चालू घडामोडी आणि दिनविशेष - 03 जानेवारी 2024

Date : 3 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
यंदा 132 दिवस उच्च न्यायालयाची दारे बंद, ही आहेत कारणे…
  • मुंबई उच्च न्यायालयाची दारे २०२४ सालातील ३६५ दिवसांपैकी १३२ दिवस बंद राहणार आहेत. टक्केवारीनुसार बघितले तर वर्षातील ३६ टक्के दिवस उच्च न्यायालयात कामकाज होणार नाही. ब्रिटिशकालीन परंपरेचे पालन करत यंदाही उच्च न्यायालय प्रशासनाने सुट्टया जाहीर केल्या आहेत. अलिकडेच न्यायालयीन प्रशासनाने २०२४ सालच्या सुट्ट्यांची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयातील सर्व खंडपीठात ही दिनदर्शिका लागू राहणार आहे. यानुसार, उच्च न्यायालयाला ग्रीष्मकालीन ३० दिवस सुट्टी तर दिवाळीनिमित्त १६ दिवस न्यायालय बंद राहणार आहे. नाताळनिमित्त देखील उच्च न्यायालयात १० दिवसाचा अवकाश राहील.
  • उच्च न्यायालयात १३ मे ते ९ जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहतील. दिवाळीच्या सुट्ट्या २८ ऑक्टोबर पासून ८ नोव्हेंबर पर्यंत राहतील. महिन्यानुसार बघितले तर उच्च न्यायालय सर्वाधिक २३ दिवस मे महिन्यात बंद राहील. जून, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात प्रत्येकी १४ दिवस न्यायालयीन कामकाज होणार नाही. सणानिमित्त १८ दिवस न्यायालयाची दारे बंद राहतील. याशिवाय ५२ रविवार तसेच प्रत्येक दुसरा आणि चौथा शनिवार असे २६ शनिवार देखील न्यायालय बंद राहील. खंडपीठानुसारही काही विशेष दिवशी न्यायालयाला सुट्टी देण्यात आली आहे.
  • नागपूर खंडपीठात १० मे रोजी अक्षय तृतीया आणि ११ सप्टेंबर रोजी ‘महालक्ष्मी पूजा’निमित्त सुट्टी राहील. पणजी खंडपीठात ६ सप्टेंबरला हरतालिका, ३ डिसेंबरला ‘फीस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेव्हिअर’ तसेच १९ डिसेंबरला ‘गोवा मुक्ती दिना’निमित्त सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
राज्यभरातील एसटीच्या फेऱ्या बंद होण्याची शक्यता
  • देशभर ट्रक आणि बसचालकांनी आंदोलन पुकारले असून इंधनाची वाहतूक आणि पुरवठा करणाऱ्या वाहनांवरील चालकही संपावर गेले आहेत. परिणामी, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी मंगळवारी सकाळपासून पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली आहे. ट्रक-बस चालकांच्या संपाचा फटका एसटीलाही बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डिझेल अभावी एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील दोषींना १० वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारपासून निदर्शने आंदोलन सुरू केले आहे. नववर्षाची सुरुवातच आंदोलनाने झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह देशातील महत्त्वाच्या शहरात ट्रक आणि बस चालकांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातही या आंदोलनाचा प्रभाव जाणवू लागला असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. विदर्भात आंदोलन चिघळले असून विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच देशभरात शांततेत सुरू असलेले आंदोलन आता चिघळू लागले आहे.
  • महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी खूप जवळची आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बहुसंख्य बसगाड्या डिझेलवर धावतात. दररोज एसटीच्या सरासरी १४ हजार बसेगाड्या धावतात. या बससाठी दररोज सरासरी ११ लाख लिटर डिझेल लागते. एसटीच्या बसना लागणाऱ्या डिझेलची पूर्तता न झाल्यास एसटीची सेवा खोळंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसटीच्या २५० आगारांत बसगाड्यांमध्ये डिझेल भरण्याची सुविधा आहे. इंडियन ऑइल कार्पोरेशन (आयओसी) व भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) या दोन कंपन्यांकडून एसटी महामंडळ डिझेल खरेदी करते. सर्व आगारांत मंगळवारी पुरेल इतका डिझेल साठा उपलब्ध आहे. संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास डिझेलची डिझेलचा तुटवडा निर्माण होईल आणि एसटी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतील, अशी भिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
