चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 02, 2021 | Category : Current Affairs


जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा : भारत-जॉर्जियामध्ये पहिल्या डावात बरोबरी :
 • मेरी अ‍ॅन गोम्सने दिमाखदार कामगिरी कायम ठेवताना सालोमे मेलियाचा पराभव केल्यामुळे ‘फिडे’ जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जॉर्जियाविरुद्ध उपांत्य फेरीचा पहिला डाव भारताला बरोबरीत सोडवण्यात यश आले.

 • जॉर्जियाच्या लेला जावाक्शिव्हिलीने भक्ती कुलकर्णीला पराभूत केल्यामुळे भारतीय संघ पिछाडीवर पडला. मात्र, उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही सामने जिंकणाऱ्या गोम्सने उपांत्य फेरीच्या पहिल्या डावातही दमदार खेळ केला. तिने मेलियाला ५५ चालींमध्ये शह देत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. तत्पूर्वी, भारताची अव्वल खेळाडू द्रोणावल्ली हरिका आणि जॉर्जियाच्या निना झाग्निद्झे यांच्यातील सामना केवळ १४ चालींमध्ये बरोबरीत सुटला. आर. वैशाली आणि निनो बात्सिएव्हिली यांच्यातील सामन्यातही बरोबरी झाली.

 • त्याआधी, भारताने उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानवर १.५-०.५ अशी मात करत स्पर्धेत आगेकूच केली होती. या लढतीतील पहिल्या डावात २-२ अशी बरोबरी झाल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २.५-१.५ अशी सरशी साधली.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा - पहिल्याच फेरीत अभिषेक पराभूत :
 • भारताचा आघाडीचा कंपाऊंड तिरंदाज अभिषेक वर्माचे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले.

 • जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडेन गेलेंथीनने अभिषेकचा १४६-१४२ असा चार गुणांनी पराभव केला. ब्रॅडेनने पाच वेळा अचूक १० गुण मिळवले. २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक पॅरिसला झालेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात जेतेपद पटकावून या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

 • याशिवाय २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत अभिषेकने रौप्यपदकही जिंकले होते. त्यानंतर २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अभिषेकने वैयक्तिक कांस्य आणि ज्योती सुरेखा व्हेन्नमच्या साथीने मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते.

शैक्षणिक शुल्क माफ केलंच पाहिजे! विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर राज्यव्यापी संपावर :
 • महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (MARD) करोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आजपासून (१ ऑक्टोबर) अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. या संपाबाबत मार्डची वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात गुरुवारी (३० सप्टेंबर) रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू झाली होती.

 • दरम्यान, या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सायनच्या लोकमान्य टिळक म्युनसिपल मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी आपली भूमिका मांडली आहे.

 • “आम्हाला लेखी आश्वासन हवं आहे. रुग्णांच्या सेवेमध्ये तडजोड होणार नाही, याची दक्षता घेत आम्ही आपत्कालीन सेवा बंद केली नाही.

 • शैक्षणिक शुल्क माफ केलंच पाहिजे कारण करोना काळादरम्यान शैक्षणिक हालचाली मंदावल्या होत्या. त्याचसोबत, वसतिगृहांची स्थिती देखील चांगली नाही. त्याचसोबत, बृहन्मुंबई महानगरपालिका देखील डॉक्टरांच्या वेतनातून कर कापत आहे”, असं मार्डचे सदस्य डॉ. अक्षय यादव यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

कंगना रनौत - योगी आदित्यनाथ भेट; उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची झाली ब्रँड अॅम्बेसेडर :
 • आधी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर लॉकडाउनच्या काळात सत्ताधारी शिवसेनेसोबत उघड वाद करणारी अभिनेत्री कंगना रनौत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे. शुक्रवारी कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे.

 • कंगना रनौतने प्रमुख भूमिका साकारलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लागलीच कंगनानं पुढच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आहे. शुक्रवारी चित्रीकरण संपवून कंगनानं थेट लखनौ गाठलं आणि तिथे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत तिची भेट झाली.

 • कंगनानं शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलं.

भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी विलगीकरण सक्तीचे; करोना चाचणीही अनिवार्य :
 • भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना आता दहा दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागेल. त्याशिवाय आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी सोमवार, ४ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. 

 • प्रवासाच्या ७२ तास आधी करोना चाचणी (आरटीपीसीआर) केल्याचा अहवाल ब्रिटिश नागरिकांनी सादर करणे अनिवार्य असेल. तसेच विमानतळावर उतरल्यावर लगेच आणि आगमनानंतर आठ दिवसांनी पुन्हा करोना चाचणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

 • ब्रिटनने परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी कठोर करोना नियमावली लागू केली होती. ब्रिटनचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. भारत आणि ब्रिटनमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरूनही वाद उद्भवला होता. त्यावर प्रतिक्रियात्मक कृती म्हणून भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

 • आरोग्य आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही जशास तसे धोरण स्वीकारण्याचे ठरवले आहे. ब्रिटनने आधी कोविन लसीकरण प्रमाणपत्रास मान्यता देण्यासही नकार दिला होता.

आता WhatsApp वर दिसणार भारतीय रुपयाचं चिन्ह; व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्समध्ये झालं आणखी सोपं :
 • लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) अनेक नवीन अपडेट्स जारी केली आहेत. या अपडेट्समार्फत, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्सना अनेक नवीन फीचर्स दिली आहेत. ही फीचर्स लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहेत. त्यापैकी एक नवं जबरदस्त फिचर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स (WhatsApp Payments) आहे. या फीचरद्वारे, आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अगदी सहज पैसे पाठवू शकतो.

 • व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फीचर: व्हॉट्सअ‍ॅपच्या अलीकडील अपडेटनंतर आता एक नवीन फिचर आलं आहे. ज्याद्वारे आपण आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना त्यांच्याशी गप्पा मारता मारता तितक्याच सोप्या मार्गाने पैसे देखील पाठवू शकतो आणि रिसिव्ह देखील करू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं पेमेंट फिचर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर कार्य करतं.

 • ‘₹’ चिन्हाचा समावेश : व्हॉट्सअ‍ॅपची कंपनी असलेल्या फेसबुकने आपल्या भारतीय युझर्ससाठी एक खास अपडेट जारी केलं आहे. हा बदल व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स फीचरशी संबंधित आहे. कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (GFF) २०२१ मध्ये जाहीर केलं आहे की, आतापासून सर्व व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या चॅट बॉक्समध्ये ‘₹’ हे भारतीय रुपयाचं चिन्ह समाविष्ट केलं जाईल. ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फीचर वापरणं सोपे होईल.

 • नव्या अपडेटनंतर फीचर झालं आणखीच सोपं : फेसबुकने अशी माहिती देखील माहिती जारी केली आहे की, “व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट बॉक्समधील जो कॅमेरा आयकॉन आहे तो वापरून युझर्सना भारतातील २ कोटींहून अधिक स्टोअरमध्ये कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून हे फिचर वापरता येणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स फीचर फेज वाइज रिलीज केलं होतं. तर आता या नवीन अपडेटनंतर हे फीचर वापरणं आणखीच सोपं होईल.

०२ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)