चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 04, 2021 | Category : Current Affairs


पंजशीरवर तालिबानचा ताबा? अमरुल्ला सालेह यांनी दिली महत्त्वाची माहिती :
 • अफगाणिस्तानातील नवीन सरकारची स्थापना तालिबानने शुक्रवारी लांबणीवर टाकली. आता ही स्थापना शनिवारी  जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सांगितले, की सरकार स्थापना आता शनिवारी करण्यात येणार आहे. दरम्यान २० वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तेत परतलेल्या तालिबानने शुक्रवारी पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.

 • माध्यमांच्या वृत्तांमध्ये पंजशीर देखील तालिबानच्या ताब्यात गेले आहे दावा केला जात आहे. त्यानंतर स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेहसुद्धा पंजशीरमधून पळून गेल्याचे वृत्त समोर आलं आहे. याबाबत अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि तालिबानला पंजशीरमधून आव्हान देणाऱ्या अमरुल्ला सालेह स्वतः पंजशीरमधल्या परिस्थितीची माहिती दिली आहे.

 • अमरुल्ला सालेह यांनी देश सोडून पलायन केले नसल्याचे सांगितले आहे. सालेह पंजशीर खोऱ्यात असून आणि नॉर्दन अलायन्स दलाचे कमांडर आणि राजकीय व्यक्तींसोबत असल्याचे सालेह यांनी म्हटले आहे. अमरुल्ला सालेह यांनी शुक्रवारी सर्व प्रसारमाध्यमांचे वृत्त फेटाळून लावले आहेत.

 • इंडिया टुडेसोबत झालेल्या संभाषणात अमरुल्ला सालेह यांनी याची माहिती दिली आहे. “मी माझ्या देशातून पळून गेलो आहे असे काही माध्यमांमधून पसरवले जात आहेत. हे पूर्णपणे निराधार आहे. हा माझा आवाज आहे, मी तुम्हाला पंजशीर खोऱ्यातून, माझ्या तळावरून फोन करत आहे. मी आमच्या कमांडर आणि राजकीय नेत्यांसोबत आहे आणि परिस्थितीचे व्यवस्थापन करत आहे. ही एक कठीण परिस्थिती आहे, आम्ही तालिबान आणि पाकिस्तानी आणि अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांच्या आक्रमणाखाली आहोत, ” असे अमरुल्ला सालेह यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील नवे सरकार इराणच्या धर्तीवर; आज घोषणा :
 • अफगाणिस्तानातील नवीन सरकारची स्थापना तालिबानने शुक्रवारी लांबणीवर टाकली. आता ही स्थापना शनिवारी ( ४ सप्टेंबरला) जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सांगितले, की सरकार स्थापना आता शनिवारी करण्यात येणार आहे.

 • तालिबानच्या कतारमधील दोहा येथे असलेल्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष मुल्ला अब्दुल घनी बरादर हे तालिबानी सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे समजते. तालिबान इराणी नेतृत्वाच्या धर्तीवर काबूलमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तालिबानचे नेते मुल्ला हैबतुल्ला अखुंडजादा हे अफगाणिस्तानचे सर्वोच्च अधिकारी असतील, असे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. तालिबानच्या सांस्कृतिक व माहिती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी मुफ्ती इनामुल्ला समनगानी यांनी म्हटले आहे, की  मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

 • इराणमध्ये सर्वोच्च राजकीय व धार्मिक पदावर एका सर्वोच्च व्यक्तीची नेमणूक केली जाते. त्याप्रमाणेच व्यवस्था अफगाणिस्तानात राहणार आहे. त्या व्यक्तीचे स्थान हे अध्यक्षांच्या वरचे असणार असून तेच लष्कर, सरकार व न्यायालयांचे प्रमुख नेमण्याचे काम करतील. सर्वोच्च नेत्यांचा शब्द राजकीय, धार्मिक व लष्करी कामकाजात अंतिम असेल.

 • मुल्ला अखुंडजादा हे सरकारचे नेते असतील व त्यांच्या प्रमुखपदाबाबत कुठलाही प्रश्न नाही. अखुंडजादा हे तालिबानचे जुने धार्मिक नेते आहेत. यांनी गेली १५ वर्षे बलुचिस्तानातील कचलाक भागात एका मशिदीत सेवा केली आहे. नवीन प्रशासन प्रणाली, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याबाबत अंतिम निर्णय बाकी होता. असून त्यांनी गेली १५ वर्षे बलुचिस्तानातील कचलाक भागात एका मशिदीत सेवा केली आहे.

भारत-अमेरिका चर्चेत अफगाणिस्तानचा मुद्दा :
 • भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन व उप परराष्ट्रमंत्री वेंडी शेरमन यांच्याशी त्यांनी चर्चा केली असून अफगाणिस्तानात तालिबानने ताबा घेतल्यानंतरची परिस्थिती व इतर मुद्द्यांचा त्यात  समावेश होता. ३१ ऑगस्टला अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेतल्यानंतर दोन्ही देशात प्रथमच उच्चस्तरीय चर्चा झाली.

