चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जुलै २०२०

Updated On : Jul 04, 2020 | Category : Current Affairs“एमएसएमईच्या सुधारित मर्यादा लागू करण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना आदेश” :
 • “केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आर्थिक मदत घोषित करताना एमएसएमई क्षेत्राच्या वाढवलेल्या मर्यादा लागू करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहे. देशातील सर्व बँका, आर्थिक संस्था तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती फिक्कीचे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.

 • केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज घोषित करताना सेवा क्षेत्र व उत्पादन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना एकत्रित करून पात्रता निकषांमध्ये सुधारणा केली आहे. यानुसार एक कोटी गुंतवणूक व ५ कोटी रूपयांची उलाढाल असणार्‍या उद्योगांना सूक्ष्म श्रेणी, १० कोटी रूपये गुंतवणूक, ५० कोटी रूपये उलाढाल असणार्‍या उद्योगांना लघु उद्योग श्रेणी, तर ५० कोटी गुंतवणुक व २५० कोटी उलाढाल असणार्‍या उद्योगांना मध्यम उद्योग श्रेणी देण्यात आली आहे. या नवीन श्रेणीप्रमाणे उद्योगांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या असल्याची माहितीही ललित गांधी यांनी दिली.

 • हे वर्गीकरण करताना सेवा व वस्तूंच्या निर्यातीतून होणारी उलाढाल वगळून, उलाढाल निश्‍चित करण्याच्या सूचनाही रिझर्व्ह बँकेने २ जुलैच्या आदेशान्वये दिल्या आहेत. तसंच या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आल्या आहेत.

जुलैमध्ये होणा-या NEET, JEE Main 2020 परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या :
 • NEET व JEE Main परीक्षांना पुन्हा एकदा करोना संकटाचा फटका बसला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, देशातील परिस्थितीत अजूनही सुधारणा होत नसल्यानं, त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमी परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं घेतला आहे.

 • ऐन परीक्षांच्या काळात करोनानं देशात शिरकाव केला. त्यामुळे शालेय परीक्षांपासून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. करोनामुळे यंदा जेईई व नीट या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासंदर्भातील वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्यानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 • केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांनी याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीट परीक्षा ३१ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल,” अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा :
 • पॅरिस : फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. हा फेरबदल अपेक्षित मानला जात होता.

 • अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कारकीर्दीत नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले असून फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे. सध्या करोनामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला आहे.

 • स्थानिक वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, देशाची फेरउभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासाठी नवा मार्ग वापरावा लागेल. रविवारच्या पालिका निवडणुकीपूर्वी तसेच  करोना काळात मॅक्रॉन यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे मतदानापूर्वीच त्यांनी खांदेपालटाचे संकेत दिले होते.

 • मॅक्रॉन यांच्या पक्षाला निवडणुकीत अनेक मोठय़ा शहरात पराभवाचा फटका बसला आहे. ग्रीन पार्टीने त्यात आघाडी  घेतली.  मार्च व एप्रिलमध्ये करोनाची साथ शिखरावस्थेत होती त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्या भवितव्याचा आज निर्णय :
 • काठमांडू : भारताच्या लिपुलेख व कालापानी या भूप्रदेशांवर दावा सांगून त्यांचा नेपाळच्या राजकीय नकाशात समावेश करण्यात मोठी भूमिका पार पाडणारे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचे राजकीय भवितव्य सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढला आहे.

 • नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या ४५ सदस्यीय स्थायी समितीची बैठक शनिवारी होत आहे. पक्षाची ही सर्वात महत्त्वाची संघटना असून तिची बैठक ओली यांच्या राजीनाम्याबाबत मतैक्य न झाल्याने  गुरुवारी स्थगित करण्यात आली होती. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी मंगळवारी केली होती.

 • भारत आपल्याला पदावरून काढण्याचा कट करीत आहे असे विधान ओली यांनी केले होते. ते राजकीयदृष्टय़ा व राजनैतिक पातळीवर अयोग्य आहे असे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्पकमल दहल म्हणजे प्रचंड यांनी म्हटले होते.

 • पंतप्रधान ओली यांनी रविवारी असा दावा केला होता,की दूतावास व हॉटेलांमधून मला पदावरून काढण्यासाठी कट केला जात आहे. लिपुलेख, कालापानी व लिम्पियाधुरा ही ठिकाणे नेपाळच्या राजकीय नकाशात सामील केल्यानंतर जो कट सुरू करण्यात आला त्यात नेपाळी नेत्यांचाही समावेश होता.

०४ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)