‘हिट अँड रन’ कायद्याबाबत केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, ट्रक चालकांना कामावर येण्याचं आवाहन
  • नवीन ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात देशातील माल वाहतूकदार आणि ट्रक चालक संपावर गेले आहे. भारतीय न्यायिक संहिता २०२३ मध्ये दुरूस्ती केल्यानतंर ‘हिट अँड रन’ प्रकरणात दोषी चालकाला ७ लाख रूपयांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर ट्रक चालकांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. मात्र, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेनं चालकांना कामावर रूजू होण्याचं आवाहन केलं असून संप मागे घेण्यात आला आहे.
  • अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारशी चर्चा केली. या बैठकीनंतर गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी नवीन कायदा अद्याप लागू करण्यात आला नाही, अशी माहिती दिली.
  • “अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. नवीन कायदे अद्याप लागू करण्यात आलेले नाही. भारतीय न्यायिक संहिता १०६ (२) लागू करण्याआधी भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. अखिल भारतीय काँग्रेस आणि सगळ्या चालकांना संप मागे घ्यावा,” असं आवाहन अजय भल्ला यांनी केलं.
  • अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष मलकित सिंग यांनी म्हटलं, “भारतीय न्यायिक संहिता १०६ (२) या कायद्यानुसार १० वर्षाची शिक्षा आणि दंड अद्याप लागू करण्यात आला नाही. चालकांनी कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. ‘हिट अँड रन’ कायदा लागू होऊ देणार नाही. कायदा लागू झाल्यास आमच्या मृतदेहांवरून सरकारला जावं लागेल. चालकांनी पुन्हा कामावर रुजू व्हावं.”
देशात जेएन.१ चे १९७ रुग्ण, एका दिवसात आढळले ५७३ नवे करोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या ४५६५ वर
  • देशभरात करोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. गेल्या २४ तासांत संपूर्ण देशात ५७३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील सक्रीय करोनाबाधित रुग्णांची संख्या ४,५६५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही वेळापूर्वी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातला एक रुग्ण कर्नाटक आणि दुसरा हरियाणामधील आहे. दुसऱ्या बाजूला करोनाचा उपप्रकार असलेल्या जेएन.१ चा प्रादूर्भावही वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात जेएन.१ चे १८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या सक्रीय जेएन.१ बाधित रुग्णांची संख्या १९७ झाली आहे.
  • आतापर्यंत भारतातल्या एकूण दहा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत जेएन.१ बाधित रुग्ण आढळळे आहेत. केरळमध्ये ८३, गोव्यात ५१, गुजरातमध्ये ३४, कर्नाटकमध्ये आठ, महाराष्ट्रात सात, राजस्थानमध्ये पाच, तमिळनाडूत चार, तेलंगणात दोन ओडिशा आणि दिल्लीत प्रत्येकी एका जेएन.१ बाधित रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत. नोव्हेंबरमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांची संख्या केवळ १७ होती जी डिसेंबरमध्ये १७९ झाली. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी यात १८ रुग्ण वाढून ही संख्या आता १९७ वर गेली आहे. देशात रविवारी ६३६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर १४ जेएन.१ बाधित रुग्ण आढळले होते.
  • दुसऱ्या बाजूला देशातल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या काही महिन्यांपूर्वी ९०० पेक्षा कमी झाली होती. जी आता ४५०० हून अधिक आहे. करोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेच्या काळात ही संख्या ४.५ कोटींच्या पुढे होती. आतापर्यंत देशात ५.३ लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ४.४४ कोटी लोकांनी करोनावर मात केली आहे. भारतात करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.८ टक्के इतके आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार करोनावरील लशीचे देशभरात २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत.

