चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ जुलै २०२०

Date : 3 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
खासगी प्रवासी रेल्वेसेवा २०२३पासून :
  • देशातील १०९ मार्गावरील प्रवासी रेल्वेसेवा खासगी कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव कार्यान्वित झाला असून ही खासगी सेवा एप्रिल २०२३ मध्ये प्रत्यक्षात येईल, अशी माहिती रेल्वेमंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी गुरुवारी दिली. ‘मेड इन इंडिया’ धोरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याने देशी खासगी कंपन्यांना अग्रक्रम असेल.

  • रेल्वे मंत्रालयाने बुधवारी १०९ रेल्वेमार्गावर १५१ रेल्वे गाडय़ांच्या व्यवस्थापनासाठी खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रकल्पामध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याला काँग्रेसने मात्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या या धोरणावर टीका केली. केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असून लोक केंद्राला माफ करणार नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

  • या रेल्वे १६ डब्यांच्या असतील व कमाल १६० किमी वेगाने धावतील. त्यामुळे कमीत कमी वेळेत प्रवास होऊ शकेल. रेल्वेचा चालक आणि गार्ड रेल्वे विभागांकडून दिले जातील. मात्र, गाडय़ांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंपनीची असेल. पात्रता सिद्ध झालेल्या खासगी कंपन्यांना ३५ वर्षांसाठी नियुक्त रेल्वेमार्गाची जबाबदारी दिली जाईल. रेल्वेच्या एकूण प्रवासीसेवांमध्ये खासगी प्रवासी सेवांचे प्रमाण फक्त ५ टक्के असेल.

“चिनी वस्तूंची आयात २९०० कोटींवरुन थेट शून्यावर आणणार…”; ‘या’ भारतीय कंपनीने दिला शब्द :
  • भारत चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी चीनचा निषेध करत चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी आंदोलनेही झाली.

  • सरकारी स्तरावरही चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी हलचाली सुरु झाल्या आहेत. केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याबरोबरच रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्रामध्ये चिनी कंपन्यांच्या कंत्रांटवर बंदी घालणे, स्थगिती देणे असे निर्णय मागील काही दिवसांमध्ये घेतले आहेत. मात्र सरकारी पातळीवर सुरु असणारी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची ही मोहीम आता कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत पोहचली आहे.

  • चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या मोहीमेमध्ये आता जेएसडब्ल्यू या बड्या कंपनीने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. चिनीमधून होणारी आयात पुढील दोन वर्षांमध्ये पूर्णपणे बंद करण्याचे उद्दीष्ट कंपनीने डोळ्यांसमोर ठेवलं आहे. कंपनीच्या सिमेंट आणि पेंट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांनी यासंदर्भात ट्विटवरुन माहिती दिली आहे.

ज्येष्ठ कॅरम संघटक जनार्दन संगम यांचे निधन :
  • ज्येष्ठ माजी कॅरमपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

  • प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे संगम यांना गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

  • संगम यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले. परंतु खेळापेक्षा त्यांनी संघटनेची कार्ये करण्यास अधिक पसंती दिली. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रमुख पंचांची भूमिका बजावणाऱ्या संगम यांनी तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

  • १९९२ ते २०१९ या २७ वर्षांच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव पद सांभाळले. तसेच संघटनेचे माजी सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. त्याशिवाय कॅरमच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रे आणि क्रीडा वाहिन्यांद्वारे त्यांनी अमूल्य योगदान दिले.

अबब… भारतीय रेल्वेची २.८ किमी लांबीची ‘शेषनाग’ ट्रेन पाहिलीत का :
  • गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तर काळाप्रमाणे रेल्वेही बदलत आहे. नुकताच भारतीय रेल्वेनं २.८ किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे. या मालगाडीला रेल्वेनं शेषनाग असं नाव दिलं आहे. भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रेल्वेगाडी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

  • भारतीय रेल्वेनं रेषनाग या मालगाडीला चार मालगाड्यांचे डबे एकत्र जोडून तयार केली आहे. या मालगाडीत एकूण २५१ डबे जोडण्यात आले होतं. तसंच ही मालगाडी खेचण्यासाठी सात इलेक्ट्रिक इंजिनही लावण्यात आली होती. सुरूवातीला तीन आणि मध्यभागी चार अशा इंजिनच्या मदतीनं ही रेल्वे चालवण्यात आली.

  • दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हीजनद्वारे या २.८ किलोमीटर लांबीच्या मालगाडीची चाचणी करण्यात आली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या लांबीची रेल्वे रुळांवर धावली. चाचणीदरम्यान या मालगाडीनं २५० किलोमीटरचा पल्ला गाठला.

  • “रेल्वेद्वारे २.८ किलोमीटर लांबीच्या मालगाडीची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. ४ ट्रेन जोडून ‘शेषनाग’ ही मालगाजी तयार करण्यात आली आहे. यामुळे एकाच वेळी अधिक सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं शक्य होईल,” असं मत पीयूष गोयल यांनी व्यक्त केलं.

०३ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.