चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ सप्टेंबर २०२०

Date : 4 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“राजीव गांधी नाही तर महान खेळाडूच्या नावाने दिला जावा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार” :
  • राजकारणामध्ये सक्रीय झालेली भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. बबिताने सोशल मिडियावरुन ही मागणी केली असून खेळांशी संबंधित पुरस्कारांना केवळ महान आणि सन्माननिय खेळाडूंचे नाव देण्यात यावे असं म्हटलं आहे. देशातील खेळ पुरस्कार राजकीय व्यक्तींच्या नावाने देण्यात येऊ नयेत असं बबिताने म्हटलं आहे.

  • बबिताने ट्विटवरुन या पुरस्कारांचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसेच ही मागणी योग्य आहे की नाही यासंदर्भात तिने आपल्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्या पुरस्काराला एखाद्या खेळाडूचे नाव देण्याचा सल्ला तुम्हाला कसा वाटला, असं बबिताने चाहत्यांना विचारलं आहे.

  • इतकचं नाही तर बबिताने देशातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधींच्या नावाने का देण्यात येतात असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट अगदी खोचक शब्दात केलं आहे. “भारतात उभं राहून राजीव गांधी यांनी थेट इटलीमध्ये भाला फेकला होता म्हणून त्यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार दिला जातो का?,” असा टोला अन्य एका ट्विटमध्ये बबिताने लागावला आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाची परीक्षा, घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी :
  • राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील असं उदय सामंत यांनी सांगितलं असून महिना अखेपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती दिली आहे. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्या १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

  • “घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

  • “सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून युजीसीला विनंती करण्याबाबत निर्णय घेऊ. ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडू,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

सुरूवात झाली नरेंद्र मोदींच्या 2.25 लाख रुपयांपासून :
  • कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडला भारतीयांनी पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील या फंडसाठी स्वखर्चातील निधी दिला आहे. पंतप्रधान मोदींनी 27 मार्च रोजी पीएम केअर्स फंडाची स्थापना केल्यानंतर सर्वात आधी 2.25 लाखांचा निधी दिला.

  • पंतप्रधान केअर 2019 -2020 च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात पंतप्रधान मोदींनी 2.25 लाखांचा निधी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पीएम केअर्स निधीला स्थापनेपासून केवळ पाच दिवसांमध्ये 3076.62 कोटी रुपये ऐच्छिक देणगीच्या रुपात जमा झाल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने या संदर्भात वृत्त दिले आहे.

  • यापूर्वी मोदींनी 2019 साली झालेल्या कुंभमेळ्यातील स्वच्छता कामगारांच्या कल्याणासाठी आपल्या वैयक्तिक बचतीतून 21 लाख रुपयांची मदत दिली होती. दक्षिण कोरियामध्ये सोल पीस पुरस्कारासोबत मिळालेल्या संपूर्ण 1.3 कोटी रुपयांची रक्कम त्यांनी नमामि गंगे प्रकल्पसाठी दिली होती. या पुरस्कारातून मिळालेल्या बक्षिसपात्र रकमेच्या करामध्ये सवलत मिळावी यासाठी मोदींनी अर्थमत्र्यांना पत्रदेखील लिहिले होते.

ग्लोबल सप्लाय चेन विकसित करण्यासाठी विश्वास महत्त्वाचा हे महामारीनं दाखवून दिलं - पंतप्रधान :
  • ‘भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’मध्ये (USISPF) विविधता असलेले लोकं एकत्र आली आहे. या फोरमचं काम उल्लेखनीय असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. “जेव्हा २०२० हे वर्ष सुरू झालं तेव्हा कोणी अशी महामारी येईल याचा विचारही केला नव्हता. सुरूवातीच्या काळात भारतात केवळ एकच करोना चाचणीची लॅब होती. परंतु आता देशभरात १ हजार १६०० लॅब आहेत.

  • भारतातील करोनामुळे होणार मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे,” असं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ला (USISPF) संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. तसंच ग्लोबल सप्लाय चेन विकसित करण्यासाठी विश्वास महत्त्वाचा हे महामारीनं दाखवून दिल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हेदेखील सहभागी झाले होते.

  • “या वर्षाच्या सुरूवातीला करोनासारखी महामारी येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. परंतु या महामारीचा जगातील सर्वांवर परिणाम झाला. ही महामारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आर्थिक प्रणालीची परीक्षा घेत आहे. सद्यस्थितीत विकासाठी मानव केंद्रीत दृष्टीकोन ठेवणं आवश्यक आहे,” असं मोदी म्हणाले.

  • भारतात करोनापासून बरे होण्याचा दरही वेगानं वाढत आहे. देशातील व्यावसायिक, उद्योजकही उत्तम काम करत आहेत. भारत हा आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पीपीई किट तयार करणार देश ठरला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

भारतात एका दिवसात आढळले ८३ हजार ३४१ रुग्ण; ओलांडला ३९ लाखांचा टप्पा :
  • भारतात करोनाबाधित रुग्णसंख्येने ३९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशात ८३ हजार ३४१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १०९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३९ लाख ३६ हजार ७४८ इतकी झाली आहे.

  • सध्या देशात ८ लाख ३१ हजार १२४ अॅक्टिव्ह केसेस असून ३० लाख ३७ हजार १५२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत ६८ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • करोनाच्या रुग्णवाढीने राज्यासह देशात गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. देशात दिवसभरात ८३,८८३ तर राज्यात १८,१०५ नव्या रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रातही बाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात रुग्णवाढीबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. नागपूर आणि पुणे या दोन शहरांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे.

  • राज्यात दिवसभरात १३,९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार झाली असून, २५,५८६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे.

०४ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.