 

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा: ठाणे, मुंबई शहर संघ उपांत्य फेरीत :
  • अग्रमानांकित नागपूर आणि द्वितीय मानांकित पुणे या संघांनी सहज विजयासह सोमवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडिमटन क्रीडा प्रकारातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

  • ठाणे आणि मुंबई शहर संघांनीही संघर्षपूर्ण विजयांसह आगेकूच केली.राज्य ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी नागपूर येथे झालेल्या बॅडिमटन स्पर्धेत पुरुष विभागात नागपूरने जळगावचा आणि पुण्याने सांगलीचा ३-० असा एकतर्फी लढतीत पराभव केला.

  • उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतीत ठाण्याने नाशिक आणि मुंबई शहरने पालघरचे आव्हान ३-१ असे परतवून लावले.

  • दोन्ही संघांच्या विजयात दुहेरीतील जोडय़ांनी मिळविलेल्या यशाचा वाटा मोठा राहिला.महिला विभागातही नागपूर, पुणे, ठाणे संघांनी एकतर्फी विजयासह आपली आगेकूच कायम राखली. मुंबई शहरला या विभागातही विजयासाठी झगडावे लागले. मुंबई शहरने नाशिकचा २-१ असा पराभव केला.

एलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत होण्यासाठी गौतम अदाणींसाठी काही आठवड्यांचीच प्रतीक्षा :
  • अब्जाधीश गौतम अदाणी १२१ अब्ज डॉलर्स संपत्ती असलेले जगातले तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. एलॉन मस्क यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकण्यासाठी अब्जाधीश गौतम अदाणी हे काही आठवडे दूर आहेत. एलॉन मस्क यांना ते काही आठवड्यातच संपत्तीच्या बाबतीत मागे टाकू शकतात.

  • टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची संपत्ती नोव्हेंबर २०२१ मध्ये ३४० अब्ज डॉलर्सवरून १३७ अब्ज डॉलर्सवर घरसली आहे. दुसरीकडे ब्लुम्बर्गद्वारे आशियातील सर्वात बिझी डीलमेकर म्हणून जे उद्योजक आहेत ते गौतम अदाणीच आहेत. गौतम अदाणी यांच्या संपत्तीत एक वर्षात मोठी भर पडली आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती १२१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

  • गेल्या एका वर्षात गौतम अदानी यांची संपत्ती ४४ अब्ज डॉलर्सने वाढली, तर मस्कची संपत्ती १३३ अब्ज डॉलर्सने घसरली. एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत घट होत राहिली आणि गौतम अदानी यांनी गेल्या १२ महिन्यांच्या गतीने त्यांच्या संपत्तीत अब्जावधींची भर घातली. हे प्रमाण असंच राहिलं तर तर भारतीय टायकून ट्विटर बॉसला पाच आठवडे किंवा ३५ दिवसांत मागे टाकतील.

  • जगातले दुसरे श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी. जर मस्क यांची संपत्ती दररोज सरासरी ०.३६ अब्जां डॉलर्सनी घसरत राहिली आणि अदाणी यांची संपत्ती गेल्या बारा महिन्यातील वेगाप्रमाणेच रोज सरासरी ०.१२ अब्ज डॉलर्सनी वाढत राहिली तरीही येत्या ३५ दिवसात गौतम अदाणी हे एलॉन मस्क यांना मागे टाकतील.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ‘मिशन २०२४’! भारतीय टी२० संघाने ‘बिग थ्री’ ना स्पष्ट संकेत :
  • भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षातील त्यांच्या अभियानाची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळायची आहे. उभय संघांतील टी२० मालिका ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा टी२० मालिकेत खेळणार नसल्यामुळे हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

  • भारतीय संघ २०२३ ची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेने करणार आहे. ३ जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले आहे. ‘मिशन २०२४’ साठी टीम तयार करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज-अमेरिकेत टी२० विश्वचषक होणार आहे. त्या स्पर्धेत हार्दिक टीम इंडियाचे नेतृत्व करेल अशी दाट शक्यता आहे.

  • भारतीय संघातील ‘बिग-थ्री’ रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही. अशा स्थितीत संघावर हार्दिकची छाप पूर्णपणे दिसून येईल. यावर्षी भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाचे संपूर्ण लक्ष त्या स्पर्धेवर आहे. त्यासाठी व्यवस्थापनाने १ जानेवारीला बैठक घेऊन रोडमॅपही तयार केला. त्याचे लक्ष टी२० सामन्यांवर कमी आहे. कोहली, रोहित आणि राहुल यांनाही छोट्या फॉरमॅटपासून दूर ठेवता येईल. अशा परिस्थितीत हार्दिकला संघ तयार करण्याची पूर्ण संधी असेल.

