चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ एप्रिल २०२१

Date : 5 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पुतीन यांची लोकप्रियता कायम; रशियामधील ‘सर्वात देखणा पुरुष’ होण्याचा मिळवला मान :
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देशातील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळेच रशियातील सर्वात देखणा पुरुष अशी नवी ओळख पुतीन यांना मिळाली आहे. हजारो जणांचा समावेश असणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये ६८ वर्षीय अविवाहित पुतीन हे सर्वात सुंदर पुरुष ठरलेत.

  • सुपरजॉब डॉय आरयू नावाच्या वेबसाईट रशियन जनतेला देशातील कोणती व्यक्ती सर्वात सुंदर वाटते यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेकांनी पुतीन यांच्या नावाची निवड केल्याचं पहायला मिळालं. सर्वेक्षणातील १८ टक्के पुरुषांनी तर १७ टक्के महिलांनी पुतीन यांची निवड केली. रशियन जनतेच्या मनात आजही पुतीन हेच देशातील सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचं चित्र या सर्वेक्षणातून दिसून आल्याचं वेबसाईटने सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.

  • मॉस्को टाइम्सने सुपरजॉबच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या सर्वेक्षणामध्ये पुतीन यांच्या लोकप्रियतेसमोर सर्वच रशियन कलाकार, नेते आणि खेळाडून फिके पडल्याचं पहायला मिळालं. मासे पकडताना, घोड्यावर स्वार झालेले पुतीन यांचे अनेक फोटो वेळोवेळी समोर आलेत. या फोटोंमध्ये पुतीन हे शर्टलेसच दिसून येतात. एका मुलाखतीमध्ये पुतीन यांनी आपल्याला या शर्टलेस फोटोंबद्दल लज्जास्पद असं काही वाटतं नाही, असं एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. या फोटोंमध्ये पुतीन यांना एक शक्तीशाली व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला.

  • २२ मार्च ते एक एप्रिल दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येकाला एका प्रश्नांची यादी देण्यात आली होती. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १९ टक्के पुरुषांनी स्वत:लाच रशियामधील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं मत दिलं होतं. तर १८ टक्के महिलांनी रशियामध्ये सुंदर पुरुषच नाहीयत असं मत दिलं होतं.

प्रमोद भगतला तीन पदके :
  • जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या प्रमोद भगतने दुबई पॅराबॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदके मिळवली. याचप्रमाणे क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सुकांत कदमने दोन रौप्यपदके कमावली.

  • ‘एसएल४’ गटात प्रमोदने एकेरीत कुमार नितेशवर २१-१७, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्यानंतर दुहेरीत मनोज सरकारच्या साथीने सुकांत कदम आणि नितेश कुमार जोडीचा २९ मिनिटांत २१-१८, २१-१६ असा पराभव केला.

  • मिश्र दुहेरीत प्रमोदने पाला कोहलीच्या साथीने कांस्यपदक मिळवले. ‘एसएल३’ गटात एकेरीच्या अंतिम फेरीत फ्रान्सच्या लुकास मॅझूरकडून २१-१५, २१-६ अशा फरकाने पराभव पत्करल्याने सुकांतला उपविजेतेपद मिळाले.

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली :
  • राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश आणि नियमावली उद्या सरकारकडून काढण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

  • राज्य मंत्रिमंडळाने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येणार.

  • हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.

  • आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.

भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू अमेरिकेतही :
  • भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू आता अमेरिकेतील एका रुग्णातही सापडला असून स्टॅनफर्ड हेल्थ केअरच्या दी क्लिनिकल व्हायरॉलॉजी लॅबमधील नमुन्यांच्या तपासणीत तो आढळून आला आहे. दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणू भारतात पहिल्यांदा आढळून आला होता. त्यामुळे करोनाचा प्रसार जास्त वेगाने वाढत आहे.

  • स्टॅनफर्ड रुग्णालयाच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रात सॅनफ्रान्सिस्को बे या भागात हा विषाणू सात रुग्णांत सापडला असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे पण त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. एका रुग्णात मात्र तो सापडला आहे.

  • स्टॅनफर्ड हेल्थ केअर स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेच्या प्रवक्त्या लिसा किम यांनी सांगितले की, अमेरिकेत भारतातील दुहेरी उत्पर्वितनाचा विषाणू पहिल्यांदाच सापडला आहे. भारतातील उत्परिवर्तित विषाणूत एल ४५२आर हे उत्परिवर्तन दिसून आले आहे, दुसरे उत्परिवर्तन इ ४८४ क्यू हे आहे. एकाच ठिकाणी अमायनो आम्लांमध्ये दोन उत्परिवर्तने झाली असून ती पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका व नंतर ब्राझीलमध्ये दिसून आली होती.

  • सध्या अमेरिकेत हा विषाणू सापडला आहे तो विमानाने आलेल्या एखाद्या प्रवाशातून पसरला असावा. डॉ. बेन पिन्स्की यांनी सांगितले की, हा विषाणू वेगाने पसरतो. लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यानंतर विषाणूचा धोका कमी होत जाईल. दरम्यान, ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी ११७ उत्परिवर्तनाचा समावेश असलेल्या विषाणूचे ३० टक्के कोविड रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत, असे ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे अधिष्ठाता आशिष झा यांनी सांगितले.

एक करोना रुग्ण सापडला तर आजूबाजूची २० घरं होणार सील; योगी सरकारचा निर्णय :
  • उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आलं आहे. तसेच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरु आहेत.

  • मास्क, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन ही त्रिसुत्री वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र आता योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलायत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी करोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २० घरं कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जातील. ही २० घरं सील केली जातील. करोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. एकापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळल्यास ६० घरं सील केली जातील.

  • राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहून हे नवे नियम लागू करण्यात आलेत. शहरी भागांमध्ये करोना रुग्ण आढळून आल्यास २० घरं सील केली जातील आणि त्या भागाला कंटेनमेंट झोन असं जाहीर केलं जाईल.

  • एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास ६० घरं सील करुन त्यांना कंटेनमेंट झोन जाहीर केलं जाईल. या ठिकाणी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही किंवा तेथील कोणत्याही व्यक्तीला बाहेर येता येणार नाही. १४ दिवसांसाठी हे नियम लागू असतील, असं एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

०५ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.