चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ ऑगस्ट २०२१

Updated On : Aug 03, 2021 | Category : Current Affairs


Maharashtra HSC Results 2021 - बारावीचा आज निकाल :
 • राज्य मंडळातर्फे  बारावीचा निकाल मंगळवारी (३ ऑगस्ट) दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुण असलेल्या निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल.

 • राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सोमवारी ही माहिती दिली. करोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

 • ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य मंडळाला पालन करता आले नाही. बारावीच्या निकालावर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने राज्य मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा निकाल

https://hscresult.net

11admission.org.in

https://msbshse.co.in

maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

या संकेतस्थळांद्वारे पाहता येईल. 

पंजाबमध्ये सर्व शाळा सुरू :
 • पंजाबमध्ये सोमवारी सर्व वर्गाच्या शाळा काही महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाल्या असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त होती. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. राज्य सरकारने शनिवारी २ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती.   रुग्णांची संख्या कमी होत असल्याने करोना निर्बंध शिथिल केले होते.

 • करोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जाणार असून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेतली जाणार आहे. शाळांची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ अशी असणार आहे.  

 • सोमवारी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्व प्राथमिक शाळा व पहिली दुसरीचे वर्ग मार्च २०२० नंतर १० महिन्यांनी सुरू झाले आहेत. सर्व शाळा दोन ऑगस्टपासून सुरू करण्याच्या आदेशापूर्वी २६ जुलैला दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. जी मुले शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग उपलब्ध असणार आहेत.

 • डॉक्टर्स व शिक्षण तज्ज्ञ यांच्या कोणत्या अहवालानुसार सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते व आप नेते हरपाल सिंह चिमा यांनी केला आहे.  राज्यात ६०.५ लाख विद्यार्थी असून एकूण २० टक्के लोकसंख्येचा जीव धोक्यात टाकला जात आहे असे त्यांनी सांगितले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन पराक्रम दिवस म्हणून साजरा करणार - केंद्र सरकार :
 • भारत सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीचा उद्घाटन समारंभ २३ जानेवारी २०२१ रोजी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल, कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते.

 • दरम्यान, केंद्र सरकारने २३ जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली

 • १२५ जयंतीनिमित्त नेताजी सुभाष चंद्र बोस स्मारक नाणे, आणि टपाल तिकीटाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले. २३ जानेवारी २०२१ रोजी कोलकाता आणि ५ मार्च २०२१ रोजी जबलपूर येथे आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन देखील करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रुपी’चा शुभारंभ; सेवेबद्दल जाणून घ्या :
 • ‘ई रुपी’ सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे. ‘ई-रुपी’ हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.

 • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या UPI प्लॅटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. ई-आरयूपीआय सेवेचे प्रायोजक लाभार्थी आणि सेवा प्रदात्याशी कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने जोडते.

 • भारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. कंपन्या, दुकानदार आणि नागरिक डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहारांना गती मिळताना दिसत आहे. जुलै महिन्यात ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे.

 • ३२४ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे.

०३ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)