नोटाबंदीची अधिसूचना बेकायदाच;पाच सदस्यीय घटनापीठातील न्या. नागरत्ना यांचे मत :
  • नोटाबंदीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला. पण, या निर्णयाशी असहमती दर्शवत पाच सदस्यीय घटनापीठाच्या एक सदस्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी नोटाबंदीचा निर्णय अवैध असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले, की या संदर्भातील नोंदींनुसार हा निर्णय घेतला जात असताना रिझव्र्ह बँकेने स्वत:चे कोणतेही विचारपूर्वक मत नोंदवल्याचे दिसत नाही. त्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ रोजीची ही अधिसूचना बेकायदेशीर आहे.

  • केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने चार विरुद्ध एक मताने योग्य ठरविला आहे. पाच सदस्यीय घटनापीठातील न्या. नागरत्ना यांनी बहुमताच्या निर्णयाशी असहमती व्यक्त­ करताना आपल्या निकालात नमूद केले, की नोटाबंदीचा निर्णय अधिसूचनेद्वारे नव्हे, तर वैधानिक प्रक्रियेद्वारे घ्यायला हवा होता.

  • आरबीआय (रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया) कायद्याच्या कलम २६ (२) अंतर्गत केंद्राच्या अधिकारांच्या मुद्दय़ावरही त्यांनी घटनापीठाच्या बहुमताशी मतभेद व्यक्त करून वेगळे मत नोंदवले. जेव्हा नोटाबंदीच्या निर्णयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून दिला जातो तेव्हा तो आरबीआय कायद्याच्या कलम २६ (२) अंतर्गत नसतो. त्यासाठी कायदेमंडळात वैधानिक मार्गाने कायदे करून हा निर्णय घेण्याची आवश्यकता असते. याबाबत गोपनीयता गरजेची असेल तर अध्यादेश (वटहुकूम) काढणे गरजेचे असते. न्या. नागरत्ना यांनी नमूद केले, की या निर्णयासंदर्भात रिझव्र्ह बँकेने कोणताही स्वतंत्र विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे ही अधिसूचना बेकायदेशीर आहे आणि नोटाबंदीची कारवाई अहितकारक आहे.

  • याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादानुसार आरबीआय कायद्याच्या कलम २६(२) अंतर्गत सरकार संबंधित मूल्यांच्या सर्व मालिकांच्या नोटांवर बंदी आणू शकत नाही. घटनापीठाने बहुमाताने याचिकाकर्त्यांचा हा युक्तिवाद फेटाळला. घटनापीठाने नमूद केले, की ठराविक मूल्यांच्या नोटांच्या सर्व मालिकांऐवजी एका मालिकेसाठीच सरकार आपल्या अधिकारांचा वापर करू शकते असे नाही. याबाबत नागरत्ना यांनी नमूद केले, की यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत न्या. गवई यांनी मांडलेल्या मतांपेक्षा माझी मते भिन्न आहेत.

  • चलन, नाणी, कायदेशीर निविदा आणि परकीय चलनासंदर्भातील राज्यघटनेतील तरतुदींनुसार असे अधिकार प्राप्त करावे लागतात. न्या. गवईंच्या निकालात नोटाबंदीच्या केंद्राच्या निर्णयाची तरतूद या संबंधीच्या कायद्यात नाही, याबाबत विचार केलेला दिसत नाही.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ जानेवारी २०२२

 

देशात अर्थगती उत्तम स्थितीत!; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन :
  • करोनापूर्व काळाच्या तुलनेत सध्या आर्थिक प्रगतीची चांगली चिन्हे आहेत, असे निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नोंदवले. त्याचबरोबर, करोना साथीने अनेक आव्हाने उभी केली असली तरी ती देशाची विकासगती रोखू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • नव्या वर्षात विकासाचा वेग आणखी वाढवण्याची गरज असून देश नव्या वर्षात करोना साथीशी संपूर्ण सतर्कतेने आणि दक्षतेने लढा देईल. तसेच देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

  • ‘पंतप्रधान -शेतकरी योजने’च्या दहाव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरचित्र प्रणालीद्वारे करण्यात आले. या वेळी त्यांनी २०२१ मध्ये आरोग्य, संरक्षण आणि कृषी, स्टार्ट अप इकोसिस्टीम, पायाभूत सुविधांमध्ये देशाने केलेल्या कामगिरीवरही प्रकाश टाकला. त्याचबरोबर काशी-विश्वनाथ कॉरिडॉर आणि राममंदिराच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आल्याचा उल्लेख मोदी यांनी भाषणात केला.    

