चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ मे २०२०

Date : 2 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये? ही घ्या संपूर्ण यादी :
  • रेड झोन (१४) : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव

  • ऑरेंज झोन (१६) : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

  • ग्रीन झोन (६) : उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

महाराष्ट्रात २४ तासात १००८ नवे करोना रुग्ण, २६ मृत्यू, संख्या ११ हजार ५०० च्याही वर :
  • महाराष्ट्रात २४ तासात १००८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ११ हजार ५०६ इतकी झाली आहे. आज १०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत १८७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

  • २४ तासांमध्ये झालेल्या २६ करोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी १० मृत्यू पुण्यात, ५ मुंबईत, ३ जळगावात, १ पुणे जिल्ह्यात, १ सिंधुदुर्गमध्ये, १ नांदेडमध्ये, १ भिवंडीत, १ ठाण्यात, १ औरंगाबाद आणि १ मृत्यू परभणीत झाला आहे. मुंबईतील एका उत्तर प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू नोंदवला गेला आहे.

  • मृत्यू झालेल्या २६ रुग्णांमध्ये १८ पुरुष तर ८ महिला होत्या. यातले १४ जण हे ६० वर्षांच्या वरील वयाचे होते. यातले ११ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. २६ पैकी १५ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे गंभीर स्वरुपाचे आजार होते.

मोदी सरकारचा मोठा निर्णय - अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी :
  • लॉकडाउनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंततराज्य प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

  • केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

  • तिकिटांच्या विक्रीसंबंधी रेल्वे मंत्रालय सविस्तर माहिती देईल असं आदेशात सांगण्यात आलं आहे. तसंच ट्रेन आणि स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी तसंच सुरक्षेच्या इतर उपाययोजनांबद्दलही रेल्वे मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

देशात आता तिसरा लॉकडाउन - आणखी दोन आठवडे टाळेबंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय :
  • देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

  • करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

  • करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. त्यावेळी सर्व राज्यांकडून त्यांनी माहिती घेतली होती. तसंच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी विनंतीही केली होती. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत ३ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. आता दोन पुन्हा एकदा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. 

४-जी सेवा सुरू करण्यास विरोध :
  • जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गट आणि त्यांचे पाकिस्तानातील हँण्डलर्स खोटय़ा बातम्यांद्वारे जनतेला चिथावणी देत असल्याचे स्पष्ट करून जम्मू-काश्मीर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात ४-जी सेवा सुरू करण्यास विरोध केला.

  • दहशतवादी कारवायांचा प्रसार करण्यासाठी आणि प्रक्षोभक साहित्य विशेषत: व्हिडीओ आणि छायाचित्रे याद्वारे जनतेला चिथावणी देण्यासाठी इंटरनेटचा गैरवापर करण्यात येत असल्याचे आढळले आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

  • दहशतवादाचा प्रचार करण्यासाठी केंद्रशासित प्रदेशातील दहशतवादी गट आणि त्यांचे पाकिस्तानातील हॅण्डलर्स इंटरनेटचा वापर करून खोटय़ा वृत्तांद्वारे जनतेला चिथावणी देत असून दहशतवादी हल्ल्याची योजना आखतात, असे न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

शाळा, महाविद्यालयांसाठी एचआरडीची नियमावली :
  • शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक अंतराची नियमावली मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून (एचआरडी) तयार केली जात आहे.

  • करोनाचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १६ मार्चपासून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर २४ मार्च रोजी देशव्यापी टाळेबंदी घोषित करण्यात आली आणि त्याला ३ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

  • शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर सामाजिक अंतराबाबतची नियमावली तयार केली जात आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळांसाठी तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शत तत्त्वे तयार केली जात आहेत.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची यापूर्वीच शिफारस केली आहे तर विविध माध्यमांच्या वतीने शाळांनीही शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे.

देशात १३० जिल्हे लाल, तर ३१९ हिरव्या श्रेणीत :
  • केंद्र सरकारने शुक्रवारी दोन आठवडय़ांसाठी टाळेबंदी वाढवितानाच आरोग्य मंत्रालयाने देशभरातील करोनाबाधित लाल, नारंगी आणि हिरव्या श्रेणी (झोन) जाहीर केल्या आहेत. देशभरातून १३० जिल्हे हे लाल श्रेणीत आहेत, तर २८४ जिल्हे हे नारंगी श्रेणीत आणि ३१९ जिल्हे हे हिरव्या श्रेणीत आहेत.

  • करोनाबाधित रुग्णांची संख्या, रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण, चाचण्यांचे प्रमाण याचा विचार करून या श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. हे क्षेत्र हे आठवडाभरासाठी वा त्याहून कमी कालावधीसाठी तयार केले असून त्यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

  • नव्या वर्गीकरणानुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळूरू आणि अहमदाबाद यासारख्या महानगरांचा समावेश लाल श्रेणीत करण्यात आला आहे. राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना मंत्रिमंडळ सचिवांनी ही माहिती दिली.

०२ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.