चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जून २०२१

Updated On : Jun 04, 2021 | Category : Current Affairs


व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींचे ईमेल्स लीक; समोर आलं चीन कनेक्शन :
 • करोनाच्या उत्पत्तीसंदर्भातील शोध घेण्याबद्दलचा वाद काही शांत होत नसतानाच आता एक धक्कादायक खुलासा काही ईमेलच्या माध्यमातून समोर आलाय.

 • अमेरिकन प्रसारमाध्यमांना व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांचे काही ईमेल्स सापडले असून त्यामधून बरीच धक्कादायक माहिती समोर आलीय. या ईमेल्समधून असं दिसून येत आहे की करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉ. फौची हे चिनी वैज्ञानिकांच्या संपर्कामध्ये होते.

 • डॉ. फौची डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे प्रमुख आरोग्य सल्लागार होते. असं असतानाच डॉ. फौची चीनच्या संपर्कात असल्याने अनेक नवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विदित, भक्ती विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र :
 • भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू विदित गुजराथी आणि महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी यांनी आपल्या रेटिंग गुणांच्या आधारे रशियातील सोची येथे १० जुलैपासून रंगणाऱ्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला आहे.

 • विश्वचषकासाठी पात्र ठरणारा विदित हा भारताचा चौथा बुद्धिबळपटू ठरला आहे. ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण, अरविंद चिदंबरम आणि पी. इनियान यांच्यासह नाशिकचा ग्रँडमास्टर विदितसुद्धा या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विदितने २०१७ आणि २०१९च्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

 • ‘‘विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भारतासाठी खेळणे हा अभिमानाचा क्षण असतो. विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मी चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम योगदान देण्याचा मी प्रयत्न करणार आहे,’’ असे विदितने सांगितले. विदित जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानी आहे.

इस्रायल - सरकार स्थापनेसाठी करार करण्यात विरोधी पक्ष यशस्वी :
 • इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी असलेले बिन्यामिन नेतान्याहू यांना हटवून नवे राष्ट्रीय ऐक्याचे सरकार स्थापन करण्याबाबत अखेरच्या क्षणी करार करण्यात इस्रायलच्या विरोधी पक्षांना यश मिळाले आहे.

 • नव्या सरकारसाठी आठ पक्षांची आघाडी स्थापन झाली असल्याची घोषणा मध्यममार्गी येश आतिद पार्टीचे नेते याइर लापिड यांनी केली. आळीपाळीच्या व्यवस्थेनुसार, उजव्या यामिना पार्टीचे प्रमुख नाफ्ताली बेनेट (४९ वर्षे) हे सुरुवातीला पंतप्रधानपद भूषवणार असून नंतर ते लापिड यांना सूत्रे सोपवतील.

 • नवे सरकार स्थापन करण्यासाठी अध्यक्षांनी बुधवारी मध्यरात्रीची मुदत दिली होती. त्याच्या अर्धा तास आधी, लापिड (५७) यांनी अध्यक्ष रेउवेन रिवलिन व नेसेटचे अध्यक्ष यारिव लेविन यांना या कराराबाबत अधिकृतरीत्या सांगितले.

३८ वर्षीय जेम्स अँडरसननं बदलला इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटचा इतिहास :
 • ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या नावावर खास विक्रम नोंदवला आहे. ३८ वर्षीय अँडरसन इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. या विक्रमासह त्याने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकची बरोबरी साधली.

 • कुकने आपल्या कसोटी कारकीर्दीत इंग्लंडकडून १६१ कसोटी सामने खेळले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अँडरसन खेळला, तर तो कुकलाही मागे टाकत मोठ्या पराक्रमाची नोंद करेल.

 • इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा एकमात्र खेळाडू होण्यापासून अँडरसनचा फक्त एक कसोटी सामना दूर आहे. अँडरसन इंग्लंडच्या भूमीवर आपला ९०वा कसोटी सामना खेळत आहे. या कामगिरीसह त्याने कुक आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉचा विक्रम मोडला आहे. कुक आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यांनी घरच्या मैदानावर ८९ कसोटी सामने खेळले.

 • कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने या विक्रमात ९४ कसोटी सामने खेळले आहेत. रिकी पॉन्टिंगने घरच्या मैदानावर ९२ कसोटी सामने खेळले आहेत. या प्रकरणात अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अमेरिकेकडून जूनअखेर भारताला लसपुरवठा :
 • भारतासह अन्य देशांना जूनअखेरपर्यंत करोना प्रतिबंधक लसपुरवठा करणार असल्याचे अमेरिकेने गुरुवारी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अमेरिकी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करून लससहकार्याबद्दल आभार मानल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

 • जगभरात जूनअखेरपर्यंत किमान आठ कोटी लसमात्रांचे वाटप करण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २.५ कोटी लसमात्रांचा पुरवठा भारतासह काही देशांना करण्यात करण्याचे अमेरिकेचे नियोजन आहे.

 • अमेरिकेच्या या लसहकार्याबाबत पंतप्रधानांनी अनेक ट्विट संदेश प्रसृत केले. अमेरिकी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करून लसपुरवठ्याबाबत अमेरिकी सरकारचे आभार मानले. करोनोत्तर काळात जागतिक आरोग्य क्षेत्रातील भागिदारी, अर्थव्यवस्थेची फेरउभारणी आदी मुद्यांवरही यावेळी चर्चा केल्याचे मोदी यांनी सांगितले.

०४ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)