चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ फेब्रुवारी २०२१

Date : 3 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आंध्र, तेलंगणाच्या एनसीसी संचालनालयाकडे ‘आरडी बॅनर’; दिल्लीची मान्या ठरली ‘बेस्ट कॅडेट’ :
  • प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या एनसीसी परेडमध्ये सहभागी झालेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या एनसीसी संचालनालयानं सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा बॅनर जिंकला आहे. तसेच दिल्लीच्या मान्या एम. कुमार हीने देशभरातील कॅडेट्समधून बेस्ट कॅडेटचा पुरस्कार पटकावला.

  • विजयाबद्दल आंध्र प्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाचे उपमहासंचालक म्हणाले, “आमच्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे. यंदा कोविड-१९ मुळे एनसीसीच्या अनेक उपक्रमांवर निर्बंध आले होते. मात्र, तरीही एनसीसी संचालनालयानं चांगली कामगिरी केली. उत्कृष्ट संचालनालयाचा बॅनर जिंकण्याची ही आमची पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही आम्ही बाजी मारली आहे.”

  • आरडी बॅनर (प्रजासत्ताक दिनी परेड बॅनर) आणि बेस्ट पीएम रॅलीचा किताब आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे एअर कमोडोर कृष्णन आणि सिनिअर अंडर ऑफिसर लिंगामगरी त्रिशा यांनी स्विकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही ट्रॉफी देण्यात आली.

  • प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान रॅलीमध्ये प्रत्येक राज्यातील एनएनसी संचालनालयांच्या कॅडेट्सने विविध गुणदर्शनांचे प्रदर्शन केले यामध्ये आंध्र आणि तेलंगणा राज्याने बाजी मारली. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एनसीसी संचालनालयाने एका तपानंतर (बारा वर्षांनंतर) सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा किताब जिंकला आहे.

‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चा उल्लेख करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला दिला इशारा :
  • कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं आंदोलन आणखी तीव्र होऊ लागलं आहे. कायदे रद्द केल्याशिवाय घरी जाणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून, पंजाबजचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यावरून केंद्राला गंभीर इशारा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारचं उदाहरण देत लवकर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.

  • मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यास होणारा विलंब १९८४ ऑपरेशन ब्लू स्टारच्या दिशेनं राज्याला ढकलून शकतो, असं ते बैठकीत म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याच्या विधानावर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बैठकीत जोर दिला.

  • बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले याबद्दलची माहिती पत्रकातून देण्यात आली. “मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आणि सांगितलं की, पाकिस्तानाकडून असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्व गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला हा मुद्दा सोडवण्यासाठी काम करावं लागणार आहे. सीमेपलीकडून (पाकिस्तानातून) किती ड्रोन्स, शस्त्रास्त्र आणि स्फोटक तस्करीच्या मार्गानं पंजाबमध्ये आणण्यात आले आहेत, याची आपल्याला माहिती असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.”

संपूर्ण देशात लागू होणार धर्मांतर विरोधी कायदा?; केंद्रानं दिलं उत्तर :
  • धर्मांतर तसंच आंतरजातीय विवाहावर बंदी आणणारा कायदा आणण्यासंबंधी केंद्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाशासित अनेक राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी आंतरजातीय विवाहामुळे धर्मांतर होत असल्याचा केंद्राचा दावा असून हे रोखण्यासाठी सरकार कायदा आणणार आहे का? अशी विचारणा करण्यात आली. यावर केंद्राने उत्तर दिलं आहे.

  • हा विषय राज्यांच्या अख्त्यारित येत असल्याने धर्मांतर तसंच आंतरजातीय विवाहावर बंदी आणणारा कोणताही कायदा आणण्याचा विचार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून मंगळवारी संसदेत देण्यात आली. “कायदा-सुव्यवस्था, पोलीस हे राज्यांचे विषय आहेत. यामुळेच धर्मांतराशी संबंधित गुन्ह्यांचा प्रतिबंध, शोध, नोंदणी, तपास आणि खटला ही मुख्यतः राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चिंतेची बाब आहे. कायद्याची अमलबजावणी करणार्‍या संस्था नियमांचं उल्लंघन केल्याचं लक्षात येतं तेव्हा कायद्यानुसार कारवाई केली जाते,” अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी दिली आहे.

  • केरळमधील काँग्रेसच्या पाच खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जी किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. आंतरजातीय विवाहामुळे जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याचं केंद्र सरकारला वाटत असून हे रोखण्यासाठी कोणता कायदा केला जात आहे का ? अशी विचारणा खासदारांकडून करण्यात आली होती. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने धर्मांतर विरोधी कायदा केले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तर दुसरीकडे हरियाणा, आसाम आणि कर्नाटकातही अशा प्रकारचा कायदा आणला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वर्षांतील शब्द म्हणून ‘ऑक्सफर्ड’चे ‘आत्मनिर्भरता’वर शिक्कामोर्तब :
  • ‘आत्मनिर्भरता’ हा  २०२० या वर्षांतील महत्त्वाचा हिंदी शब्द ठरला आहे, असे ऑक्सफर्ड भाषा विभागाने म्हटले आहे. भारतीय लोकांनी करोना काळामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक आव्हानांचा सामना करीत मोठी कामगिरी केली. आत्मनिर्भरता (स्वयंसहायता या अर्थाने) या शब्दाची निवड भाषा तज्ज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय व इमोगेन फॉक्सेल यांनी केली आहे.

