चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जानेवारी २०२१

Date : 4 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे :
  • येत्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राने सांभाळावे, असा प्रस्ताव भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.

  • येत्या ९ जानेवारीला भारतीय कबड्डी महासंघाची ऑनलाइन कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. या सभेला पाटील आणि कार्यकारिणी सदस्य सचिन भोसले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपदाविषयी भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे. याबाबत पाटील म्हणाले, ‘‘२०१९मध्ये महाराष्ट्राने रोहा येथे राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करून दाखवले होते.

  • यंदा मात्र राज्यात करोना साथीशी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे पुरस्कर्त्यांबाबत खात्री देता येणार नाही. शिवाय रेल्वे प्रवास आणि हॉटेल निवासाच्या दृष्टीने सोयीस्कर पडावे, म्हणून मुंबई-पुण्यातच त्याचे आयोजन करता येईल. ग्रामीण भागात त्याचे आयोजन करणे कठीण जाईल. याबाबत योग्य तो निर्णय घेऊ. मात्र महाराष्ट्राच्या दर्जाला साजेसे स्पर्धेचे आयोजन करू.’’

  • महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्हा संघटनांनी आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली आहे. याचप्रमाणे वरिष्ठ, कुमार आणि किशोर या तिन्ही गटांच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धाच्या आयोजनासाठी ठाण्याने तयारी दाखवली आहे.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात ६०,००० बालकांचा जन्म, सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत अव्वल :
  • भारतामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळजवळ ६० हजार बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये भारत अव्वल राहील असा अंदाज अधिक व्यक्त करण्यात आला होता. 

  • मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने भारतामध्ये पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म होईल असं म्हटलं होतं. तसेच जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा १ जानेवारी २०२१ रोजी जन्म होईल असंही युनिसेफने म्हटलेलं. मात्र यंदा भरतात वर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा कमी आहे. मागील वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२० रोजी भारतात ६७ हजाराहून अधिक बालकांचा जन्म झाला होता.

  • नवीन वर्षाच्या आगमानाआधीच १ जानेवारी रोजी सर्वाधिक बालकांचा जन्म कोणत्या देशांमध्ये होईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार भारतात ५९ हजार ९९५ बालकांचा जन्म होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला.

  • त्याचबरोबर चीन ३५ हजार ६१५, नायझेरिया २१ हजार ४३९, पाकिस्तान १४ हजार १६१, इंडोनेशिया १२ हजार ३३६, इथियोपिया १२ हजार ६, अमेरिका १० हजार ३१२, इजिप्त नऊ हजार ४५५, बांगलादेश नऊ हजार २३६ आणि डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ काँगो आठ हजार ६४० बालकांचा जन्म होईल असं सांगण्यात आलं होतं. जगभरामध्ये १ जानेवारी जन्माला येणाऱ्या बालकांपैकी ५२ टक्के बालकं या दहा देशांमध्ये जन्माला येतील असं युनिसेफनं म्हटलं आहे.

आता लसीकरणाची प्रतीक्षा :
  • ‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही करोना लशींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी रविवारी परवानगी दिली. त्यामुळे आता लसीकरण मोहीम केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा आहे.

  • लशी ११० टक्के सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही, असे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी स्पष्ट केले. कोव्हिशिल्ड ७०.४२ टक्के परिणामकारक, तर कोव्हॅक्सिन सुरक्षित असून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करते, अशी पुष्टीही सोमानी यांनी जोडली.

  • ‘कोव्हिशिल्ड’ ही लस ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केली आहे. तिचे भारतातील उत्पादन ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था करीत आहे. ‘कोव्हॅक्सिन’ ही स्वदेशी लस आहे. तिचे उत्पादन भारत बायोटेक ही कंपनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने करीत आहे. ‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लशीला मर्यादित प्रमाणात आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. दोन्ही लशींच्या वापरास अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे आता लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडे गत वर्षभरात सर्वाधिक तक्रारी :
  • राष्ट्रीय महिला आयोगाकडे गतवर्षी सहा वर्षांतील उच्चांकी म्हणजे २३,७२२ तक्रारींची नोंद झाली आहे. त्यातील एक चतुर्थाश तक्रारी या घरातील हिंसाचाराशी संबंधित होत्या, असे दिसून आले आहे.

  • उत्तर प्रदेशातून ११,८७२, दिल्लीतून २,६३५, हरियाणा १,२६६, महाराष्ट्र १,२८८ या प्रमाणे तक्रारींची संख्या आहे. एकूण २३,७२२ तक्रारींपैकी ७,७०८ तक्रारी या सन्मानाने जगण्याचा अधिकार या मुद्दय़ांवर आहेत. सन्मानाने जगण्याचा अधिकार याचा अर्थ महिलांच्या भावनांचा आदर करून केलेली वर्तणूक असा आहे. अनेक प्रकरणात महिलांच्या भावनांची कदर केलेली दिसत नाही.

  • एकूण ५२९४ तक्रारी या घरातील हिंसाचाराच्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले, की आर्थिक असुरक्षितता, वाढता ताण, नैराश्य, आर्थिक चिंता, भावनिक आधार नसणे, आईवडील किंवा कुटुंबाने काळजी न घेणे यातून घरगुती हिंसाचाराची प्रकरणे घडतात. शाळा, महाविद्यालये व काही प्रमाणात कार्यालये बंद असल्याने सर्व जण घरातच असल्याने महिलांना अनेक कामे करावी लागत आहेत. तसेच त्या कुटुंबाला आधार देत आहेत. या कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी महिलांना बरेच कष्ट पडत आहेत.

  • २०२० मध्ये सहा वर्षांतील सर्वाधिक तक्रारी आल्या असून २०१४ मध्ये ३३,९०६ तक्रारी आल्या होत्या. जुलै व त्याआधीच्या काही महिन्यांत घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून त्याबाबत एकूण ६६० तक्रारी आल्या आहेत. या प्रकारचा हिंसाचार हा वर्षभर चिंतेचा विषय होता, असे शर्मा यांनी सांगितले.

“जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण :
  • भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असं मोदींनी या क्षणाचं वर्णन केलं आहे.

  • “जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरीमुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळेल. या मोहीमेसाठी जीवतोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • तसेच, “ही अभिमानाची बाब आहे की ज्या दोन लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती दिली गेली आहे, त्या दोन्ही लसी मेड इन इंडिया आहेत. हे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांची इच्छाशक्ती दर्शवते. तो आत्मनिर्भर भारत, ज्या आधार आहे – सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया…” असं देखील मोदी म्हणाले आहेत.

०४ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.