  • देशवासीयांना १४५ कोटी करोना लसमात्रा देण्यात आल्याचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाने करोना साथीशी दिलेल्या लढ्याबरोबरच वर्षभरात केल्या गेलेल्या सुधारणांमुळे २०२१ साल कायम स्मरणात राहील. सरलेल्या वर्षात देशाने विविध क्षेत्रांमध्ये सुधारणांचा वेग वाढवला आणि आधुनिक पायाभूत सुविधाही निर्माण केल्या, असे पंतप्रधान म्हणाले.

संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड :
  • उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे यांच्या नावावर रविवारी महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद या सर्व घटक मंडळांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाल्यानंतर काही मिनिटांतच सासणे हेच अध्यक्ष होतील, असे ठरविण्यात आले.

  • अध्यक्षपदासाठी घटक संस्थांकडून प्रवीण दवणे, रामचंद्र देखणे, तारा भवाळकर व अनिल अवचट यांची नावेही चर्चेत होती. यातील अनिल अवचट यांनी आपला विचार अध्यक्षपदासाठी केला जाऊ नये, असे कळविले होते. त्यांचे नाव छत्तीसगडहून त्यांच्या चाहत्याने सुचविले होते. तसेच िहडता-फिरता अध्यक्ष असावा, असा सूर होता़  त्यामुळे सासणे यांचे नावच योग्य असल्याचे सर्वाचे मत असल्याने सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उदयगिरी महाविद्यालयास ६० वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजनाचा मान मिळावा अशी विनंती करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली. लातूर जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे अशी काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचीही इच्छा होती. ती तेव्हा पूर्ण झाली नाही; पण आता ती पूर्ण होणार असल्याचा आनंद असल्याचे साहित्य संमेलन आयोजनात पुढाकार घेणारे रामचंद्र तिरुके यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत संयोजन समितीच्या बैठकीत स्वागताध्यक्ष पदाचाही निर्णय घेतला जाणार आहे.

  • नाशिकच्या तुलनेत उदगीर येथे येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय होणार नाही. पण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवरील गावात होणारे हे पहिले संमेलन चांगले होईल, असेही तिरुके म्हणाले. साहित्य संमेलनात कोणत्या विषयावर परिसंवाद व्हावेत याविषयीही रविवारी  झालेल्या बैठकीत चर्चा झाली, दोन दिवसांत निमंत्रणपत्रिकेचा मसुदा तयार करून उदगीर येथील संयोजकांना दिला जाणार आहे. दीर्घ कथांमध्ये अधिक प्रभावी लिखाण करणारे सासणे यांची प्रशासकीय कारकीर्दही मोठी आहे. प्रशासकीय व्यवस्थेतून माणसांच्या मनाचा तळ शोधणारे लिखाण सासणे यांनी केले.

पेगॅससबाबत समितीकडे तक्रार करण्यासाठी ७ जानेवारीपर्यंत मुदत :
  • पेगॅसस या हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरचा प्रयोग आपल्या भ्रमणध्वनी संचावर झाल्याची शंका ज्या नागरिकांना आहे, त्यांनी तक्रारीसाठी आपल्याशी संपर्क साधावा, अशी जाहीर सूचना सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने रविवारी केली. यासाठी ७ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.

  • समितीकडे संपर्क करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आपल्याला अशी शक्यता का वाटते, हे नमूद करणेही आवश्यक आहे. आपला भ्रमणध्वनी संच समितीने तपासण्यास कोणतीही हरकत असणार नाही, हेसुद्धा या नागरिकांना समितीला कळविले पाहिजे. याबाबत समितीने जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून ७ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत ईमेलद्वारे संपर्क साधण्यास सांगितले आहे.

  • नागरिकांनी समितीला तपासणीसाठी दिलेला संच त्यांना तपासणीनंतर परत केला जाणार आहे. संच समितीला सुपूर्द केल्याची डिजिटल पावतीही त्या संचाच्या छायाचित्रासह दिली जाईल.

