्लंडने ५० षटकात ३२८ धावांपर्यंत मजल मारली.

  • ३२९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा पहिला बळी लवकर बाद झाला. पण नंतर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी यांनी २१४ धावांची भागीदारी केली. स्टर्लिंगने १२८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १४२ धावा केल्या. तर बल्बर्नीने ११२ चेंडूत १२ चौकारांसह ११३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत केविन ओब्रायनच्या निर्णायक फटकेबाजीच्या (१५ चेंडूत नाबाद २१) जोरावर आयर्लंडने ७ गडी आणि १ चेंडू राखून सामना जिंकला.

०५ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.