चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ जुलै २०२१

Date : 3 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘कोव्हिशिल्ड’ला नऊ युरोपीय देशांची मान्यता :
  • युरोपातील ९ देश तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देत असल्याचे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड व स्पेन हे देश कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत. शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडही कोव्हिशिल्डला मान्यता देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • याशिवाय, जे भारतीय इस्टोनियाला जाणार आहेत, त्यांच्या बाबतीत भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या लशींना आपण मान्यता देणार असल्याचे त्या देशाने सांगितले आहे. ज्या भारतीय लोकांनी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशी घेतल्या आहेत व जे युरोपला जाऊ इच्छितात, त्यांना परवानगी देण्याबाबत स्वतंत्रपणे विचार करावा, अशी विनंती भारताने यापूर्वीच युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांना केली आहे.

  • करोना महासाथीच्या काळात मुक्तपणे प्रवास करता यावा यासाठी युरोपीय महासंघाचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र किंवा ‘ग्रीन पास’ गुरुवारपासून अमलात येत आहे. त्याच्या व्यवस्थेनुसार, युरोपीय औषध यंत्रणेमार्फत (ईएमए) प्राधिकृत केलेल्या लशी घेतलेल्या व्यक्तींना युरोपीय महासंघ क्षेत्रात प्रवासविषयक निर्बंधांपासून सूट दिली जाणार आहे.

बारावीचा निकाल तीन वर्षांतील गुणांच्या आधारे :
  • राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने अखेर जाहीर केला आहे. मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरी ग्राह्य़ धरण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यमंडळाला अवघ्या २८ दिवसांत निकालाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

  • केंद्रीय मंडळांच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्याही बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता मूल्यमापनाचे सूत्रही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणेच (सीबीएसई) कायम ठेवण्यात आले आहे.

  • त्यानुसार विद्यार्थ्यांना दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षेतील सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांचे गुण, अकरावीचे गुण आणि बारावीच्या वर्षांतील चाचण्या, प्रकल्प आणि प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा यांआधारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. निकाल जाहीर करण्याची नियमावली स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

२०२२ मधील भारतातील राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धा रद्द :
  • २०२२च्या बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा भाग असलेल्या नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धा भारतातून रद्द करण्यात आल्या आहेत. करोना साथीमुळे अनिश्चितता निर्माण झाल्याने चंडीगढला होणाऱ्या या स्पर्धा न घेण्याचा निर्णय भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारिणी समितीने राष्ट्रकुल क्रीडा महासंघाशी सल्लामसलत करून घेतला आहे.

  • भारताचा वर्चस्व असलेला नेमबाजी क्रीडा प्रकार २०२२च्या बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय २०१९मध्ये घेण्यात आला, तेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नाराजी प्रकट करून स्पर्धेवर बहिष्काराची धमकी दिली होती. परंतु डिसेंबर २०१९च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्टिन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड ग्रेव्हेमबर्ग यांनी आश्वासन दिल्यानंतर ‘आयओए’ने बहिष्कार मागे घेतला.

  • राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहा महिने आधी जानेवारी महिन्यात चंडीगढला नेमबाजी आणि तिरंदाजीच्या स्वतंत्र स्पर्धाचे आयोजन करण्याची योजना आखण्यात आली. ही पदके राष्ट्रकुल पदकतालिकेत समाविष्ट करण्याचेही निश्चित करण्यात आले, परंतु सद्यस्थितीत स्पर्धाचे आयोजन करणे कठीण असल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

देशभरात मागील २४ तासात ५९ हजार ३८४ रूग्ण करोनामुक्त :
  • देशातील करोना संसर्गाच वेग काहीसा कमी झालेला असला, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. देशभरात मागील २४ तासात ४६ हजार ६१७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५९ हजार ३८४ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.

  • देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०४,५८,२५१ झाली असून, आजपर्यंत २,९५,४८,३०२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५,०९,६३७ आहे. तर, आजपर्यंत देशात ४,००,३१२ रूग्ण करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३४,००,७६,२३२ जणांचे लसीकरण झाले आहे.

  • देशभरात १ जुलैपर्यंत ४१,४२,५१,५२० नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १८,८०,०२६ नमुने काल पॉझिटिव्ह आढळले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

भारतीय हद्दीत घुसखोरीचा ड्रोनचा पुन्हा प्रयत्न :
  • आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शुक्रवारी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या टेहळणी ड्रोनवर सीमा सुरक्षा दलाने गोळीबार करून त्यास सीमेपलीकडे परतवून लावले.

  • सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्णिया क्षेत्रात शुक्रवारी पहाटे ४.२५ वाजता ड्रोन दिसले. त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करताच जवानांनी गोळीबार केला. त्यामुळे ते पुन्हा पाकिस्तानी हद्दीत परत गेले, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. सीमा भागाची टेहळणी करण्यासाठी हे ड्रोन आले होते. परंतु जम्मूतील हवाई दलाच्या तळावरील गेल्या रविवारच्या ड्रोन हल्ल्यानंतर जवान सतर्क होते. त्या वेळी दोन ड्रोन विमानांनी बॉम्बस्फोट घडवले होते.

  • पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केल्याची ही पहिलीच घटना होती. त्यानंतर ड्रोन सोमवारी लष्करी आस्थापनांसह काही भागात घिरटय़ा घालत होते. मंगळवार आणि बुधवारीही असेच प्रकार घडले होते. पण जवानांनी गोळीबार करून त्यांना परतवले होते.

  • दरम्यान, लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी असे म्हटले होते, की ड्रोन सहज उपलब्ध होऊ लागल्याने असे प्रकार घडत आहेत. एखादा देश आणि दहशतवादीही त्यांचा गैरवापर करू शकतात.

०३ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.