अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होतील असं म्हटलं जात आहे. या निवडणुकांमध्ये जो बायडेन यांचं पारडं जड असल्याचंही म्हटलं जात आहे. जर असं झालं तर १९९२ नंतर प्रथमच राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा निवडणूक जिंकणार नाहीत.
१९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा पराभव केला होता. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर ट्रम्प वेळेपूर्वी विजय घोषित करतील अशा चर्चांना अमेरिकेतील राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. परंतु ट्रम्प यांनी या वृत्ताचं खंडन केलं.
“आपण असं काहीही करणार नाही.” असं ते म्हणाले. परंतु निवडणुका झाल्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे संकेत मात्र ट्रम्प यांनी दिले. निवडणुकीच्या रात्री वेळेपूर्वीच विजयाची घोषणा केली जाईल का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता.
“निवडणुकीनंतर मतपत्रिका गोळा करणं हे खूप धोकादायक आहे. मला असं वाटते की निवडणुका संपल्यानंतर लोकांना किंवा राज्यांना बऱ्याच काळासाठी मतपत्रिका सादर करण्याची परवानगी दिली जाते. तेव्हा ते धोकादायक आहे. कारण ती फक्त एक गोष्ट करू शकते,” असंही ट्रम्प यांनी उत्तर देताना सांगितलं.
न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.
अर्डर्न यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला त्यात राधाकृष्णन यांचा समावेश आहे. भारतात जन्मलेल्या राधाकृष्णन ४१ वर्षांच्या असून सिंगापूरला शिकलेल्या आहेत. नंतरचे शिक्षण न्यूझीलंडमध्ये झाले. त्यांनी घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला. त्या संसदेवर मजूर पक्षाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये निवडून आल्या.
२०१९ मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी राजकीय जम बसवून काम केले. आता सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये त्या भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री आहेत.
राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४,८५० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. करोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान आहे.
आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या करोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. परंतू आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती.
त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल.”
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.