  • ऑक्सफर्डच्या म्हणण्यानुसार, या  हिंदी शब्दात संपूर्ण वर्षांतील भावना व इतर सर्व गोष्टी व्यक्त झाल्या आहेत, त्यामुळे २०२० मधील महत्त्वाचा हिंदी शब्द म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.

  • ऑक्सफर्ड भाषा विभागाने म्हटले आहे  की, करोनाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी भारताचे कोविड पॅकेज जाहीर केले तेव्हा त्यांनी देशाला स्वयंपूर्णतेचे आवाहन केले होते. कारण त्यावेळी अर्थव्यवस्था, समाज व व्यक्ती असे सर्वच घटक एका कधीही सामोऱ्या न गेलेल्या स्थितीतून मार्गक्रमण करीत होते.

  • आत्मनिर्भरता या शब्दांचा वापर त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नंतरच्या अनेक भाषणांतून केला होता. त्यामुळे सामान्य लोकांच्या तोंडीही हा शब्द आला. आत्मनिर्भर भारत मोहीम ही कोविड काळात उत्पादन क्षेत्रात राबवण्यात आली. प्रजासत्ताक दिन संचलनात जैवतंत्रज्ञानावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला होता त्यात कोविड लस विकसन प्रक्रिया भारताने स्वबळावर केल्याचे दाखवण्यात आले होते.

मलेरिया मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक :
  • अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने डॉ. राज पंजाबी यांची नेमणूक मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून केली असून ते भारतीय वंशाचे आहेत.

  • आफ्रिका व आशियायी देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचा उद्देश या मोहिमेत आहे. लायबेरियात जन्मलेले पंजाबी व त्यांचे कुटुंबीय तेथील यादवी युद्धानंतर अमेरिकेत पळून आले होते व १९९० मध्ये शरणार्थी म्हणून आयुष्य जगत होते. पंजाबी (वय ३९) यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आज सकाळी मलेरिया विरोधी मोहिमेच्या समन्वयकपदी शपथविधी झाला. बायडेन प्रशासनाने माझी जी नेमणूक केली त्याचा अभिमानाच वाटतो. या सेवेची संधी मिळाली याबद्दल मी ऋणी आहे. माझे कुटुंब व मी तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो.

  • लायबेरियात त्यावेळी यादवी युद्ध सुरू होते. अमेरिकी समुदायाने त्यावेळी आमच्या कुटुंबाला आधार दिला त्यामुळे आमचे आयुष्य पूर्वपदावर आले. त्यामुळे या देशाची सेवा करण्यात आनंदच आहे. बायडेन-हॅरीस प्रशासनाने आपल्यावर जो विश्वास टाकला तो आपण सार्थ ठरवू. पंजाबी यांनी सांगितले की, अमेरिकेपुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. त्यातून लवकर बाहेर पडणे गरजेचे आहे.

  • माझे शिक्षण अमेरिकेत झाले असून परिस्थितीला आम्ही कधी शरण गेलो नाही तर तिचा स्वीकार करीत नवे भवितव्य घडवले. पंजाबी हे पेशाने डॉक्टर असून सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक आहेत. मलेरिया निर्मूलनाच्या लक्ष्यात ते युनाटेड स्टेटस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट व सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेच्या वतीने समन्वयाचे काम करतील.

गिलचं नाव जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरामध्ये होईल, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजानं केलं कौतुक :
  • भारतीय संघातील उद्योनमुख सलामी फलंदाज शुबमन गिल याच्या पदार्पणाच्या सामन्यातील फलंदाजीनं सर्वांनाच प्रभावीत केलं आहे. ऑस्ट्रेलियात मेलबर्न मैदानावर शुबमन गिल यानं भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं. शुबमन यानं कांगारुच्या वेगवान तिकडी माऱ्यासमोर संयमी फलंदाजी करत ४५ आणि ३५ धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीदरम्यान शुबमन यानं आकर्षक फटके मारत सर्वांचेचं लक्ष वेधलं.

  • शुबमन यानं आपला फॉर्म पुढील सामन्यातही कायम ठेवला. गाबाच्या मैदानावर गिल यानं महत्वाची ९१ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला होता. शुबमनच्या या खेळीवर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉज प्रभावीत झाला आहे. तो म्हणाला की, पुढील दहा वर्षांमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये शुबमन गिल उत्कृष्ट सलामी फलंदाज म्हणून नावारुपाला येईल.

  • हॉज म्हणाला की, ‘शुबमनकडे क्रिकेटमधील सर्वप्रकराचे फटके आहेत. जोश हेजलवूड, स्टार्क आणि पॅट कमिन्स यासारख्या जगातील अव्वल वेगवान माऱ्यासमोर शुबमनची फलंदाजी पाहून मी प्रभावीत झालो. जगातील अव्वल गोलंदाजांनी फेकलेल्या उसळत्या चेंडूना शुबमन गिलनं दिलेलं प्रत्युत्तर कमालीचं होतं. त्याच्याकडे एकापेक्षा एक सरस फटके आहेत. त्यामुळेच पुढील काही वर्षांमध्ये तो क्रिकेटमध्ये वेगानं नावारुपाला येईल अन् कसोटी क्रिकेटमध्ये जगातील सर्वात यशस्वी सलामी फलंदाज होऊ शकतो. ‘

०३ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.