 • शृंगला हे बुधवारी न्यूयॉर्कला आले असून  त्यांनी ब्लिंकन यांची भेट गुरूवारी घेतली होती. फॉग बॉटम या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालायात या नेत्यांची चर्चा झाली. द्विपक्षीय संबंधांबरोबरच अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. शृंगला यांनी सांगितले, की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन व त्यांच्या खात्यातील उपमंत्री शेरमन यांच्याशी चर्चा झाली.

 • भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांनी म्हटले आहे, की सकाळी ब्लिंकन व शेरमन यांच्याशी सौहार्दाच्या वातावरणात चर्चा झाली. संरक्षण, सुरक्षा, व्यापार व गुंतवणूक, आरोग्य सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा या विषयांवरही चर्चा झाली आहे.

केरळमधील अकरावीच्या ‘ऑफलाईन’ परीक्षांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती :
 • केरळमध्ये अकरावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावून घेण्याच्या (ऑफलाईन) राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सध्या देशातील एकूण दैनंदिन करोना रुग्णांपैकी ७० टक्के हे केरळमध्ये नोंदले जात आहेत. अशा वेळी या वयातील मुलांच्या आरोग्याची जोखीम घेता येणार नाही, असे न्यायालय म्हणाले.

 • ही परीक्षा ६ सप्टेंबरपासून सुरू होणार होती.  याप्रकरणी पुढील सुनावणी १३ तारखेला होणार आहे. ऑफलाईन परीक्षेचा निर्णय  घेण्यापूर्वी राज्य सरकारने रोगप्रसाराच्या जोखमीबाबत पुरेसा विचार केलेला  नाही, या याचिकाकर्त्यांच्या दाव्यात तथ्य दिसून येते, असे न्या. ए. एम. खानविलकर, न्या. हृषिकेश रॉय आणि सी. टी. रविकुमार यांच्या पीठाने नमूद केले.

 • याआधी सरकारच्या परीक्षेविषयीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास केरळ उच्च न्यायालयाने नकार दिला होता. हा राज्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याला आव्हान देण्यात आले आहे.

आण्विक क्षेपणास्त्रांचा वेध घेणारं ‘INS ध्रुव’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल :
 • शत्रूपक्षाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा क्षणार्धात माग काढणारं जहाज लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्याचं नाव आहे आयएनएस ध्रुव (INS Dhruv). आयएनएस ध्रुव हे शत्रूच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारं भारताचं पहिलं जहाज आहे. जे जहाज १० सप्टेंबर रोजी लॉंच केलं जाईल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल १० सप्टेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये उपग्रह आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारं भारताचं पहिलं जहाज आयएनएस ध्रुव सेवेत दाखल होणार असल्याचे वृत्त आहे.

 • हिंदुस्तान शिपयार्डने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) यांच्या सहकार्याने निर्मिती करण्यात आलेल्या आयएनएस ध्रुवमध्ये शत्रूच्या टेहळणी उपग्रह आणि अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्याची क्षमता आहे.

 • आयएनएस ध्रुवच्या लॉंच दरम्यान नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह आणि एनटीआरओचे अध्यक्ष अनिल दासमानासह डीआरडीओ आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती मिळत आहे. हे जहाज भारतीय नौदलाच्या जवानांसह स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) द्वारे नियंत्रित केले जाईल. आतापर्यंत अशी जहाजं फक्त फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि चीनद्वारे चालवली गेली आहे. आता या यादीत भारताचा देखील समावेश झाला आहे.

‘इम्पेरिकल डेटा’ तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती :
 • ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा ‘इम्पेरिकल डेटा’ लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहमती देण्यात आली.

 • ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक झाली.

 • बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील,  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,  इतर मागास वर्ग व बहूजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अॅड.अनिल परब, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार इम्तियाज जलील, आमदार कपिल पाटील यांच्यासह सर्व पक्षीय नेते सर्वश्री विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे,  शैलेंद्र कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नेमबाजीत भारताचा डबल धमाका; मनीष नरवालला सुवर्ण तर सिंहराजची रौप्य पदकाची कमाई : 
 • टोक्यो पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी शनिवार हा अतिशय खास दिवस आहे. भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी पी४ मिश्रित ५० मीटर पिस्तूल एसएच१ नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले आहे.

 • पात्रता फेरीत, सिंहराज ५३६ गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. यासह, भारताच्या पदकांची संख्या १५ झाली आहे. ज्यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या पॅरालिम्पिकमध्ये ३९ वर्षीय सिंहराजला दुसरे पदक मिळाले. यापूर्वी त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

 • मनीषने २१८.२ च्या एकूण गुणांसह प्रथम स्थान मिळवले तर सिंगराजने २१६.७ च्या एकूण गुणांसह द्वितीय स्थान मिळवले.

०४ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)