चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जून २०२०

Date : 4 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशाचं नाव ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली :
  • भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द काढून टाकावा आणि केवळ ‘भारत’ हे नाव ठेवावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी तिथे याबाबत निर्णय होईल, असे  सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

  • घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा. त्यासाठी संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राला द्यावेत अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती. हा अनुच्छेद देशाच्या नावाशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून इंडिया या इंग्रजी नावाऐवजी भारत नाव वापरावं अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती.

  • दिल्ली येथील रहिवासी असलेल्या नमह नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी काल (दि.३) आणि गेल्या आठवड्यात शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. पण, दोन्हीवेळेस सरन्यायाधीश शरद बोबडे अनुपस्थित असल्यानं सुनावणी यादीतून हे प्रकरण वगळण्यात आलं होतं.

  • अखेर आज न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी तिथे याबाबत निर्णय होईल, असे याचिकाकर्त्याला सांगितले. दरम्यान, करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने सध्या सर्वोच्च न्यायालयात केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी सुरु आहे.

एक देश एक बाजार धोरणाला मंजुरी :
  • शेतीमाल देशभर कुठेही विकण्याची मुभा देणाऱ्या ‘एक देश एक बाजार’ या धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या संदर्भातील अध्यादेश काढला जाणार असून आत्मनिर्भर भारत योजनेचा तपशील जाहीर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या धोरणाचा उल्लेख केला होता.

  • शेतकऱ्यांना आता स्थानिक कृषी बाजारावर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे शेतीमालाला जिथे अधिक दर मिळेल तिथे विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळेल, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होईल, असा आशावाद तोमर यांनी व्यक्त केला.

  • आत्ता शेतकऱ्यांना कृषी बाजारात शेतीमाल विकावा लागतो. शिवाय, आंतरराज्य विक्रीलाही परवानगी नाही. पण नव्या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल कुठेही व कुणालाही विकता येईल. या संदर्भात नवा कायदा केला जाईल. मात्र, विद्यमान कृषी बाजार समित्या अस्तित्वात राहणार आहेत.

चिनी विमान कंपन्यांना अमेरिकेत बंदी :
  • चिनी विमान कंपन्यांवर निर्बंध घालण्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. येत्या १६ जूनपासून अमेरिकेतून उड्डाण करण्यास किंवा अमेरिकेत येण्यास चार चिनी कंपन्यांच्या प्रवासी विमानांवर बंदी लागू करण्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

  • करोनाच्या प्रादुर्भावानंतर युनायटेड एअरलाईन्स आणि डेल्टा एअरलाईन्सवर चीनने घातलेले प्रवास निर्बंध या आठवडय़ात मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चीनने करारभंग केल्याचा आरोप करत ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला.

  • अमेरिकेच्या या निर्णयाचा एअर चायना, चायना इस्टर्न एअरलाईन्ससह चार विमान कंपन्यांना फटका बसणार आहे.

रेल्वेमंत्री गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी :
  • श्रमिक रेल्वेगाडय़ांच्या तिकिटांच्या शुल्क आकारणीबाबत रेल्वे मंत्रालयाने दिशाभूल केली आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा  अशी मागणी काँग्रेसने केली.

  • मजुरांच्या प्रवासाचा ८५ टक्के खर्च केंद्राने व उर्वरित १५ टक्के खर्च राज्यांनी केल्याचा दावा भाजपने केला असला तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये महाधिवक्त्यांनी हा खर्च प्रारंभी व गंतव्य स्थानकांच्या राज्यांनी वा दोन्ही राज्यांनी मिळून केल्याचे सांगितले.

  • महाधिवक्त्यांच्या निवेदनात केंद्र सरकारने खर्च केल्याचा उल्लेख नाही. जोपर्यंत रेल्वेमंत्री वा  एखादा मंत्री  वास्तव स्पष्ट करत नाही तोपर्यंत महाधिवक्त्यांनी दिलेली माहिती खरी मानली पाहिजे. असे असेल तर गृहमंत्र्यांसह अनेक  मंत्री खरे बोलत नव्हते असा त्याचा अर्थ निघतो, असा युक्तिवाद काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

चिंता वाढली… २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक करोनाबाधित :
  • देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील २४ तासांत नऊ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत.

  • दिवसभरात वाढलेली ही सर्वाधिक संख्या आहे. शहरातून स्थलांतर केलेल्यांमुळे आता करोनानं ग्रामीण भागांतही शिरवाक केल्याचं पाहायला मिळतेय. गेल्या आठवड्यात दिवसाला आठ हजरांनी वाढणारी संख्या आता ९ हजरांकडे पोहचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • मागील २४ तासांत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामळे मृत्यू झालेल्यांची संख्याही सहा हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत सहा हजार ७५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. २४ तासांत ९ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधितांची वाढ झाल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या दोन लाख १६ हजार ९१९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख ४ हजार १०७ जणांनी करोनावर मात केली आहे. तर एक लाख सहा हजार ७३७ जणांनर उपचार सुरू आहेत.

०४ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.