मुस्लीम महिलांची छायाचित्रे प्रसारित करणाऱ्या अ‍ॅपवर बंदी :
  • एका मोबाइल अ‍ॅपवर १०० प्रभावशाली मुस्लीम महिलांची छायाचित्रे लिलावाच्या नावाखाली प्रसारित केल्याबद्दल देशभर वाद उद्भवला आहे. या पार्श्वभूमीवर ‘गीटहब’ या ऑनलाईन मंचावर बंदी घालण्याचे आदेश केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी दिले.

  • ‘गीटहब’चे संकेतस्थळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस यंत्रणा आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद गट (सीईआरटी) या दृष्टीने समन्वय साधून कारवाई करीत असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

  • ‘गीटहब’ या खुल्या संकेतस्थळावर हे आक्षेपार्ह मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय करण्यात आली होती. हे अ‍ॅप उघडल्यावर ट्वीटरसह अन्य समाजमाध्यमांवर सक्रीय असलेल्या पत्रकार मुस्लीम महिलांसह अन्य क्षेत्रांतील प्रभावशाली मुस्लीम महिलांची छायाचित्रे विक्रीसाठी या मथळय़ाखाली उघडतात.

लसीकरणात भारताची कौतुकास्पद कामगिरी! अमेरिका, इंग्लडसारख्या बलाढ्य देशांच्या तुलनेत पुढे : 
  • देशात पुन्हा एकदा करोनाबाधितांची आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये, त्यामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. करोनापासून बचावासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं, यासाठी सरकार प्रयत्न करतंय.

  • नुकतंच १५ ते १८ वयोगटातील लोकांसाठी देखील लसीकरण सुरू करण्यात आलंय. लसीकरणाच्या बाबतीत भारत जगातल्या अनेक विकसीत देशांच्या पुढे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून या संदर्भातील माहिती दिली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. भारतातील करोना लसीकरण मोहिमेने कमी लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

एकाच वेळी ७५ हजार विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीत गायन :
  •  देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०२८ ग्रामपंचायत आणि ७५ हजार जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी मिळून एकाच दिवशी एकाच वेळी राष्ट्रगीत गायले. देशाप्रती आदर निर्माण व्हावा, हा उद्देश ठेवून याचे आयोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

  • देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात एकाच वेळी राष्ट्रगीत गाण्याचे आयोजन केले होते. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जिल्हास्तरीय राष्ट्रगीत गायन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सरपंच गणेश पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्राचार्य दादासाहेब गाडे, शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी शाळेतील प्रांगण रंगीबेरंगी फुले फुगे यांनी सजविले होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र योद्धाचे वेश परिधान केले होते.

  • शनिवारी सकाळी दहा वाजता जिल्ह्यात एकाच वेळी राष्ट्रगीत गायले. या वेळी भोसे येथील शाळेत आझादीचा अमृत महोत्सव हे नाव विद्यार्थ्यांनी मैदानावर मानवी साखळी करून चितारले होते. मैदानावर भारताचा नकाशा रेखाटण्यात आला होता. करोना नियमांचे पालन करत आझादीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महोत्सव साजरा करणेत आला. या वेळी बोलताना स्वामी म्हणाले की, जिल्हा परिषदेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रोनाल्डोमुळे मँचेस्टर युनायटेड विजयी : 
  • आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात बर्नले संघावर ३-१ असा विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या युनायटेडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला.

  • आठव्या मिनिटाला स्कॉट मॅक्टोमिनेने गोल करत युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. २७व्या मिनिटाला जेडन सँचोने मारलेला फटका बर्नलेचा कर्णधार बेन मीला लागून गोल जाळय़ात गेल्याने युनायटेडची आघाडी दुप्पट झाली.

  • मग ३५व्या मिनिटाला मॅक्टोमिनेचा फटका बर्नलेचा गोलरक्षक वेन हेनसीने अडवला. मात्र, चेंडू थेट रोनाल्डोकडे गेला आणि त्याने कोणतीही चूक न करता गोल मारला. ३८व्या मिनिटाला बर्नलेच्या आरोन लेननने गोल करत युनायटेडची आघाडी १-३ अशी कमी केली. परंतु उत्तरार्धात त्यांना एकही गोल न करता आल्याने युनायटेडने विजयाची नोंद केली. हा त्यांचा १८ सामन्यांत नववा विजय ठरला.

०३ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.